Latest

BJP Sankalp Patra Manifesto : पीएम मोदींनी कशाकशाची दिली गॅरंटी?

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : BJP Sankalp Patra Manifesto : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आज (14 एप्रिल) 'संकल्प पत्र' नावाने जाहीरनामा प्रसिद्ध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये गरीबांसाठी तीन कोटी घरे, मोफत रेशन योजना, मोफत उपचार सुविधा, घराघरांपर्यंत पाईपलाईनने गॅस यासह अनेक मोठ्या घोषणा पीएम मोदींनी केल्या आहेत.

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, आमचे लक्ष गुंतवणुकीतून रोजगार निर्मितीवर आहे. प्रत्येक आश्वासनाची हमी स्वरूपात अंमलबजावणी करण्यात आली आहे. भाजपचा जाहीरनामा हा तरुणांच्या आकांक्षांचे प्रतिबिंब आहे. यामध्ये तरुणांच्या सूचनांचा समावेश करण्यात आला आहे. यातून संकल्प भारत विकसित भारताचे आधारस्तंभ तरुण, महिला गरीब, शेतकरी यांना सक्षम बनवतो.

देशात तीन प्रकारच्या वंदे भारत ट्रेन धावणार (Lok Sabha Election)

पीएम मोदी म्हणाले, भाजप वंदे भारत ट्रेनचा देशाच्या कानाकोपऱ्यात विस्तार करेल. वंदे भारतचे तीन मॉडेल देशात धावतील. यात वंदे भारत स्लीपर, वंदे भारत चेअरकार आणि वंदे भारत मेट्रो यांचा समावेश असेल. अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेनचे काम जोरात सुरू आहे. ते जवळपास शेवटच्या टप्प्यात आले आहे. त्याचप्रमाणे उत्तर भारतात एक बुलेट ट्रेन, दक्षिण भारतात एक बुलेट ट्रेन आणि पूर्व भारतात एक बुलेट ट्रेन धावता दिसेल. त्यासाठी सर्वेक्षणाचे कामही लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

तीन प्रकारच्या पायाभूत सुविधांमुळे भारत मजबूत होईल (Lok Sabha Election)

भाजप सामाजिक पायाभूत सुविधा, डिजिटल पायाभूत सुविधा, भौतिक पायाभूत सुविधा या तीन प्रकारच्या पायाभूत सुविधांद्वारे 21 व्या शतकातील भारताचा पाया मजबूत करणार आहे. सामाजिक पायाभूत सुविधांसाठी आम्ही नवीन शैक्षणिक संस्था सुरू करत आहोत. भौतिक पायाभूत सुविधांच्या अंतर्गत, आम्ही देशभरातील महामार्ग, रेल्वे, हवाई मार्ग आणि जलमार्गांचे आधुनिकीकरण करत आहोत. डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर अंतर्गत, आम्ही 5G नेटवर्कचा विस्तार करत आहोत. त्याचबरोबर 6G वर देखील काम सुरू आहे. यासाठी डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर तयार करत आहोत.

भारताला फूड प्रोसेसिंग हब बनवणार (Lok Sabha Election)

भारताला फूड प्रोसेसिंग हब बनवण्याचा भाजपचा संकल्प आहे. यामुळे मूल्यवृद्धी होईल. शेतकऱ्याचा नफा वाढेल आणि रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होतील.

पीएम किसान सन्मान निधीचा लाभ मिळत राहणार (Lok Sabha Election)

भविष्यातही देशातील 10 कोटी शेतकऱ्यांना पीएम-किसान सन्मान निधीचा लाभ मिळत राहील. 'सहकारातून समृद्धी' या संकल्पनेतून भाजप 'राष्ट्रीय सहकार धोरण' आणणार आहे. यातून आपण क्रांतिकारी दिशेने वाटचाल करणार आहोत. देशभरातील दुग्धव्यवसाय आणि सहकारी संस्थांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात येणार आहे. भारताला जागतिक पोषण केंद्र बनवण्यासाठी आम्ही 'श्री अन्न' वर खूप भर देणार आहोत.

महिला सक्षमीकरण (BJP Sankalp Patra Manifesto)

महिला सक्षमीकरणात आज भारत जगाला दिशा दाखवत आहे. आम्ही गेली 10 वर्षे महिलांच्या सन्मानासाठी आणि महिलांसाठी नवीन संधींसाठी समर्पित आहोत. येणारी 5 वर्षे स्त्री शक्तीच्या नव्या सहभागाची असतील.

10 वर्षात 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर (Lok Sabha Election)

आमचा जाहीरनामा तरुण भारताच्या युवा आकांक्षांचे प्रतिबिंब आहे. गेल्या 10 वर्षात भारतातील सुमारे 25 कोटी लोक बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर आले आहेत. हे काम भाजपच्या दृढ बांधिलकीचा हा पुरावा आहे.

पाईपद्वारे गॅस पोहोचवण्याचे काम (Lok Sabha Election)

भाजप सरकारने गरिबांसाठी 4 कोटी पक्की घरे बांधली आहेत. आता, राज्य सरकारांकडून मिळणाऱ्या अतिरिक्त माहितीचा विचार करून, त्या कुटुंबांची काळजी करताना आणखी 3 कोटी घरे बांधण्याचे वचन घेऊन आम्ही पुढे जाऊ. आत्तापर्यंत आम्ही प्रत्येक घरापर्यंत स्वस्त सिलिंडर पोहोचवले आहेत, आता आम्ही प्रत्येक घरात स्वस्त पाईपचा स्वयंपाक गॅस पोहोचवण्यासाठी वेगाने काम करू.

आयुष्मान योजना

जनऔषधी केंद्रावर 80 टक्के सवलत सुरूच राहणार असून ती वाढवण्यात येणार आहे. आयुष्मान कार्ड अंतर्गत, सत्तर वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला 5 लाख रुपयांचे उपचार आयुष्मान योजनेच्या कक्षेत आणले जातील. आम्ही ज्येष्ठ नागरिक आणि ट्रान्सजेंडर समुदायाला आयुष्मान भारत योजनेच्या कक्षेत आणण्याचा निर्णय घेतला आहे.

समान नागरी कायदा

राष्ट्रीय हितासाठी मोठे आणि कठोर निर्णय घेण्यास भाजप मागेपुढे पाहत नाही. कारण आमचा विश्वास आहे की आमच्यासाठी पक्षापेक्षा देश मोठा आहे. एक राष्ट्र, एक निवडणूक ही संकल्पना साकार करण्याचा संकल्प घेऊन आम्ही पुढे जाऊ. भाजप देखील देशाच्या हिताच्या दृष्टीने समान नागरी संहिता (UCC) तितकेच महत्त्वाचे मानते. याची अंमलबजावणी येणा-या काळात करण्यात येईल.

भ्रष्टाचाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील

आता गरिबांना त्यांचा हक्क मिळत आहे आणि ज्यांनी गरिबांना लुटले ते तुरुंगात जात आहेत. भ्रष्टाचाऱ्यांविरुद्ध अशी कठोर कारवाई भविष्यातही सुरूच राहील.

उपग्रह शहरांची निर्मिती

शहरीकरण हे पूर्वीच्या सरकारांसाठी आव्हान होते. पण हे शहरीकरण भारतीय जनता पक्षासाठी संधी आहे. आम्ही नवीन उपग्रह शहरे तयार करू, जी देशाच्या विकासासाठी विकास केंद्रे म्हणून उदयास येतील.

बचत गटांना आयटी, शिक्षण, आरोग्य, पर्यटन क्षेत्राचे प्रशिक्षण

गेल्या दहा वर्षांत सुमारे 10 कोटी महिला बचत गटांमध्ये सामील झाल्या आहेत. आम्ही या बचत गटांना माहिती तंत्रज्ञान, शिक्षण, आरोग्य, पर्यटन या क्षेत्रातील प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. खऱ्या अर्थाने सामाजिक विकास आणि सामाजिक समावेशासाठी भाजप अथक प्रयत्न करत आहे.

पंतप्रधान आवास योजनेत आता दिव्यांगांना प्राधान्य

ज्यांना कोणी विचारले नाही, मोदी त्यांची काळजी घेतात. सबका साथ, सबका विकास हाच आत्मा आहे आणि हाच भाजपच्या संकल्प पत्राचा आत्मा आहे. गेल्या 10 वर्षात आम्ही दिव्यांगांसाठी अनेक सुविधा दिल्या. पंतप्रधान आवास योजनेत आता दिव्यांग मित्रांना प्राधान्य दिले जाईल, त्यांना त्यांच्या विशेष गरजेनुसार घरे मिळावीत यासाठी विशेष काम केले जाणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT