Latest

कला : ध्यासपर्वाची अखेर!

Arun Patil

जवळपास सव्वाशेहून अधिक हिंदी-मराठी चित्रपट, 20-25 मालिका, तेवढेच टी.व्ही. आणि गेम शोज्चं कला दिग्दर्शन, शेकडो राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय इव्हेंटस्चं आयोजन, 'राजा शिवछत्रपती', 'बाजीराव मस्तानी'सारख्या भव्यदिव्य मालिका, 'बालगंधर्व', 'अजिंठा'सारख्या दर्जेदार चित्रपटांची डोळे दीपवणारी निर्मिती. प्रचंड आणि तरीदेखील आशयसमृद्ध असं काम नितीन देसाई उण्यापुर्‍या 58 वर्षांच्या आयुष्यात करून गेले.

आठ ऑगस्ट 2011. स्थळ – जुहूचं जे. डब्ल्यू. मॅरिएट हे पंचतारांकित हॉटेल. प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आयुष्यावर मी लिहिलेल्या 'आधुनिक युगाचा विश्वकर्मा-नितीन चंद्रकांत देसाई' या पुस्तकाचं प्रकाशन सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या हस्ते अतिशय थाटामाटात झालं होतं. यावेळी बच्चन यांनी नितीनदादांच्या कला दिग्दर्शनाची थोरवी सांगणारं अत्यंत हृदयस्पर्शी असं भाषण केलं होतं. नितीनदादा आणि अमिताभ बच्चन दोघेही श्रद्धाळू. त्यामुळे नितीनदादा एकदा शूटिंगच्या निमित्तानं बाहेरगावी गेले असता तिथून त्यांनी काही देवतांच्या मूर्ती आपल्या सोबत आणल्या होत्या. त्याच सुमारास अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती'चं चित्रीकरण सुरू होतं आणि त्याचा भव्य सेट नितीनदादांनी गोरेगावच्या चित्रनगरीत उभारलेला होता. त्यानिमित्तानं दादा आणि अमिताभजी यांचे धागे आणखीनच घट्ट झाले होते.

एका भेटीत नितीनदादांनी आपल्यासाठी आणलेल्या काही मूर्ती अमिताभना भेट दिल्या. या भेटीचा उल्लेख पुस्तक प्रकाशन सोहळ्यात करताना अमिताभ आपल्या भाषणात म्हणाले होते, 'नितीननं आणलेल्या त्या मूर्ती अजूनही माझ्या देवघरात आहेत. त्यामुळे दररोज या मूर्तींची पूजा करताना मला नितीनची आणि पर्यायानं त्यानं केलेल्या कामाची आठवण होते आणि कायम होत राहील!'

नितीनदादांच्या कामाची थोरवी सांगण्यासाठी हा एकच प्रसंग खरं तर पुरेसा ठरावा. नितीनदादांवरील चरित्रलेखनाच्या निमित्तानं माझ्याकडील आठवणींची पोतडीदेखील गच्च भरली आहे. केवढं कर्तृत्व होतं या माणसाचं. जवळपास सव्वाशेहून अधिक हिंदी-मराठी चित्रपट, 20-25 मालिका, तेवढेच टी.व्ही. आणि गेम शोज्चं कला दिग्दर्शन, शेकडो राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय इव्हेंटस्चं आयोजन, 'राजा शिवछत्रपती', 'बाजीराव मस्तानी'सारख्या भव्यदिव्य मालिका, 'बालगंधर्व', 'अजिंठा'सारख्या दर्जेदार चित्रपटांची डोळे दीपवणारी निर्मिती. शेकडो कलाकार एकत्रितपणे संपूर्ण जीवनात करू शकणार नाहीत, एवढं प्रचंड आणि तरीदेखील आशयसमृद्ध असं काम नितीनदादा उण्यापुर्‍या 58 वर्षांच्या आयुष्यात करून गेले.

पुस्तक लेखनाच्या निमित्तानं नितीनदादांना खूप जवळून पाहता आलं. जाणून घेता आलं. पवई येथील कार्यालयात आमची दररोज सकाळी सात वाजता बैठक सुरू व्हायची नि मग आठवणींचा खजिनाच ते माझ्याकडे रिता करायचे. नितीनदादांच्या आयुष्याची जडणघडण जाणून घेताना मीच स्वतः समृद्ध होत गेलो. नितीनदादांची मुळं रुजली ती कोकणातील पाचवली या गावामध्ये. इथल्या मातीत ते खेळले, बागडले आणि या मातीनंच त्यांना जागतिक कीर्ती मिळवून दिली. त्या मातीचं ऋण त्यांनी कायम मनात ठेवलं आणि संधी मिळाल्यावर ते ऋण आपल्या परीनं फेडण्याचा प्रयत्न केला.

