Latest

‘बिद्री’तील मैत्री ‘आजर्‍या’त तुटली, हसन मुश्रीफ विरुद्ध सतेज पाटील सामना

Arun Patil

कोल्हापूर : आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत हसन मुश्रीफ यांच्या गटाने पॅनेल केल्यामुळे बिनविरोध निवडणुकीचा फुगा फुटला आहे. त्यामुळे बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत असलेली सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांच्यातील मैत्री आजर्‍याच्या निवडणुकीत तुटली आहे. बिनविरोधच्या चर्चा झाल्या, घोषणा झाल्या, त्या हवेत विरण्यापूर्वीच विरोधी पॅनेल तयार झाले.

आजरा कारखाना निवडणूक बिनविरोध करायची, यासाठी सतेज पाटील, हसन मुश्रीफ, विनय कोरे यांच्यात वेळोवेळी बैठका झाल्या. राष्ट्रवादीने बिनविरोधसाठी तयारी दाखवली, तशी घोषणाही झाली. मात्र, प्रत्यक्षात राष्ट्रवादीने पॅनेल केल्याने निवडणूक अटळ झाली आहे. आता बाजी कुणाची, हे मतदार ठरवतील.

हसन मुश्रीफ यांच्या विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषदेचा एक मतदारसंघ आजरा तालुक्यात आहे. त्यामुळे मुश्रीफ यांच्या भूमिकेला फार महत्त्व होते. एकूणच कारखान्याची परिस्थिती पाहता निवडणूक बिनविरोध व्हावी, असा सूर होता. नेत्यांनीही आपले ऐक्य कायम राखत बिनविरोधला पाठिंबा दिला. त्यानुसार काँग्रेस, भाजप, स्वाभिमानी व शिवसेनेचे दोन्ही गट, असे पॅनेल तयार झाले. राष्ट्रवादीत गुरुवारी रात्री अचानक घडामोडी झाल्या. शुक्रवारी सकाळी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीचे पॅनेल करणार असल्याचे सांगितले.

या घडामोडींमुळे बिनविरोधच्या अपेक्षा असलेल्या नेत्यांना धक्का बसला आहे. यामागे अनेक कारणे सांगितली जातात. त्यामध्ये काँग्रेस, भाजप, शिवसेना पॅनेलकडून मुश्रीफ यांच्यावर टीका करणार्‍याला उमेदवारी देण्यात आली. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या बिनविरोधच्या योगदानाची कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याचे बोलले जाते. काँग्रेस, शिवसेना, भाजप नेत्यांना मात्र सतेज पाटील, हसन मुुश्रीफ, विनय कोरे यांच्या बैठकीत निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरले असताना अचानक काय झाले? राष्ट्रवादीने पॅनेल का केले? हसन मुश्रीफ यांचा याला कितपत पाठिंबा आहे, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मात्र हसन मुश्रीफ यांना तुमच्या निवडणुका आल्या की आम्ही लढायचे आणि आम्हाला लढायची संधी आली की, तुम्ही नेत्यांच्या पातळीवर एकी करायची आणि आम्हाला शांत बसवायचे, ही भूमिका तुम्हाला घेता येणार नाही. आम्हाला लढू द्या आणि राष्ट्रवादीचे अस्तित्व कायम ठेवू द्या. विरोधक एकत्र मिळून जर कारखाना चांगला चालवू म्हणत असतील, तर आम्हीही कारखाना चांगला चालवू शकतो, अशी भूमिका मांडली. त्यानंतर राष्ट्रवादीचे पॅनेल जाहीर करण्यात आले. त्यामुळे सतेज पाटील विरुद्ध हसन मुश्रीफ, असा सामना आजर्‍यात पाहायला मिळणार आहे.

सगळीकडे एकत्र; आजर्‍यात विरोधात

महादेवराव महाडिक यांच्याविरोधात सतेज पाटील, हसन मुश्रीफ आणि विनय कोरे यांनी जिल्ह्यात मोट बांधली. या गटाची कोल्हापूर महापालिका, जिल्हा परिषदेवर सत्ता होती, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, बाजार समितीवर या गटाची सत्ता आहे. 'गोकुळ' आपल्याकडे खेचण्यातही त्यांना यश मिळाले. सगळीकडे हे नेते एकत्र असताना आजर्‍यात मात्र त्यांच्यात संघर्ष होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT