Latest

जामखेड : पवारांना खुश करण्यासाठी चमकोगिरी : शरद कार्ले

अमृता चौगुले

जामखेड, पुढारी वृत्तसेवा: आमदार राम शिंदे यांनी बारामती अ‍ॅग्रोच्या शेटफळगडे कारखाना शासकीय वेळेच्या अगोदर चालू करुन नियम मोडल्याबद्दल साखर आयुक्तांकडे तक्रार करून कारवाईची मागणी केल्यानंतर जामखेड येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खर्डा येथे आमदार प्रा. राम शिंदे यांच्या विरोधात आ. रोहित पवार यांना खुश करण्यासाठी घोषणाबाजीची चमकोगिरी केल्याची टीका भाजयुमोचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले यांनी केली.

नियम मोडून कारखाने आधी चालू करायचे आणि आपल्या जवळच्या लोकांचा ऊस तोडून घ्यायचा. नंतर ज्या शेतकर्‍यांचा ऊस राहिला, त्यांच्याकडून कमी भावामध्ये ऊस खरेदी करायची, अशी सरंजामी कारखानदारांनी चालू केली आहे. वास्तविक सर्वांना नियम सारखेच असेल पाहिजेत. त्यांच्या या मनमानी कारभाराविरोधात आ. शिंदे यांनी कारवाई करण्यासाठी निवेदन दिलेले आहे.

आमदार राम शिंदे यांनी मंजूर केलेली कामे आतापर्यंत आ. रोहित पवार करत आहेत. त्याचे देखील या सर्व कार्यकर्त्यांनी भान ठेवावे. तुम्ही चुकीला चूक म्हणू शकत नसाल, तर चमकोगिरी करून काय साध्य करणार आहात. आपल्याला किंमत यावी म्हणून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे आ. पवार यांच्या मनमानी कारभाराचे समर्थन करून चमकोगिरी करत आहेत. परंतु शेतकर्‍यांची भविष्यात पिळवणूक या चमको कार्यकर्त्यांना कुठलीही काळजी नाही. तरी आ. शिंदे यांनी दिलेल्या निवेदनावर कारवाई करून अशा कारखानदारांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणीही कार्ले यांनी केली.

SCROLL FOR NEXT