Latest

Kolhapur | पी. एन. पाटीलच किंगमेकर, ‘भोगावती’च्या निवडणुकीत नेमकं काय घडलं?

Arun Patil

राशिवडे : प्रवीण ढोणे अतिशय चुरशीने झालेल्या परिते येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत 25 पैकी 24 जागा जिंकत सताधारी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने सभासदांचा निर्विवाद कौल मिळविला. या विजयाने आघाडीचे नेते आमदार पी. एन. पाटील हेच भोगावतीचे किंगमेकर असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

गतवेळी कौलवकर पॅनेलचा पराभव करून पी. एन. पाटील यांनी पाच वर्षे सत्ता आपल्या हाती ठेवली होती. आता स्वतः पी. एन. यांनी कारखान्याच्या सत्तेबाहेर राहून सत्तेची सूत्रे आपल्या हाती ठेवण्यासाठी जोडण्या लावल्या. राजकारणामध्ये काहीही घडू शकते, याचा प्रत्यय या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा आला. आमदार पी. एन. पाटील व शेकापचे माजी आमदार संपतराव पवार-पाटील या दोन सडोलीकरांमधील राजकीय संघर्षाला 34 वर्षांनंतर पूर्णविराम मिळाला. अगदी ग्रामपंचायतीच्या राजकारणापासून विधानसभा, गोकुळ, जिल्हा बँकेतील संघर्ष टोकाचा होता. गेल्या चार विधानसभा निवडणुकीवेळी हा संघर्ष ईरेलाच पोहोचला होता.

भोगावतीची रणधुमाळी सुरू असतानाच आमदार पी. एन. यांनी बिनविरोधसाठी कुणाचेच वावडे नाही असे स्पष्ट केले आणि खर्‍या अर्थाने पुन्हा या दोन पारंपरिक राजकीय घराण्याच्या सलोख्याच्या राजकारणाची चर्चा झाली. संपतराव पवार-पाटील यांचे चिरंजीव क्रांतिसिंह व अशोकराव पवार-पाटील यांचे चिरंजीव अक्षय यांनी राजकीय सलोखा कायम ठेवत भोगावतीसाठी पी. एन. यांच्यासोबत युती केली.

भोगावतीचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले हेही विरोधात होते. तर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब पाटील-कौलवकर यांचे नातू माजी अध्यक्ष धैर्यशिल पाटील यांनी पॅनेल उभे करून कारखाना पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.

माघारीच्या दिवशी नाट्यमय घडामोडी

माघारीच्या अंतिम दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या. गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे गटाने सताधारी आघाडीला पाठिंबा दिला. धैर्यशील पाटील-कौलवकर गटाने तिसर्‍या पॅनेलची घोषणा केली. त्यामुळे भाजप, शिवसेना, स्वाभिमानी, चरापले गटासह तीन आघाड्यांमध्ये लढत झाली. पण पी. एन. पाटील यांचा राजकीय अनुभव, पॅनेल करताना विचारपूर्वक केलेल्या जोडण्या आणि नियोजनबद्ध प्रचार यामुळे चुरशीची वाटणारी ही निवडणूक सत्ताधार्‍यांनी सहजरित्या जिंकली. कारखान्याचे उपाध्यक्ष, सत्ताधारी गटाचे प्रमुख उमेदवार उदय पाटील-कौलवकर यांचा संघर्ष मात्र मतमोजणीच्या शेवटपर्यंत सुरू होता.

SCROLL FOR NEXT