Latest

बीसीए, बीबीए, बीएमएस अभ्यासक्रमांना आता व्यावसायिक दर्जा!

दिनेश चोरगे

कोल्हापूर : बीबीए, बीसीए, बीएमएस अभ्यासक्रमांना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) व्यावसायिक दर्जा दिला आहे. इंजिनिअरिंग, फार्मसीप्रमाणेच विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) द्यावी लागणार आहे. राज्यातील सुमारे 90 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.

बॅचलर इन मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस), बॅचलर इन कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन (बीसीए), बॅचलर इन बिझनेस अडमिनिस्ट्रेशन (बीबीए) अभ्यासक्रमांचे नियमन व शुल्क आकारणी विद्यापीठाकडून केली जाते. बारावी परीक्षेतील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. आता मात्र 'एआयसीटीई'कडून या अभ्यासक्रमांना व्यावसायिक दर्जा दिला गेला आहे.

'यूजीसी', उच्च व तंत्रशिक्षण विभागाने या अभ्यासक्रमांचे नियमन 'एआयसीटीई' कायद्यानुसार करावे, अशा सूचना सर्वच विद्यापीठांना दिल्या आहेत. यानुसार उच्चशिक्षण विभागाने कार्यवाहीस प्रारंभ केला आहे. 'यूजीसी'च्या सूचनेनुसार, राज्याच्या 'सीईटी' सेलकडे यासंदर्भात विचारणा करण्यात आली आहे. बीबीए, बीसीए, बीएमएस अभ्यासक्रमांच्या शुल्क निश्चितीसाठी शुल्क नियमन प्राधिकरणाकडे (एफआरए) प्रस्ताव पाठविला जाणार आहे. या प्रस्तावास मान्यता मिळाल्यास 2025 पासून या अभ्यासक्रमांचे प्रवेश 'सीईटी'द्वारे दिले जाण्याची शक्यता आहे.

बीबीए, बीसीए, बीएमएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशाबाबतची नियमावली तंत्रशिक्षण संचालनालयाने शासनाकडे मान्यतेसाठी सादर करून सीईटी सेलला कळवावे. या अभ्यासक्रमांच्या नवीन संस्था सुरू करणे आणि विद्यमान संस्थेत हे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी शासनाचे 'ना हरकत' प्रमाणपत्र घेण्यासाठी तंत्रशिक्षण सहसंचालक यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना काढले आहेत.

'एआयसीटीई'ने बीबीए, बीसीए, बीएमएस अभ्यासक्रमांबाबत घेतलेला निर्णय योग्य नाही. यामुळे महाविद्यालयांत सुरू असलेले हे कोर्सेस बंद पडतील. सरकारच्या नियम, अटी पाहता, पायाभूत सुविधा पुरविण्याची महाविद्यालयांकडे क्षमता नाही. यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. यासंदर्भात शैक्षणिक संस्थांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
– डॉ. व्ही. एम. पाटील,
प्राचार्य, न्यू कॉलेज, कोल्हापूर

SCROLL FOR NEXT