Latest

सावध व्हा! नाव शिवसेनेचं घेताय आणि कार्यक्रम भाजपचा राबवताय; भाजपवाले माशासारखे तडफडत होते, भास्कर जाधवांचा हल्लाबोल

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन: राज्यात थेट जनतेतून नगराध्यक्ष आणि सरपंच निवडून देण्याचे विधेयक आणणाऱ्या राज्य सरकारवर शिवसेनेचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी जोरदार हल्ला चढवला. खासकरून त्यांनी एकनाथ शिंदे गटावर जास्त तोंडसुख घेतलं. एकनाथराव शिंदे, तुम्ही नाव शिवसेनेचं घेता आणि सर्व निर्णय आणि कार्यक्रम मात्र भाजपचे राबवताय असं त्यांनी म्हटलं. सरकार स्थापन झाल्यापासून गेल्या दीड दोन महिन्यातील असा एक निर्णय दाखवा,की जो तुम्ही तुमच्या स्वत:च्या मनाने घेतला आहे. आधी तुम्हीच घेतलेले सर्व निर्णय भाजप तुमच्याकडून बदलून घेत आहेत. वेळीच सावध व्हा. जर कारभार करायचा तर स्वाभिमानाने करा. सत्तेची गरज फक्त तुम्हाला नाही, त्यांनाही आहे. त्यांनाही सत्तेत यायचं होतं. भाजप कितीही नाही म्हणत असले तरी ते सत्तेच्या बाहेर राहून पाण्याबाहेर असणाऱ्या माशासारखे तडफडत होते, असा हल्लाबोल भास्कर जाधव यांनी केला.

विधानसभेत विधेयकावर चर्चा करत असताना भास्कर जाधव यांनी हा हल्लाबोल केला. त्यावेळी शंभुराज देसाई किमान स्वत:च्या मनाने विचार करा. प्रत्येक गोष्टीत तुम्ही तोंड घालून स्वत:चं हसं करून घेऊ नका. काव काव काय? मला वाटलं आता पितृपक्ष येणार आहे. प्रॅक्टिस करतोय की काय गडी असं वाटलं. निर्लज्जपणाचा कळस आहे, अशी बोचरी टीका भास्कर जाधव यांनी केली.

मलाही राजकीय बोलता येते

आमदार संजय कुटे म्हणाले ते ठीक आहे. पण वेळ आली तर मी देखील खूप काही राजकीय बोलू शकतो हे तुम्हाला चांगलेच माहीत आहे. गेल्यावेळी नगराध्यक्षांनी काय काय उपदव्याप केले हे मी आज सांगणार नाही. मी कधीही कुणावर व्यक्तिगत आरोप करत नाही आणि नाव घेत नाही. फक्त निरंकुश सत्ता तुम्ही ठेवू नका. तुम्ही हा कायदा पुन्हा एकदा तपासून बघा, असंही ते म्हणाले.

राज्य सरकारचं शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष

यादरम्यान त्यांनी मीडियाशी देखील संवाद साधला. केवळ सभागृह सुरू रहावं म्हणून यांचे फक्त एकच मंत्री सभागृहात होते. शेतकऱ्यांकडे हे सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करतंय. रिफायनरी प्रकल्पाविषयी कोकणी माणसाकडून विश्वास मिळवून घेणं सर्वात महत्वाचं आहे, असं भास्कर जाधव म्हणाले.

SCROLL FOR NEXT