कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कधी त्यांनी संगीतातून प्रेमाचा मंत्र दिला, तर कधी गाण्याच्या ठेक्यावर रसिकांनाही थिरकविले. आयुष्यातील प्रत्येक भावनांना संगीताच्या धाग्यात गुंफणार्या संगीताची सुरेल मैफल संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे गुरुवारी सायंकाळी रंगली. निमित्त होते दै. 'पुढारी' आयोजित आणि सायकल अगरबत्ती प्रायोजित 'भाव भक्तीचा गंध सुरांचा' या सांगीतिक मैफलीचे.
मैफलीची सुरुवात गणरायाला स्मरून 'तूच महागणपती…' या सायली पंकज यांच्या गीताने झाली. त्यानंतर 'गुरू एक जगी दाता, गुरू दया सिंधु' या गीताने मंदार आपटे यांनी गुरूला वंदन केले. यानंतर संगीतरूपी शब्दांतून परमेश्वराचे दर्शन महाराष्ट्रातील सर्वात लहान सतारवादक सोहम जगताप याने 'अनाथांच्या नाथा तुज नमो' या गाण्याच्या सादरीकरणातून केले.
कार्यक्रमात गायक-वादक तसेच सायकल अगरबत्ती ब—ँडचे एरिया सेल्स एक्झिक्युटिव्ह आप्पासाहेब बुडके यांचा सन्मान 'पुढारी' पब्लिकेशन प्रा. लि. चे जनरल मॅनेजर राजेंद्र मांडवकर, बेंगलोरचे बिझनेस रिप्रेझेंटेटिव्ह सुरेंद्र देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आला.
काळजाला साद घालणार्या गीतांमधून स्वरमेघाच्या भक्तिरसातील सुरांच्या सरींचा मैफलीत वर्षाव झाला. निनादणारी विविध वाद्ये आणि त्यांचा सुरेल मेळ असणार्या जीवनगाणे यांचे वाद्यवृंद हे मैफलीचे वैशिष्ट्य रसिकांनी अनुभवले. श्रवणीय आणि नेत्रसुखद कार्यक्रमातील गायनाने रसिकवर्ग मंत्रमुग्ध झाला होता.