Latest

Bhandara News: विमा कंपनीकडून भरपाई नाही, संतापलेल्या शेतकऱ्यांनी उभे पिक पेटविले

मोनिका क्षीरसागर

भंडारा; पुढारी वृत्तसेवा: अवकाळी पाऊस कोसळल्यानंतर पिक विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी पिकांचे पंचनामे केले. परंतु, महिना लोटला तरी नुकसानभरपाई न मिळाल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी धानाच्या पुंजन्यासह उभे पिक पेटवून दिले. पिक विमा कंपनीच्या अशा नाकर्तेपणाचा ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. भंडारा तालुक्यातील वाकेश्वर येथील सच्चिदानंद देवराम लेंडारे व गंगाधर खोब्रागडे अशी धान पिकाला आग लावलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत.

दोन्ही शेतकऱ्यांनी आपल्या शेतात खरीप हंगामात धान पिकाची लागवड केली होती. धानपिक लागवड करण्यासाठी विविध बँक, सेवा सहकारी संस्थेसह हातउसने पैसे देखील घेतले होते. महागडी खते व औषधी खरेदी करून त्यांची फवारणी देखील केली. मात्र ऐन धान कापणीच्यावेळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात पिकांचे मोठे नुकसान झाले. धानाला अंकूर फुटले. नुकसानभरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे तक्रार केली. तक्रारीनुसार पिक विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे केले. मात्र महिना लोटून देखील विमा कंपनीकडून कुठलीही नुकसान भरपाई मिळाली नाही. अखेरीस संतापलेल्या शेतकऱ्यांनी शेतातील उभ्या धान पिकाला तर एकाने शेतशिवारातील धान पुंजण्याला आग लावीत पीक विमा कंपनीसह शासनाचा निषेध नोंदविला.

शासनाने घ्यावी दखल 

एक रुपयात पिक विमा काढण्याचे आवाहन शासनाने केले होते. त्यानुसार सर्वच शेतकऱ्यांनी पिक विमा काढला. परंतु, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊनही एकही रुपया शेतकऱ्यांना मिळाला नाही. आपल्याजवळील होते नव्हते ते सर्व पैसे पिकाच्या देखभालीसाठी लावणारे शेतकरी आज पै-पैसाठी मोताज झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे पिक विमा कंपनीने तात्काळ शेतकºयांना नुकसानभरपाई द्यावी. शासनाने तशी सूचना विमा कंपनीला करावी, अशी मागणी ओबीसी क्रांती मोर्चाचे संयोजक संजय मते यांनी केली आहे.

SCROLL FOR NEXT