Latest

राज्यात काही मतदारसंघात बॅलेट पेपरवर मतदान

दिनेश चोरगे

मुंबई :  ईव्हीएम नको, बॅलट पेपरवर मतदान घ्या, ही विरोधकांची मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाने फेटाळली असली, तरी महाराष्ट्रातील काही आणि त्यातही मराठवाड्यातील लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारसंख्या वाढल्यास ईव्हीएम रद्द होऊन बॅलट पेपरवर मतदान होणे शक्य आहे.

ईव्हीएम यंत्राची क्षमता केवळ 384 उमेदवारांच्या नोंदणीचीच असल्यामुळे त्यापुढे एकजरी उमेदवार वाढला, तर संबंधित मतदारसंघात बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी लागेल, असे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी स्पष्ट केले.

मराठा बांधवांच्या सग्यासोयर्‍यांनाही आरक्षण मिळण्याबाबत सरकारने ठोस निर्णय अद्याप घेतलेला नाही. याविरोधात या आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून 25 मराठा उमेदवार उभे करण्याचा इशारा दिला आहे.
केेंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रातील तयारीची माहिती देण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने बोलावलेल्या पत्रकार परिषदेत याकडे लक्ष वेधले असता चोकलिंगम म्हणाले, उमेदवार संख्या मर्यादेपेक्षा वाढल्याने यापूर्वीही बॅलेट पेपरचा वापर करण्यात आला होता. महाराष्ट्रात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास संबंधित ठिकाणी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याबाबत विचार केला जाईल.

राज्यातील मतदार संख्या (15 मार्च 2024)

पुरुष – 4 कोटी 78 लाख 50 हजार 789
महिला – 4 कोटी 41 लाख 74 हजार 722
तृतीयपंथी – 5 हजार 559
एकूण – 9 कोटी 20 लाख 31 हजार 070
(5 लाख 99 हजार 166 दिव्यांग मतदारांचा समावेश आहे.)

एकूण मतदान केंद्रे 97 हजार 325

18 ते 29 वयोगट नवमतदार 1 कोटी 78 लाख 84 हजार 862
85 वर्षांवरील मतदार 13 लाख 15 हजार 166
100 वर्षांवरील मतदार 52 हजार 908

ईव्हीएमची तयारी पूर्ण

महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांपैकी 38 मतदारसंघातील काही ठिकाणांची निवडक मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. अशा ठिकाणी पुरेसा बंदोबस्त ठेवला जाईल. राज्यातील सर्व मतदारसंघात ईव्हीम-व्हिव्हीपॅटचा वापर केला जाईल. या सर्व यंत्रांची तपासणी पूर्ण करण्यात आलेली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT