Latest

Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही हायब्रीड मॉडेल?

Arun Patil

मुंबई, वृत्तसंस्था : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड पुन्हा एकदा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला गुडघे टेकायला लावण्याच्या तयारीत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy) 2025 चे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. त्याची तयारीदेखील पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून सुरू आहे; परंतु भारत पाकिस्तानमध्ये येईलच याची पीसीबीला खात्री नाही, त्यामुळे या स्पर्धेसाठीही आशिया चषकप्रमाणे हायब्रीड मॉडेल राबवण्याची तयारी पीसीबी करीत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

पाकिस्तानातील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पीसीबी अध्यक्ष जका अशरफ आणि अमिरात क्रिकेट बोर्डाचे उपाध्यक्ष खालिद अल जुरानी यांच्यात नुकताच संवाद झाला. भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात न आल्यास टीम इंडियाचे काही सामने यूएईमध्ये हलवण्यासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली. अशरफ आणि खालिद यांच्या संवादात चॅम्पियन्स ट्रॉफीचा उल्लेख झालेला नाही. पाकिस्तान यजमानपद भूषवत असलेल्या काही क्रिकेट स्पर्धांमध्ये यूएई संपूर्ण साहाय्य करेल, असा चर्चेचा सूर होता.

बीसीसीआयने आपला संघ पाकिस्तानच्या दौर्‍यावर न पाठवल्यास त्या परिस्थितीत होणारा अतिरिक्त खर्च आयसीसीला करावा लागेल. चॅम्पियन्स ट्रॉफीतील काही सामने यूएईमध्ये खेळवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मात्र, याबद्दलचा निर्णय तेव्हाच्या परिस्थितीवर अवलंबून असेल. एखाद्या संघाने पाकिस्तान दौर्‍यावर येण्यास नकार दिल्यास आयसीसीने निष्पक्ष निर्णय घ्यावा, अशा शब्दांत पीसीबीने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. (Champions Trophy)

गेल्या आठवड्यात आयसीसीने दुबईतील मुख्यालयात एक बैठक आयोजित केली होती. त्यात पीसीबीसोबत चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या यजमानपदाशी संबंधित कागदपत्रांवर स्वाक्षर्‍या झाल्या. त्यामुळे पाकच्या यजमानपदावर शिक्कामोर्तब झाले. चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारी करत असलेल्या पाकिस्तानला बीसीसीआयची भीती वाटू लागली आहे.

SCROLL FOR NEXT