Latest

शरद पवारांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीला भाजपने पाठिंबा द्यावा : संजय राऊत

रणजित गायकवाड

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : देशाला राष्ट्रपती हवे असतील तर शरद पवार हे चांगला पर्याय आहेत, रबर स्टॅम्प तर अनेक रांगेत आहेत. राष्ट्रपतीपद कुणाला द्यायचे हे राज्यकर्त्यांवर आहे. पण देशाला एक आदर्श राष्ट्रपती हवा असेल, उत्तम प्रशासक हवा असेल तर शरद पवार यांच्या उमेदवारीला भाजपने पाठिंबा द्यावा, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले.

शरद पवार हे एक देशातील प्रमुख व अनुभवी नेते आहेत. संसदीय लोकशाहीमध्ये गेली पन्नास वर्ष अजिंक्य असलेले नेते आहेत. राज्यकर्त्यांचे मन मोठे असेल तर ते त्यांना राष्ट्रपती निवडतील. नाहीतर खुजे लोक निवडतील, असे सांगतानाच राऊत यांनी या प्रस्तावाला शरद पवार यांनी मान्यता दिली तर या गोष्टी शक्य आहेत, असेही स्पष्ट केले. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे बुधवारी 15 तारखेला अयोध्येत जाणार आहेत. त्यापूर्वी अनेक शिवसेना नेते आणि हजारो शिवसैनिक आयोध्येत दाखल झाले आहेत. संजय राऊत हे देखील अयोध्येत गेले असून त्यांनी तेथे पत्रकार परिषद घेत शरद पवार यांना राष्ट्रपती करण्याची मागणी केली.

आदित्य ठाकरे यांचा हा अयोध्या दौरा काही राजकीय नाही. ते रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत, असे राऊत यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT