Latest

Bengaluru Cafe IED Blast : बंगळूरच्या कॅफेतील स्फोट हा ‘आयईडी बॉम्ब ब्लास्ट’? मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले…

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Bengaluru Cafe IED Blast : बंगळूरमधील रामेश्वरम कॅफेमध्ये शुक्रवारी (दि. 1) झालेला स्फोट हा बॉम्बस्फोट असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. या स्फोटात 9 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रकरणावर मोठा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, 'बंगळूरमधील रामेश्वरम कॅफेमधील स्फोट हा सिलेंडरचा स्फोट नसून आयईडीचा (IED) स्फोट असण्याची शक्यता आहे. तपासातून काही गोष्टी समोर येत आहेत. ज्यात कॅफेमध्ये कोणीतरी एक बॅग ठेवल्याचे समजते आहे. या बॅगेत आयईडी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कॅफेतील सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, पोलीस त्याचा तपास करत आहेत.'

तत्पूर्वी, कॅफेमध्ये झालेल्या स्फोटाच्या घटनेनंतर व्हाईटफिल्डच्या अग्निशमन केंद्राने सांगितले की, 'आम्हाला रामेश्वरम कॅफेमध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्याचा फोन आला होता. आम्ही घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. श्वानपथकासोबत फॉरेन्सिक तज्ज्ञांचे पथकही स्फोटाच्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा केले.'

रेस्टॉरंटच्या एका सुरक्षा रक्षकाने सांगितले की, 'मी कॅफेच्या बाहेर उभा होतो. अनेक ग्राहक रेस्टॉरंटमध्ये उपस्थित होते. अचानक मोठा आवाज झाला आणि आग लागली. त्यामुळे हॉटेलमधील ग्राहक जखमी झाले.'

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंदनहल्ली येथील रामेश्वरम कॅफेमध्ये दुपारी 1.30 ते 2 च्या दरम्यान स्फोट झाल्यानंतर ही आग लागली. माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. प्राथमिक तपासात सिलिंडरचा स्फोट झाल्याचे सांगण्यात आले होते. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही सर्व बाजूंनी या घटनेचा तपास करत आहोत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT