Latest

सोसवेना दुष्काळाच्या झळा! नाशिक विभागात ४८ शेतकऱ्यांनी संपविले जीवन

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पाचवीला पुजलेला दुष्काळ, डोक्यावर बँकांचा वाढत्या कर्जाचा बोजा व शेतमालाला मिळणारा कवडीमोल भाव अशा संकटात सापडलेला शेतकरी जीवनयात्रा संपवण्याचा मार्ग पत्करत आहे. नाशिक विभागात यंदा ४८ शेतकरी आत्महत्या झाल्या. घराचा कर्ता पुरुषच जीवन संपविण्यापर्यंत टोकाचा निर्णय घेत असल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डाेंगर कोसळत आहे.

अठराव्या लोकसभा निवडणुकीसाठी रणसंग्राम सुरू असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी राजकीय रण तापत आहे. लोकसभेच्या या धामधुमीत राज्यातील दुष्काळाकडे त्यातही जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाकडे शासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे सततची नापिकी, दुष्काळ, कुटुंबांची होणारी ससेहोलपट त्यातच अवकाळीचे दुष्टचक्र अशा चोहोबाजूंनी संकटात सापडत आहे. सर्व बाजूंनी दारे बंद झाल्याची भावना मनात निर्माण होत असल्याने सरतेशेवटी शेतकरी हा जीवन संपविण्यासारख्या निर्णयाप्रत पोहोचत आहे.

नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांत चालू वर्षी ४८ शेतकऱ्यांची जीवनयात्रा संपवण्याची नोंद झाली आहे. त्यामुळे सारासार विचार केल्यास महिन्याकाठी १२ शेतकरी कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. शासन दफ्तरी नोंदीनुसार विभागात जळगावमध्ये सर्वाधिक ३० शेतकरी  जीवनप्रवास संपवण्याची नोंद झाली आहे, तर धुळे व नगर जिल्ह्यांत अनुक्रमे ८ तसेच ७ शेतकऱ्यांनी जीवनप्रवास संपविला आहे. नंदुरबारला दोन व नाशिकला एक शेतकरी आत्महत्या झाली आहे. वाढत्या शेतकरी आत्महत्या ही राज्याच्या दृष्टीने चिंताजनक बाब आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची जीवनयात्रा संपवण्याच्या घटना रोखण्यासाठी शासनाने वेळीच पावले उचलण्याची गरज आहे.

राज्यात ४२७ शेतकऱ्यांचा जीवनप्रवास थांबला
गेल्यावर्षी पावसाने दडी मारल्यामुळे अवघ्या राज्यात सध्या दुष्काळ आ वासून उभा ठाकला आहे. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झालेली असताना शेतीपिके वाचवायची कशी असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. अस्मानी व सुल्तानी संकटात सापडलेला शेतकरी जीवनप्रवास संपविण्याचा निर्णय घेत आहेत. यंदाच्या वर्षी राज्यात ४२७ शेतकऱ्यांची जीवनयात्रा संपवण्याची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी १० महिन्यांतच दोन हजार ३६६ शेतकऱ्यांनी जीवनप्रवास संपविला.

यंदाच्या शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा, विभागवार संख्या अशी
अमरावती 175
छत्रपती संभाजीनगर 146
नागपूर 54
नाशिक 48
पुणे 04
काेकण 00
एकूण 427

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT