Latest

भंडारा : क्रिकेटचा वाद जीवावर बेतला; पवनी तालुक्यात मानेवर बॅट मारुन तरुणाचा खून

backup backup

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : क्रिकेटची एक मॅच खेळून झाल्यानंतर पुन्हा मॅच खेळण्यावरुन दोन मित्रांमध्ये वाद झाला. त्यातच एकाने दुसऱ्यावर बॅटने जोरदार प्रहार केला. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना अड्याळ पोलिस ठाण्यांतर्गत येणाºया चिखली येथील मैदानावर आज (दि. ५, रविवार) दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली.

निवृत्तीनाथ गोपीचंद कावळे (वय २४) असे मृताचे नाव असून करण रामकृष्ण बिलवणे (वय २१) असे आरोपीचे नाव आहे. हे दोघेही चिखली येथील रहिवासी आहेत. आज रविवार असल्याने चिखली गावातील काही तरुण मुले क्रिकेट खेळण्यासाठी गावातील मैदानावर गेले होते. क्रिकेटचा एक सामना खेळून झाल्यानंतर पुन्हा एक सामना खेळू, या कारणावरुन निवृत्तीनाथ आणि करण यांच्यात वाद सुरू झाला. हा वाद वाढत गेल्याने करण संतापला व त्याने त्याच्या हातातील बॅट निवृत्तीनाथच्या पायावर मारली. त्यामुळे निवृत्तीनाथ खाली वाकला, त्याचवेळी करणने पुन्हा निवृत्तीनाथच्या मानेवर बॅट मारली. बॅटच्या जोरदार प्रहारामुळे निवृत्तीनाथ खाली कोसळला आणि बेशुद्ध पडला.

त्याला तात्काळ अड्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्रसाद रामकृष्ण धरमसारे (वय २३ रा. चिखली) याच्या फिर्यादीवरुन अड्याळ पोलिसांनी आरोपी करण बिलवणे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राऊत करीत आहेत.

SCROLL FOR NEXT