Latest

बेस्टचा प्रवास महागणार? साध्या बसचे तिकीट दोन, तर एसी बसचे चार रुपयांनी वाढण्याची चिन्हे

अनुराधा कोरवी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  मुंबईकरांची सेकंड लाईफलाईन मानल्या जाणार्‍या बेस्ट बसचा प्रवास महागण्याची शक्यता दिसत आहे. आर्थिक कोंडीत सापडलेले बेस्ट प्रशासन विविध पर्याय शोधूनही काहीच हाती न लागल्याने अखेर बसच्या दरवाढीच्या निर्णयाप्रत आल्याचे वृत्त आहे. याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसला तरी बेस्ट प्रशासनाने हा निर्णय घेतलाच तर साध्या बसच्या तिकिटात किमान दोन रुपये तर वातानुकुलित बसच्या तिकीट दरात चार रुपयांची वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मुंबई महापालिकेचा उपक्रम असलेल्या बेस्टच्या प्रशासनाने आर्थिक तोट्यात सापडल्यानंतर त्यातून बाहेर पडण्यासाठी महापालिकेकडे तीन हजार कोटींची आर्थिक मदत मागितली होती. दरवेळी वार्षिक अर्थसंकल्पात तरतूद करून बेस्टला मदत करणार्‍या महापालिकेने यावेळी मात्र हात वर केले आहेत. उलट महापालिकेने बेस्ट उपक्रमाला आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उत्पन्न वाढीचे काही पर्याय सुचवले असून, त्यात तिकिट दर वाढीस प्राधान्य देण्याबाबत बजावले आहे..

आर्थिक कोंडीच्या पार्श्वभूमीवर 2016-17 मध्ये बेस्टने पालिकेकडे अनुदानाची मागणी केली होती. तत्कालीन पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी बेस्टची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मदतीचा हात पुढे केला. यानंतरही वेळोवेळी महापालिकेने बेस्टला मदत केली. 2016 पासून आतापर्यंत पालिकेने बेस्ट उपक्रमास तब्बल 8 हजार 500 कोटी रुपयांची आर्थिक मदत केली. मात्र, आतापर्यंत केलेल्या या मदतीचा हिशोब बेस्ट उपक्रमाने पालिकेला दिलेला नाही. उलट बेस्टने पुन्हा महापालिकेकडे तीन हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत मागितली होती. मात्र, यावेळी पालिकेने ही मागणी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावत आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करा, असे बेस्ट उपक्रमास सुनावले आहे, असे सूत्रांकडून समजते.

स्वस्त प्रवासासाठी मुंबईकर बेस्टच्या प्रवासाला प्राधान्य देतात. तिकिट दर परवडणारे असल्याने दिवसाकाठी सुमारे 35 लाख मुंबईकर बेस्टने प्रवास करतात. असे असूनही बेस्टची आर्थिक स्थिती गेल्या काही वर्षापासून खालावलेली आहे. कर्मचार्‍यांचे पगार तसेच अन्य खर्चांमुळे बेस्टची आर्थिक कोंडी वाढतच आहे. आता तर आर्थिक संकटामुळे कर्मचार्‍यांची देणी देणेही शक्य नसल्याचे समोर आले आहे.

आता बेस्टपुढे तिकिट दरात वाढीशिवाय पर्याय नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ही दरवाढ झाल्यास बेस्टच्या साध्या बसचे किमान भाडे 5 वरून 7, तर एसी बसचे किमान भाडे 6 वरून 10 रुपये होईल.

बेस्टचे सध्याचे तिकीट दर

                             साधारण बस     एसी बस
5 किमी                      5 रुपये            6 रुपये
10 किमी                   10 रुपये        13 रुपये
15 किमी                    15 रुपये       19 रुपये
20 किमी व पुढे           20 रुपये        25 रुपये

SCROLL FOR NEXT