Latest

कात्रज दूध संघाच्या अध्यक्ष पदी भगवान पासलकर बिनविरोध 

अमृता चौगुले
पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ तथा कात्रज दूध संघाच्या अध्यक्ष पदी वेल्हा तालुक्यातील संचालक भगवान पासलकर यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली. या निमित्ताने दुर्गम भागातील वेल्हा तालुक्यास प्रथमच अध्यक्षपद मिळाले आहे. तसेच बारामती लोकसभा मतदार संघाचा विचार करुन आणि तिस-यांदा संचालक म्हणून निवडून आलेल्या पासलकर यांच्या निवडीवर राष्ट्रवादी काँग्रेसने शिक्कामोर्तब केल्याचे स्पष्ट झाले आहे.
संघाच्या यापुर्वीच्या अध्यक्षा केशरताई पवार यांनी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला होता. विभागीय दुग्ध उप निबंधक व निवडणुकीचे अध्यासी अधिकारी डॉ. महेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली कात्रजच्या मुख्यालयात संचालक मंडळाची बैठक सुरु झाली. त्यामध्ये अध्यक्ष पदासाठी भगवान पासलकर यांचा एकमेव अर्ज आला. त्यामुळे त्यांची अध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याची माहिती कदम यांनी निवडीनंतर दिली.
पासलकर हे कात्रज दूध संघावर सलग तिस-यांदा निवडून आलेले आहेत. आजवर वेल्हा तालुक्यास कात्रजच्या अध्यक्षपदाची संधी कधी मिळाली नव्हती. पासलकर यांच्या निवडीमुळे जिल्हा दूध संघाचे अध्यक्षपद प्रथमच वेल्हा तालुक्यास मिळाल्याने कात्रजच्या मुख्यालयाबाहेर उपस्थित दूध उत्पादक शेतक-यांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला.

राष्ट्रवादीतर्फे बारामती मतदार संघास प्राधान्य

बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना ताकद मिळावी, यादृष्टिने वेल्हा तालुक्यास जिल्हा दूध संघाचे अध्यक्षपद देण्यास प्राधान्य देण्यात येणार अशी चर्चा अध्यक्ष पदाची निवडणूक लागल्यानंतर सातत्याने सुरु झाली होती. राष्ट्रवादीचे नेते आणि विधान सभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गेल्याच आठवड्यात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यामध्ये 16 पैकी 7 संचालकांनी अध्यक्षपदासाठी इच्छा व्यक्त केली होती. अखेर बारामती लोकसभा मतदार संघालाच अध्यक्ष निवडीत प्राधान्य देण्यात आल्याचे स्पष्ट झाले.  सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी सकाळी कात्रजच्या मुख्यालयात येऊन पक्षश्रेष्ठींनी बंद पाकिटातून दिलेले नांव संचालकांसमोर स्पष्ट केले होते. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया सुरु होऊन पासलकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे सर्व आमदार, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी कात्रज दूध संघाच्या अध्यक्ष पदी माझी निवड केली असून ही निवड मी सार्थ ठरवीन. कात्रजच्या सर्व संचालकांना बरोबर घेऊन संघाचे दूध संकलन वाढविणे आणि आर्थिक घडी सुरळित करुन संघाच्या नावलौकिकात भर टाकण्यावर मी लक्ष केंद्रित करणार आहे. तसेच जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतक-यांचे अधिकाधिक आर्थिक हित साधण्यास माझे प्राधान्य असेल.
– भगवान पासलकर , अध्यक्ष, कात्रज दूध संघ, पुणे.
हेही वाचा
SCROLL FOR NEXT