Latest

बाळासाहेबांची शिवसेना भाजपकडे करणार मोठी मागणी; पुण्यात एकत्र लढायचं असेल तर…

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुणे महापालिका निवडणुकीत भाजपसोबत आघाडी होण्याची शक्यता असून, आम्ही 40 जागांची मागणी करणार असल्याचे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील या पक्षाच्या वतीने पुणे शहरातील शिवसैनिकांचा पहिला जाहीर मेळावा रविवारी (ता. 4) दुपारी चार वाजता नाना पेठेतील महात्मा फुले हायस्कूल (अहिल्याश्रम) येथे आयोजित करण्यात आला आहे. कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सोबतच खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, पक्षाचे विधीमंडळाचे प्रतोद भरत गोगावले, माजी मंत्री विजय शिवतारे, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के हे देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मेळाव्याची माहिती देण्यासाठी भानगिरे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. पक्षाचे पुण्याचे सहसंपर्क प्रमुख अजय भोसले, युवासेनेचे प्रदेश सचिव किरण साळी यावेळी उपस्थित होते.

राज्यात सत्ता आल्यानंतर पक्षाच्या वतीने पुण्यात पहिल्यांदाच मेळावा घेण्यात येत असून, त्यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी सुरू झाली आहे. येत्या महापालिका निवडणुकीत मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून आणण्यासाठी त्यांनी पक्षबांधणीवर जोर दिला आहे. भानगिरे म्हणाले, गेल्या तीन महिन्यांत आम्ही पक्षाची पुण्यात चांगली बांधणी केली. विधानसभेच्या आठही मतदारसंघांत पदाधिकारी नेमले. वॉर्डस्तरीय रचना करीत पदाधिकारी नियुक्त केले. अनेकजण पक्षप्रवेशासाठी इच्छुक आहेत. त्यापैकी काहीजण मेळाव्यात पक्षात येतील.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी म्हणजेच 23 जानेवारी रोजी सारसबागेसमोर पक्षाचे नवे कार्यालय सुरू करणार आहोत. त्यादिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रित करणार असून, पुण्यातील अनेक प्रमुख कार्यकर्ते, काही माजी नगरसेवक त्यावेळी पक्षात प्रवेश करतील, असे भानगिरे यांनी सांगितले.

पुण्यातील प्रश्नांविषयी मुख्यमंत्री बैठक घेणार

पुण्यातील प्रश्नांची सोडवणूक करून विकासकामे करण्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष आहे. चांदणी चौकातील प्रकल्पाला त्यांनी स्वतः पाहणी करून गती दिली, असे नाना भानगिरे यांनी सांगितले. पुणे शहरातील सर्व प्रश्नांबाबत येत्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांसोबत मुंबईत बैठक घेणार आहोत. समान पाणीपुरवठा योजनेत मीटर न बसविता पाणी देण्याची मागणी आम्ही करणार आहोत. पालकमंत्री, बाळासाहेबांची शिवसेना व भाजप पदाधिकारी बैठकीला उपस्थित असतील.

SCROLL FOR NEXT