नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राज्यसभेच्या जागांसाठी नुकत्याच निवडणुकीनंतर पक्षीय पक्ष बलाबल बदलले असून सत्ताधारी भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएची राज्यसभेतील सदस्य संख्या ११७ झाली आहे. संसदेच्या या वरिष्ठ सभागृहामध्ये पाच जागा रिक्त असल्याने एकूण संख्याबळ २४५ वरून २४० पर्यंत खाली आले आहे. त्यामुळे एनडीए बहुमतापासून केवळ चार जागा दूर आहे.
राज्यसभेच्या एकूण ५६ जागांसाठी द्विवार्षिक निवडणुका नुकत्याच पार पडल्या. यातील ५० सदस्यांचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी संपणार आहे आणि सहा खासदार ३ एप्रिल रोजी निवृत्त होणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर या जागांसाठी २७ फेब्रुवारीला निवडणूक झाली. या निवडणुकीत महाराष्ट्रातील सहा जागांसह ४१ जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून आले. मात्र हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमध्ये झालेली राज्यसभेची चुरशीची निवडणूक आणि आमदारांनी पक्षीय भूमिका बाजूला सारून केलेले मतदान यामुळे संसदेच्या या सभागृहातील गणिते बदललेली आहेत. या क्रॉस वोटिंग मतदानामुळे भाजपने उत्तर प्रदेशातील दहापैकी आठ जागा आणि हिमाचल प्रदेशातील एकमेव जागा जिंकली. तर, कर्नाटकात काँग्रेसने चारपैकी तीन जागा जिंकल्या, तर भाजपला एक जागा जिंकता आली. या निकालानंतर सत्ताधारी एनडीएचे राज्यसभेतील संख्याबळ ११७ वर पोहोचले आहे.
२४५ सदस्य संख्या असलेल्या राज्यसभेमध्ये बहुमताचा आकडा १२३ असून एनडीएच्या ११७ जागा पाहता बहुमताचा आकडा गाठण्यासाठी सत्ताधारी आघाडी आणखी सहा जागांची आवश्यकता आहे. दरम्यान, सद्यस्थितीत राज्यसभेच्या पाच जागा रिक्त असल्याने सभागृहाचे प्रभावी संख्याबळ २४० पर्यंत खाली आले आहे. साहजिकच, या संख्याबळात बहुमताचा आकडा २२१ होत असल्याने एनडीएच्या ११७ जागा लक्षात घेता बहुमतापासून एनडीए केवळ चार जागांपासून लांब असल्याचे समोर आले आहे. रिक्त असलेल्या पाच जागांमध्ये राष्ट्रपती राजवट असलेल्या जम्मू काश्मीरच्या चार जागांचा समावेश आहे. तर राष्ट्रपतींद्वारे नियुक्त होणाऱ्या खासदारांमधील एक जागा देखील रिक्त आहे.
हेही वाचा :