Latest

ब्राईट लिपस्टिक लावताना ‘ही’ घ्या काळजी, मेकअप दिसेल परफेक्ट

मोहन कारंडे

ओठांचा रंग गडद असेल तर लिपग्लॉस वापरणे टाळावे. लिपग्लॉस वापरायचे असेल तर ओठांवर आधी पावडर लावा मग लिपग्लॉस लावावे.

लिपस्टिकमुळे मेकअप पूर्ण होतो. अर्थात, त्यासाठी महत्त्वाचे आहे ते योग्य रंगातील लिपस्टिक निवडणे. हल्ली जरा गडद किंवा ब्राईट लिपस्टिकचे रंग पसंत केले जातात. मात्र, ब्राईट रंगाची लिपस्टिक लावताना काही गोष्टी जरूर लक्षात ठेवाव्यात.

चेहर्‍याच्या मेकअपमध्ये एक गोष्ट महत्त्वाची असते ती म्हणजे लिपस्टिक. उत्तम सुयोग्य लिपस्टिक लावल्यास मेकअप अधिक खुलून दिसतो. हल्ली लिपस्टिकच्या चमकदार रंगांना पसंती दिली जाते. पण, ब्राईट रंगाची लिपस्टिक वापरताना काही गोष्टींचे भान जरूर बाळगले पाहिजे जेणेकरून आपला मेकअप परफेक्ट दिसेल.

ओठ योग्य असावे : चेहर्‍याच्या मेकअपसाठी जरा आपण बेस लावून चेहरा तयार करून घेतो त्याचप्रमाणे ओठाला लिपस्टिक लावण्याआधी ओठही तयार करून घ्यावे लागतात. ओठ जर कोरडे पडले असतील, साले निघत असतील किंवा फाटत असतील तर लिपस्टिक लावल्यानंतरही ते सुंदर दिसणार नाहीत. त्यासाठी ओठांवरील मृत त्वचा काढून टाकून ओठ एक्सफॉलिएट करावे. त्यासाठी काही लगेच ब्युटिपार्लरमध्येच जायला हवे असेही नाही. घरच्या घरी ऑलिव्ह ऑईल आणि साखरेचा वापर करू शकतो. हे दोन्ही एकत्र करून तयार झालेले स्क्रब ओठांवर लावा. स्क्रब केल्यानंतर ओठ स्वच्छ पाण्याने धुवावेत. मऊ कापडाने पुसावेत. त्यानंतरच लिपस्टिक लावावी.

लिपस्टिक कोणत्या रंगाची लावावी : हल्ली ब्राईट रंगाची निवड केली जाते. जसे लाल, केशरी, गुलाबी, जांभळा या रंगांमध्ये अनेक रंगछटा उपलब्ध आहेत. म्हणजे लाल रंगात आपल्याला टोमॅटोच्या लाल रंगापासून ते अगदी गडद लाल रंगापर्यंतच्या रंगछटा मिळू शकतात, पण ओठांचे सौदर्य वाढावे यासाठी आपल्या त्वचेच्या रंगछटेनुसारच लिपस्टिकच्या रंगाची छटा निवडावी. असे केल्यास लिपस्टिकचा रंग चेहर्‍यावर उठून दिसेल.

लिपलायनरही लावावे : ब्राईट रंगाचा वापर करताना लिपलायनरचा वापर करावा. त्यामुळे ओठांना उत्तम आकार मिळतो तसेच लिपलायनर ओठाला लावल्याने लिपस्टिक जास्त वेळ टिकते. एवढेच नव्हे तर ओठ पातळ असतील तर लिपलायनरच्या वापरामुळे ओठ मोठेही वाटतात.

चेहर्‍याच्या मेकअपकडे लक्ष द्यावे : ओठांवर ब्राईट रंगाची लिपस्टिक लावताना चेहर्‍याच्या मेकअपकडेही लक्ष द्यावे. पार्टीसाठी जाताना ब्राईट लिपस्टिक आणि स्मोरी आईज हा लूक उत्तम दिसतो. ब्राईट लिपस्टिक लावल्यानंतर ओठांवर अधिक लक्ष जाते ते साहजिकच आहे. त्यासाठी फेस मेकअपमध्ये पीच किंवा फिक्या रंगांचा वापर करावा. त्यामुळे मेकअप लूक संतुलित होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT