Latest

Sakibul Gani : दागिने गहाण ठेवून आईने दिली बॅट, त्रिशतक ठोकून मुलाने फेडले कर्ज

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : पहिल्याच प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात शतक किंवा द्विशतक झळकावणं हे कोणत्याही युवा फलंदाजाचे स्वप्न असतं. पण एखाद्या खेळाडूने करियरच्या पहिल्याच प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात त्रिशतक फटकावले तर काय होईल? सहाजिकच आनंदाला पारावार उरणार नाही, त्या खेळाडूला गगन ठेंगणे वाटू लागेल… अशीच एक घटना नुकतीच घडली. बिहारचा युवा फलंदाज सकीबुल गनी (Sakibul Gani) याने पहिल्याच रणजी क्रिकेट सामन्यात त्रिशतक झळकावले. याचबरोबर त्याच्या नावावर मोठा विक्रम नोंदवला गेला. प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात त्रिशतक फटकावणार तो जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.

२२ वर्षीय सकीबुल गनीने (Sakibul Gani) कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर मिझोराम विरुद्ध खेळल्या गेलेल्या रणजी ट्रॉफी सामन्यात ही कामगिरी केली. फर्स्ट क्लास कारकिर्दीतील पहिल्याच मॅचमध्ये धमाका केल्यानंतर तो लगेचच प्रकाशझोतात आला. त्या सामन्यात त्याने ५४ चौकारांची आतषबाजी करत ३४१ धावांची खेळी साकारली. या ऐतिहासिक खेळीनंतर साकीबुल हा नवा स्टार क्रिकेटपटू म्हणून उदयास आला आहे. पण या खेळाडूला स्टार बनवण्यात त्याच्या आईचे योगदान अतुलनीय आहे. गनी इथपर्यंत पोहोचण्याची कहाणी खूप संघर्षाची आहे. चला तुम्हाला थोडे मागे घेऊन जाऊ, जेणेकरून तुम्हालाही गनी आणि त्याच्या कुटुंबाच्या संघर्षाची कहाणी समजेल.

भारतीय नागरिकांचे क्रिकेटवरील प्रेम सर्व जगाला माहिती आहे. साकीबुलही (Sakibul Gani) असाच. गरिब घरातील असूनही त्याने आपल्यातील क्रिकेटला आकार देत मोठे यश कमावले. बिहारच्या रणजी संघात त्याची निवड झाली. पण एकवेळ अशी होती की, त्याच्याकडे उत्तम दर्जाची बॅट घेण्याचेही पैसे नव्हते. आपल्या सर्वांना माहिती आहे की, क्रिकेटची चांगली बॅट खरेदी करायची झाल्यास आपल्याला १५-२० हजार रुपयांवर खर्च करावे लागतात. पण, गरीब कुटुंबातील गनी यांच्याकडे इतकी रक्कम नव्हती. मग अशा परिस्थितीत गनीला बॅट खरेदी करायची कुठून, असा प्रश्न सतावत होता.

या कठीण प्रसंगी त्याच्या आईने आपले दागिने गहाण ठेवून एक चांगल्या दर्जाची बॅट खरेदी करण्यासाठी मुलाला पैसे दिले. त्याच बॅटने साकीबुल गनीने त्रिशतक ठोकले आणि आईचा आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवला. २२ वर्षीय गनीने या रणजी ट्रॉफी सामन्यात मिझोरामविरुद्ध ४०५ चेंडूत ३४१ धावा केल्या होत्या. त्याच्या या खेळीत त्याने ५६ चौकार आणि २ षटकारही मारले. शेतकरी कुटुंबातील गनीला त्याच्या मोठ्या भावाचीही साथ मिळाली. यादरम्यान त्याच्या आई-वडिलांनीही त्याला पूर्ण पाठिंबा दिला आणि आज त्याचा निकाल तुमच्यासमोर आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT