Latest

Lok Sabha Elections 2024 : लोकसभेसाठी कर्नाटकात भाजपची ‘जेडीएस’शी हातमिळवणी; येडियुरप्पांची घोषणा

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभेच्या २०२४च्या निवडणुकीत कर्नाटकमध्ये भाजप आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांच्यामध्ये मोठा समझोता झाल्याचे वृत्त समोर आले आहे. भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी जेडीएसला चार जागा देण्याचे मान्य केले आहे. या प्रस्तावाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संमती दिल्याचे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी सांगितले. दरम्यान,  जेडीएस विरोधी आघाडीच्या बैठकीपासून दूर राहिल्यानंतरच लोकसभा निवडणुकीत हा पक्ष भाजपच्या नेतृत्वाखालील NDA सोबत जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. (Lok Sabha Elections 2024)

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीनंतर कर्नाटकमध्ये जेडीएसला भाजपसोबत युती करण्याची गरज भासू लागली होती. जेडीएसने अलीकडच्या काळात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरून भाजपला समर्थन दिले आहे. एचडी देवेगौडा यांनी बालासोर अपघातप्रकरणी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा बचाव केला होता. इतर विरोधी पक्षांचे आवाहन धुडकावून लावल्यानंतर देवेगौडा यांनी संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाला हजेरी लावली होती. (Lok Sabha Elections 2024)

जेडीएसने कर्नाटकात लोकसभेच्या २८ पैकी चार जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. जेडीएसला मंड्या, हसन, बंगलोर ग्रामीण आणि चिकबल्लापूर या जागा लढवायच्या आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने २८ पैकी २५ जागा जिंकल्या होत्या. मंड्यातून विजयी झालेल्या सुमलता अंबरीश यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. तर जेडीएसला हसन ही केवळ एक जागा जिंकता आली होती.

माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनाही निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. गेल्या लोकसभा निवडणुकीत जेडीएसला 9.67 टक्के मते मिळाली, तर विधानसभा निवडणुकीत जेडीएसला केवळ 13.29 टक्के मते मिळाली आहेत. त्यांना केवळ 19 जागांवर समाधान मानावे लागले आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT