Latest

कर्नाटक निवडणूक : बंगळुरूमध्ये भाजप-काँग्रेस समसमान

अमृता चौगुले

ज्ञानेश्वर बिजले

बंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेले दोन दिवस २२ मतदारसंघातून काढलेली प्रचार फेरी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या प्रचारसभा यामुळे कर्नाटकची राजधानी आणि आयटी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरू शहरातील राजकीय वातावरण प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात ढवळून निघाले आहे. विधानसभेच्या 32 जागा असलेल्या या शहरात भाजप आणि काँग्रेस यांना समसमान जागा मिळण्याचा अंदाज आहे.

बंगळुरूमध्ये गेले दोन दिवस फिरताना कोठेही निवडणूक प्रचाराचा फारसा मूड असल्याचे चित्र दिसत नाही. राजकीय पक्षांची कार्यालये, आणि प्रचारसभांची ठिकाणे वगळता निवडणुकीबाबत मतदारांमध्ये फारसा उत्साह जाणवला नाही. रिक्षा चालकासह सर्वसामान्य लोकांशी संवाद साधला असता बहुतेकांच्या बोलण्यातून काँग्रेस राज्यात सत्तेवर येईल असा अंदाज सांगण्यात येत होता.

पंतप्रधान मोदी यांच्या कामाबाबत लोक चांगली प्रतिक्रिया व्यक्त करीत होते, मात्र भाजपच्या राज्य सरकारच्या कामगिरीबद्दल लोकांच्या बोलण्यात नाराजी दिसून आली. ही स्थिती लक्षात घेत भाजपने मोदी यांची प्रचार फेरी काढण्याचा निर्णय घेतला शनिवार आणि रविवारी सकाळी मोदी यांनी जीपमधून प्रचार फेरी काढली. रस्त्याच्या दुतर्फा लोकांची झालेली गर्दी, चौका – चौकात कार्यकर्त्यांनी उत्साहाने केलेले स्वागत याचा भाजपच्या प्रचाराच्या दृष्टीने चांगला फायदा झाला. या मार्गावर कार्यकर्ते, महिला आणि लोकांनी फुलांची उधळण केली.

बंगळुरू शहरात २८ तर लगतच्या ग्रामीण भागात चार जागा आहेत. 2018 मधील विधानसभा निवडणुकीत भाजपचे ११, काँग्रेसचे १७, तर जनता दल (धर्मनिरपेक्ष) चे चार आमदार निवडून आले होते. काँग्रेस आणि जनता दल यांचे सरकार सत्तेवर आले. वर्षभरातच ऑपरेशन लोटस झाले. राज्यात भाजपची सत्ता आली. त्यानंतर पोटनिवडणूक झाली. भाजपच्या आमदारांची संख्या वाढून १६ झाली, तर काँग्रेसचे १२ आमदार शिल्लक राहिले.

बंगळुरू शहरातील तिन्ही खासदार भाजपचे आहेत तर बंगळुरू ग्रामीणमध्ये राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार डी. के. सुरेश दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. याच मतदारसंघातून २००९ मध्ये एच. डी. कुमारस्वामी निवडून आले होते. यंदा भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी जोर लावला आहे. दोघांनाही समसमान जागा मिळतील, असा अंदाज येथील जाणकार व्यक्त करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT