Latest

स्पंज बाथचे अनेक फायदे, जाणून घ्या त्याविषयी

Arun Patil

स्पंज बाथचा उपयोग हा बहुतांश वेळा आजारी किंवा अशक्त रुग्णांसाठी करण्यात येतो. स्पंज बाथसाठी टर्किश टॉवेल किंवा अन्य जाड कपड्यापासून तयार केलेले कापड आवश्यक आहे. याशिवाय रुग्णाला झाकण्यासाठी एका चादरीची गरज भासते.

रुग्णाचे संपूर्ण शरीर हे एका चादरीने झाकून टाका. आता भिजवलेला कपडा किंवा टॉवेल हा आजारी रुग्णाच्या शरीरावर फिरवा. यानुसार संपूर्ण शरीर ओल्या टॉवेलने पुसून काढा. त्यानंतर रुग्णाला एका अंगावर झोपण्यास सांगावे आणि त्याची पाठ, कंबर ही ओल्या कपड्याने सावकाश पुसावी. तसेच रुग्णाचा चेहरा आणि डोके पुसून कोरडे करा. त्यानंतर रुग्णाच्या शरीरावर चादर पुन्हा टाका.

रुग्णाची तब्येत पाहून पाण्याचे तापमान निश्चित करावे. रुग्णाला खूप ताप असेल, तर 18 ते 24 अंश सेल्सिअस तापमानाच्या पाण्याने स्पंज केल्यास ताप कमी होण्यास हातभार लागतो. गरम पाण्याने सतत स्पंज करत राहिल्यास शरीराची त्वचा ही उबदार राहू शकते. प्रसंगी तापही उतरू शकतो. अशा प्रकारचे स्नान हे औषध रूपाने वापरण्यासाठी पाण्याचे तापमान किमान दहा अंश सेल्सिअस असणे गरजेचे आहे. रुग्णाचे शरीर किमान पाच मिनिटांपर्यंत पुसायला हवे. हृदयविकार असलेल्या रुग्णास नियमितपणे स्पंज बाथ दिल्यास श्वसनक्रिया सुलभ राहते. शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण चांगले राहिल्याने रुग्ण उत्साही राहतो. डोकेदुखी आणि अंगदुखीदेखील कमी होते.

पायाला मुका मार असेल किंवा कंबर आखडली असेल तर गरम पाण्याने पुसल्यास आराम मिळतो. एकंदरीत, रुग्णाला दररोज स्पंज बाथ दिल्यास अनेक आजारांमध्ये दिलासा मिळतो आणि रुग्णाला आरामदायी वाटते.

डॉ. मनोज कुंभार

SCROLL FOR NEXT