पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंड संघाला नवा कसोटी कर्णधार मिळाला आहे. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स (Ben Stokes) इंग्लंड संघाचा नवा कसोटी कर्णधार असेल. जो रुटने संघाचे कर्णधारपद सोडले तेव्हापासून इंग्लंड क्रिकेटपुढे सर्वात मोठा प्रश्न होता की पुढचा कर्णधार कोण असेल? यासाठी बेन स्टोक्सचे नाव आघाडीवर होते. एका इंग्रजी वेबसाईटनुसार स्टोक्स इंग्लंडचा नवा कसोटी कर्णधार असेल. स्टोक्सच्या नियुक्तीला ईसीबीचे नवे व्यवस्थापकीय संचालक रॉब की यांनी मंगळवारी मान्यता दिली. नव्या कर्णधाराच्या नियुक्तीसह संघाच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी गॅरी कर्स्टन यांच्याकडे देण्यात आली आहे.
३० वर्षीय अष्टपैलू स्टोक्सने (Ben Stokes) ७९ कसोटीत ५,०६१ धावा केल्या असून १७४ बळी घेतले आहेत. २०१७ पासून तो दोन स्पेलमध्ये उपकर्णधार होता. आता इंग्लंडचा कायमस्वरूपी कर्णधार म्हणून स्टोक्सची पहिली कसोटी २ जून रोजी लॉर्ड्स येथे विश्वविजेत्या न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. ३१ वर्षीय फलंदाज जो रूट पाच वर्षांच्या कारकिर्दीनंतर पायउतार झाला, त्याने विक्रमी ६४ कसोटी सामन्यांत इंग्लंड संघाचे नेतृत्व केले.
गेल्या वर्षी पाकिस्तानविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत बेन स्टोक्सला (Ben Stokes) इंग्लंडचे कर्णधार बनवण्यात आले होते. त्यावेळी संघातील बहुतांश खेळाडू कोविड-१९ पॉझिटिव्ह असल्याने खेळण्यास योग्य नव्हते. त्यानंतर संघाने मालिकाही ० विरुद्ध ० ने जिंकली. २०२० मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत त्याने कर्णधारपद भूषवले होते. या कसोटी सामन्यात इंग्लंडचा पराभव झाला होता. पण त्याने जोफ्रा आर्चर आणि मार्क वुड यांच्यासह गोलंदाजी करत चांगलीच छाप पाडली होती.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील पराभवानंतर जो रूटने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अष्टपैलू बेन स्टोक्स या पदासाठी प्रबळ दावेदार होता. गुरुवारी लॉर्ड्सवर ईसीबीचे व्यवस्थापकीय संचालक रॉब औपचारिकपणे मीडियाशी संवाद साधणार आहेत. इंग्लंडची पुढील कसोटी मालिका न्यूझीलंड विरुद्ध २ जूनपासून सुरू होणार आहे, तर संघ मर्यादित षटकांच्या मालिकेत नेदरलँडशी भिडणार आहे.
दरम्यान, टेलिग्राफच्या वृत्तानुसार, कसोटीचे नवे प्रशिक्षक म्हणून गॅरी कर्स्टन आणि सायमन कॅटिच आघाडीवर आहेत. कर्स्टन यांच्या कोचिंगमध्ये टीम इंडियाने २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. ईसीबीने कसोटी आणि मर्यादित षटकांच्या दोन्ही प्रशिक्षकांसाठी स्वतंत्र अर्ज केले आहेत. इंग्लंड संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्याची ६ मे ही शेवटची तारीख आहे. यापूर्वी २०१२-२०१४ दरम्यान इंग्लंडकडे दोन स्वतंत्र प्रशिक्षक होते. अँडी फ्लॉवर कसोटी संघाची धुरा सांभाळत होते तर ऍशले जाईल्स टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांसाठी प्रशिक्षक होते.
संघाचा कर्णधार बनवण्यापूर्वी बेन स्टोक्सने (Ben Stokes) मोठी मागणी केली आहे. रिपोर्ट्सनुसार, बेन स्टोक्सला पुन्हा एकदा जेम्स अँडरसन आणि ब्रॉडला संघात घ्यायचे आहे. वाढत्या वयामुळे हे दोन्ही खेळाडू संघाबाहेर आहेत. जेम्स अँडरसन हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा वेगवान गोलंदाज आहे. याशिवाय ब्रॉड हा इंग्लंडचा कसोटीतील दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे.