पुढारी ऑनलाईन डेस्क : Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत पाकिस्तान महिला क्रिकेट संघाने निराशाजनक कामगिरी केली असून त्यांना आपल्या देशात रिकाम्या हाताने परतावे लागले आहे. सोमवारी (दि. 25) बांगलादेशसोबत झालेल्या सामन्यात पाकिस्तानला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आणि कांस्यपदक जिंकण्याची संधीही गमावली. एवढेच नाही तर थेट उपांत्यपूर्व फेरी गाठल्यानंतर पाकिस्तानी संघ एकही सामना जिंकू शकला नाही आणि पदक जिंकण्यापासून वंचित राहिला. दुसरीकडे भारतीय संघाने सुवर्णपदकावर मोहोर उमटवून इतिहास रचला आहे.
बांगलादेशने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या गोलंदाजांनीही हा निर्णय योग्य ठरवत पाकिस्तानी फलंदाजांना लोटांगण घालण्यास भाग पाडले. बांगलादेशी मा-यापुढे पाकचा संपूर्ण संघ 20 षटकात 9 बाद केवळ 64 धावाच करू शकला. आलिया रियाझने पाकिस्तानसाठी सर्वाधिक 17 धावांची खेळी केली. त्यांच्या चार फलंदाजांनाच दुहेरी आकडा गाठता आला. बांगलादेशकडून शोर्ना अख्तरने 3, संजीदा अख्तर मेघलाने 2, मारुफा अख्तर, नाहिदा अख्तर आणि राबेया खानने प्रत्येकी 1 बळी घेतला. यानंतर बांगलादेशने 18.2 षटकात 5 विकेट आणि 10 चेंडू राखून 65 धावांचे माफक लक्ष्य गाठले आणि ब्रान्झ पदकाची कमाई केली. शोर्ना अख्तरने सर्वाधिक नाबाद 14 धावा केल्या. पाकिस्तानकडून नशरा संधूने 3, सादिया इक्बाल आणि कर्णधार निदा दारने प्रत्येकी 1 बळी घेतला.
9 वर्षापूर्वी 2014 च्या इंचियॉन आशिया क्रीडा स्पर्धेत पाकिस्तानने बांग्लादेशचे सुवर्ण पदक जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळवले होते. यावेळी बांग्लादेशने ब्रान्झ पदकाच्या लढतीत पाकिस्तानला मात देऊन 9 वर्षांपूर्वी झालेल्या पराभवाचा बदला एकप्रकारे बदलाच घेतला.