Latest

World Wrestling Championship : डोके फुटले तरीही कांस्यपदक जिंकले

Arun Patil

बेलग्रेड, वृत्तसंस्था : भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाने बेलग्रेड येथे सुरू असलेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत (World Wrestling Championship) कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. जागतिक कुस्ती स्पर्धेत चार पदके जिंकणारा बजरंग हा एकमेव भारतीय कुस्तीपटू आहे. यापूर्वी बजरंगने 2013 मध्ये कांस्य, 2018 मध्ये रौप्य आणि 2019 मध्ये पुन्हा कांस्यपदक जिंकले होते.

डोक्याला दुखापत झाली असतानाही खेळत राहिला

जागतिक कुस्ती स्पर्धेच्या या मोसमात बजरंगने 65 किलो वजनी गटात पोर्तो रिकोच्या सेबॅस्टियन रिवेराचा 11-9 असा पराभव केला. विशेष म्हणजे बजरंग आधीच्या लढतीत जखमी झाला होता, त्याच्या डोक्याला दुखापत झाली असतानाही तो स्पर्धेत खेळत राहिला. बजरंग व्यतिरिक्त महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिने चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले आहे.

बजरंगला रिपेचेजमध्ये पदक जिंकण्याची संधी मिळाली (World Wrestling Championship)

जागतिक कुस्ती स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात बजरंगला पराभव पत्करावा लागला होता, पण त्याला रिपेचेजमध्ये कांस्यपदक जिंकण्याची संधी मिळाली. रिपेचेजच्या पहिल्या सामन्यात त्याने आर्मेनियन कुस्तीपटू व्हेजगेन टेवान्यानचा पराभव केला. याआधी बजरंगला सलामीच्याच सामन्यात त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती, पण तरीही त्याने स्पर्धेत राहण्याचा निर्णय घेतला. ब्राँझ मेडल प्ले ऑफ सामन्यात बजरंग 6-0 ने पिछाडीवर होता, पण नंतर सामन्यात परतत 11-9 अशा गुण फरकाने विजय मिळवला.

30 जणांचा संघ, पदके फक्त दोनच

बजरंग व्यतिरिक्त भारतातील अनेक महिला आणि पुरुष कुस्तीपटू जागतिक कुस्ती स्पर्धेत सहभागी होत आहेत. भारताने या चॅम्पियनशिपसाठी ग्रीको-रोमन, फ्रीस्टाईल आणि महिला कुस्तीच्या 30 प्रकारांमध्ये एकूण 30 कुस्तीपटू पाठवले होते, त्यापैकी आतापर्यंत फक्त दोनच पदके जिंकली आहेत. बजरंग आणि विनेश फोगट व्यतिरिक्त, सागर जगलान (74 किलो), नवीन मलिक (70 किलो) आणि निशा दहिया (68 किलो) यांचा कांस्यपदकासाठी सामना झाला होता; परंतु त्यांना यश मिळवता आले नाही. याशिवाय राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता रवी दहिया याला स्पर्धेच्या सुरुवातीलाच धक्का बसला. त्याला उपांत्यपूर्व फेरीतच पराभव पत्करावा लागला.

SCROLL FOR NEXT