Latest

बीसीसीआयकडून आनंदवार्ता! ऋषभ पंत, बुमराहसह पाच खेळाडू फिट

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने सध्या बंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये फिटनेसवर काम करत असलेल्या पाच भारतीय खेळाडूंच्या वैद्यकीय आणि तंदुरुस्तीबाबत महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. बीसीसीआयने शुक्रवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जसप्रीत बुमराह, प्रसिद्धी कृष्णा, केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत या पाच खेळाडूंच्या वैद्यकीय आणि तंदुरुस्तीबद्दल तपशीलवार माहिती दिली. त्यानुसार बुमराह, अय्यर आणि केएल राहुल पुन्हा एकदा पूर्णपणे तंदुरुस्त होण्याच्या मार्गावर आहेत आणि ते आगामी काळात संघासाठी खेळण्यासाठी सज्ज असतील.

भारतीय संघाला गेल्या काही महिन्यांमध्ये मोठा फटका बसला होता, कारण संघातील पाच महत्वाचे खेळाडू हे दुखापतीमुळे खेळू शकत नव्हते. त्यामुळे या खेळाडूंच्या दुखारपतींवर उपचार सुरु करण्यात आले आणि त्यांना पुनर्वसनासाठी बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पाठवण्यात आले. या अकादमीमध्ये खेळाडूंच्या दुखापती बऱ्या झाल्यावर त्यांच्या फिटनेसवर काम करायला सुरुवात झाली होती आणि आता अकादमीला या पाचही खेळाडूंवर केलेल्या मेहनतीचे फळ मिळाले आहे. हे पाचही खेळाडू आता पूर्णपणे फिट झाले असून त्यांनी सरावाला जोरदार सुरुवात केली आहे.

ऋषभ पंत लवकरच भारतीय संघात पुनरागमन करू शकतो

बीसीसीआयच्या माहितीनुसार ऋषभ पंत लवकरच भारतीय संघात पुनरागमन करू शकतो. पंत डिसेंबर 2022मध्ये झालेल्या कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्याच्या गुडघ्याला चांगलीच दुखापत झाली होती, ज्यातून तो अद्याप पूर्णपणे सावरला नाहीये. असे असले तरी, पंतने आता फलंदाजी आणि यष्टीरक्षण करायला पुन्हा सुरुवात केली आहे, असे बीसीसीआयने सांगितले. पंत आपल्या फिटनेसची माहिती अधिकृत सोशल मीडिया खात्यावरूनही चाहत्यांपर्यंत पोहोचवत असतो. ऋषभ पंत (Rishabh Pant) अपेक्षेपेक्षा चांगल्या पद्धतीने स्वतःमाध्ये सुधारणा करत असल्याचेही सांगितले जात आहे.

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) हे भारतीय संघाचे दोन वेगवान गोलंदाज मागच्या मोठ्या काळापासून संघातून बाहेर आहेत. बुमराहने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना सप्टेंबर 2022मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. तसेच प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) याने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ऑगस्ट 2022मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध खेळला होता. हे दोन्ही गोलंदाज बेंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत मागच्या काही महिन्यांपासून फिटनेस मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत.

बीसीसीआयकडून मिळाल्या माहितीनुसार दोन्ही वेगवान गोलंदाजांनी चांगली फिटनेस मिळवली आहे आणि रिहॅबच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. एनसीएकडून आयोजित केल्या जाणाऱ्या काही सराव सामन्यांमध्ये हे दोघेही खेळतील. या सामन्यातील प्रदर्शानंतर बीसीसीआय त्यांच्यातील सुधारणा तपासून पाहील आणि त्यावरून पुढचा निर्णय घेतला जाईल.

केएल राहुल (KL Rahul) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) हे दोघेही मागच्या काही महिन्यांपासून एनसीएसमध्ये सराव करत आहेत. राहुल आयपीएल 2023 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सचे नेतृत्व करत होता. पण लीगदरम्यानच त्याला दुखापत झाल्याने अर्ध्या हंगामातून माघार घेतली होती. दुसरीकडे श्रेयस अय्यर यावर्षी ऑस्ट्रेलियन संघ बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी भारतात आला होता. मालिकेतील चौथ्या सामन्यात अय्यरला पाठीची दुखापत उद्भवली आणि त्याला मैदान सोडावे लागले. असे असले तरी, यांनीही नेट्समध्ये फलंदाजीला सुरुवात केली आहे आणि मेडिकल टीम त्यांच्यातील सुधारणा पाहून समाधानी आहे. आगामी काळात या पाचही खेळाडूंचा फिटनेस भारतीय संघासाठी महत्वाची असणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT