Latest

उमलण्यापूर्वी खुडल्या जातायत कळ्या..!

backup backup

कराड : अशोक मोहने

समाज कितीही शिक्षित झाला तरी 'वंशाचा दिवा' या मानसिकतेतून तो बाहेर पडताना दिसत नाही. आज लग्नासाठी मुली मिळत नाहीत म्हणून वरबाप मुलींच्या घरचे उंबरे झिजवत असल्याचे चित्र एका बाजूला दिसत असताना दुसर्‍या बाजूला मुलगाच हवा हा अट्टाहास कायम दिसत आहे. विशेष म्हणजे मुलगाच हवा ही मानसिकता स्त्रियांमध्ये अधिक दिसून येते. या मानसिकतेतूनच मुलगा- मुलगी लिंग प्रमाण वाढत असून सातारा जिल्ह्यात एक हजार मुलांमागे 912 एवढे मुलींचे प्रमाण आहे. शासकीय रुग्णालयात जन्माला आलेल्या बालकांचे हे लिंग प्रमाण आहे.

एप्रिल 2021 ते मार्च 2022 या वर्षाचा विचार करता सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्याचा अपवाद वगळता अन्य दहा तालुक्यात मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे.

कोरेगाव, माण, पाटण, फलटण, येथे स्त्री- पुरुष लिंग भेदाचे प्रमाण अधिक आहे. माण तालुक्यात लिंग भेद प्रमाण अन्य तालुक्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. सरकारी रुग्णालयात वर्षभरात येथे 145 मुले व 118 मुली जन्माला आल्या आहेत. म्हणजे येथे लिंग प्रमाण हजारी मुलांमागे 814 एवढे आहे. पाटण तालुक्यात 346 मुले तर 294 मुली जन्माला आल्या आहेत. एक हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण 858 एवढे कमी आहे. यानंतर कोरेगाव तालुक्याचा नंबर लागतो. येथे 260 मुले तर 227 मुली जन्माला आल्या आहेत. तेथे लिंग प्रमाण हजारी मुलांमागे 837 एवढे आहे.

फलटण तालुक्यात 190 मुले तर 167 मुली जन्माला आल्या आहेत. या तालुक्यात लिंग प्रमाण हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण 879 एवढे आहे. मोठी शहरे म्हणून ओळखले जाणारे कराड, सातारा तालुक्यातही लिंग प्रमाण अधिक आहे. कराड तालुक्यात 1646 मुले तर 1494 मुली जन्माला आल्या आहेत. तालुक्यात लिंग प्रमाण एक हजार मुलांमागे 908 मुली असे आहे. तर सातारा तालुक्यात सरकारी व खासगी रूग्णालयात मिळून 19 हजार 398 मुले तर 17 हजार 691 मुली जन्माला आल्या आहेत. येथे लिंग प्रमाण एक हजार मुलांमागे 912 एवढे आहे.

जावळी तालुक्यात 78 मुले तर 75 मुली जन्माला आल्या आहेत. खंडाळा तालुक्यात 189 मुले तर 180 मुली जन्माला आल्या आहेत. महाबळेश्वर तालुक्यात 65 मुले व 60 मुली तर वाई तालुक्यात 175 मुले व 159 मुली जन्माला आल्या आहेत. ही आकडेवारी सरकारी रूग्णालयात जन्माला आलेल्या बालकांची आहे. खासगी रूग्णालयात जन्माला आलेल्या बालकांमध्ये मुलांचे प्रमाण मुलींच्या तुलनेत अधिक आहे. वाढत्या लिंग भेद प्रमाणाला समाजाची मानसिकता जबाबदार आहे. कर्नाटक बॉर्डरवर जाऊन काही जण अ‍ॅबोर्शन करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यात हे प्रकार सुरू आहेत. मात्र तक्रारदार पुढे येत नसल्याने कारवाई करता येत नसल्याचे आरोग्य विभागातून सांगण्यात आले. आजही उमलण्या आधिक कळ्या खुडल्या जात आहेत.

खटाव तालुक्यात मुलांच्या तुलनेत मुली अधिक..

सातारा जिल्ह्यात दहा तालुक्यांत मुली जन्माला येण्याचे प्रमाण कमी आहे. मात्र खटाव तालुक्यात मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण अधिक आहे. येथे सरकारी दवाखान्यात वर्षभरात 250 मुले तर 265 मुली जन्माला आल्या आहेत. ही बाब समाधानकारक मानली जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT