पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताच्या मूलभूत तत्त्वांवर सतत हल्ला होत आहे. देशभरात द्वेष पसरवला जात आहे. महागाई, बेरोजगारीमुळे जनता त्रस्त झाली आहे, पण केंद्र सरकारला त्याची पर्वा नाही. दरम्यान, काँग्रेसला सर्वसमावेशक बनवण्यासाठी तरुण, महिला, विचारवंत यांचा संघटनेत समावेश करावा लागेल. याची सुरुवात राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतून झाली आहे. त्यामुळे आमचे प्रतिस्पर्धी चिंतेत आहेत. आम्ही लोकांना या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन करत आहोत, असे प्रतिपादन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Congress foundation day) यांनी केले.
आज (दि.२८) काँग्रेस पक्षाच्या १३८ व्या स्थापना दिनानिमित्त (Congress foundation day) आयोजित कार्यक्रमात खर्गे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्याआधी खर्गे यांच्या हस्ते मुख्यालयात पक्षाचा झेंडा फडकविण्यात आला. यावेळी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी, आंबिका सोनी, जयराम रमेश आदी नेते उपस्थित होते.
खर्गे म्हणाले की, दलित, गरिबांच्या बेड्या तोडण्याचे धाडस काँग्रेसने केल्याने आज भारताची प्रगती झाली आहे. लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या मंत्रिमंडळात ५ बिगर काँग्रेसी मंत्र्यांची नियुक्ती केली होती. सर्वांना सोबत घेऊन चालण्याचे सूत्र त्यातून दिसून येत आहे.
काँग्रेसच्या सर्वसमावेशक दृष्टिकोनामुळे आणि सर्वांना सोबत घेऊन भारताने प्रगती केली आहे. भारत केवळ एक यशस्वी आणि सशक्त लोकशाही म्हणून उदयास आला नाही, तर काही दशकांत तो आर्थिक, आण्विक आणि सामरिक क्षेत्रात महासत्ता बनला आहे. कृषी, शिक्षण, वैद्यकीय, आयटी, सेवा क्षेत्र आणि जगातील अव्वल राष्ट्रांमध्ये भारताचा समावेश आहे. काँग्रेसचा लोकशाहीवर विश्वास असून सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची पक्षाची सर्वसमावेशक विचारसरणी आहे. सर्वांना समान अधिकार आणि संधी देणाऱ्या संविधानावर आमचा पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचलंत का ?