चित्रपटसृष्टीत नितीन देसाईंनी ज्यावेळी पदार्पण केलं, तेव्हा बहुतेक सर्व हिंदी चित्रपटांची शूटिंग्ज ही राजस्थान, केरळ, उटी आदी ठिकाणी व्हायची. यश चोप्रांसारख्या काही दिग्दर्शकांनी तर स्वित्झर्लंडलाच आपल्या चित्रपटाचा प्राण बनवलं. त्यामुळे इतर भागांमध्ये शूटिंग्जवेळी जाताना नितीन देसाईंचं मन नाखूश असायचं. कोकणासारखा दुसरा निसर्गरम्य प्रदेश आपल्याकडे नाही. तरीदेखील मग आपल्या भागात शूटिंग्ज का होत नाहीत, असा त्यांना प्रश्न पडायचा. परंतु, ज्यावेळी त्यांचं स्वतःचं मत विचारात घेऊ लागलं, तेव्हा मात्र त्यांच्यासमोर फक्त कोकण आणि सातारा-वाईशिवाय दुसरा कोणताच प्रदेश नव्हता. त्यामुळेच 1993 ते 2013 या दोन दशकांमध्ये नितीन देसाईंनी काम केलेल्या 'हुतूतू', 'स्वदेस', 'मंगल पांडे-द रायजिंग', 'द लिजंड ऑफ भगतसिंग', 'खाकी' अशा बहुसंख्य चित्रपटांचं शूटिंग हे कोकण तसेच वाई-सातार्‍याच्या मातीत झाल्याचं लक्षात येतं. वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये पाहायला मिळालेली चंदीगड, लाहोरसारखी शहरं त्यांनी कोकणच्या भूमीवर उभारली आहेत. 'खेले जी जान से' या चित्रपटाचं कथानक तर पश्चिम बंगालमधलं आहे. परंतु, ते कथानक सावंतवाडीच्या राजवाड्यात चांगलं उभं करता येईल, असं वाटल्यानं या चित्रपटाचा बहुतांश भाग हा सावंतवाडीत चित्रित झाला.

नितीन देसाई हे प्रचंड महत्त्वाकांक्षी असं व्यक्तिमत्त्व होतं. एकाचवेळी त्यांचे जवळपास दहा-पंधरा प्रोजेक्टस् सुरू असत. उत्तम नियोजन, उत्कृष्ट टीमवर्क आणि अफाट गुणवत्तेच्या जोरावर त्यांना हे 'मल्टिटास्किंग'चं तंत्र चांगलंच जमलं होतं. एकदा आपणच उभारलेल्या चित्रपटाचे सेटस् हे शूटिंग संपल्यानंतर तोडले जात असताना नितीनदादांनी पाहिलं.

तेव्हाच त्यांच्या मनात आलं की, आपलं काम असं वाया जाता कामा नये. काहीही करून त्याचं 'डॉक्युमेंटेशन' झालं पाहिजे आणि त्यातूनच मग पुढे एन. डी. स्टुडिओ साकारण्याची कल्पना त्यांना सुचली. इतर राज्यांकडून ऑफर असतानाही महाराष्ट्रावरील, कोकणावरील प्रेमाखातर नितीन देसाईंनी कोकणाचं प्रवेशद्वार असलेल्या कर्जतमध्येच एन. डी. स्टुडिओ उभारला. परदेशात गेलं की, नितीनदादांचं पहिलं काम असायचं ते तिथले स्टुडिओ पाहणं. जगातील बहुतेक सर्व मोठमोठ्या स्टुडिओंना त्यांनी भेटी दिल्या. तिथलं वातावरण, तिथली कामाची पद्धत कोणालाही प्रभावित करणारी होती. मुंबई ही आता शूटिंगसाठी योग्य जागा नाही. इथं काम करणार्‍यांना आता मानसिक शांतता हवीय, जी पूर्वी गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीत मिळत होती; पण आता या स्टुडिओच्या जवळपास बहुमजली इमारती उभ्या राहिल्या आहेत. पटकथेचा 'ड्राफ्ट' सोबत आणा आणि चित्रपटाची रिळं घेऊन जा, या 'थीम'वर आपण काही तरी करावं, अशी दादांची खूप वर्षांपासूनची इच्छा होती. त्याची पूर्तता करण्यासाठी हा स्टुडिओ उभारण्याचा त्यांनी निर्णय घेतला. मुंबई-पुणे आणि मुंबई-नाशिक या भागात त्यांनी स्टुडिओसाठी जागा पाहण्यास सुरुवात केली. तब्बल 59 जागा पाहिल्यानंतर त्यांना कर्जतची जागा पसंद पडली आणि त्यांनी तिथं हा भव्यदिव्य स्टुडिओ उभारला.

वरळीच्या बीडीडी चाळीत वाढलेला एक मुलगा जवळपास चार दशकांच्या प्रवासात आपल्या कौशल्यानं जगभरात नाव कमावेल आणि हॉलीवूडशी स्पर्धा करणारा स्टुडिओ उभारेल, यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. परंतु, ही अविश्वसनीय कामगिरी साध्य करण्यात नितीनदादांनी यश मिळवलं होतं. मुळात 'बिगबजेट' चित्रपटांसाठी मोठमोठाले सेट लावणं म्हणजेच कला दिग्दर्शन असा प्रघात नितीन देसाईंच्या उदयापूर्वी होता. या प्रघातालाच नितीनदादांनी मूठमाती देऊन स्वतःचा नवीन रस्ता निर्माण केला. विदेशात कला दिग्दर्शक आणि 'प्रॉडक्शन डिझायनर' असे दोन प्रकार असतात. 'प्रॉडक्शन डिझायनर'च्या सूचनेनुसार कला दिग्दर्शकाला प्रत्यक्षात सेट उभारावा लागतो. आपल्याकडे मात्र अजूनही सगळ्या गोष्टी कला दिग्दर्शकालाच कराव्या लागतात. कला दिग्दर्शन म्हणजे केवळ सेट लावणं नाही. चित्रपटाच्या प्रत्येक 'फ्रेम'मध्ये जे काही दिसतं, त्याला कला दिग्दर्शक सर्वस्वी जबाबदार असतो. 'रियल लोकेशन'लाही 'ड्रेसअप' करावं लागतं. पटकथा ऐकल्यानंतर कला दिग्दर्शकाला चित्रीकरणाच्या जागा शोधाव्या लागतात. त्या जागांवर चित्रीकरण करणं शक्य नसेल तर मग सेट उभारण्यासाठी विचारमंथन सुरू होतं. फक्त 'लोकेशन हंटिंग'साठी नितीनदादांकडे वेगळी टीम होती. ही टीम त्यांना एखाद्या ठिकाणाचा रिपोर्ट द्यायची; मग ते स्वतः त्या जागेची पाहणी करत. त्यानंतर दिग्दर्शकाला तिथं घेऊन जात. दादांकडील रिसर्च टीमनं एक अनोखी लायब्ररीच उभी केली होती. जगातल्या कोणत्याही ठिकाणाची छायाचित्रं तसेच व्हिडीओ क्लिप त्यात संग्रहित करण्यात आली होती. त्यामुळे, दादांकडे येणार्‍या दिग्दर्शकाचं काम खूप सोपं व्हायचं.

नितीनदादांच्या वाट्याला 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर', 'हम दिल दे चुके सनम', 'देवदास' आणि 'लगान' या चार चित्रपटांच्या कला दिग्दर्शनासाठी तब्बल चार राष्ट्रीय पुरस्कार त्यांच्या नावावर जमा आहेत. पवई इथल्या एन. डी. स्टुडिओच्या कार्यालयातील त्यांच्या केबिनसमोर पुरस्कारांची रांगच पाहायला मिळायची. अमिताभ बच्चन, शाहरूख खान, सलमान खान, ऐश्वर्या राय या हिंदीतील प्रतिथयश कलाकारांपासून ते नाना पाटेकर, सुबोध भावे, गजेंद्र अहिरे, केदार शिंदे, प्रवीण तरडे या मराठीतील मान्यवरांसोबत दादांनी काम केलं. नितीनदादांची खासियत म्हणजे ज्या दिग्दर्शकाबरोबर ते काम करीत असत, त्याची संपूर्ण स्टाईल अभ्यासूनच ते सेट उभारायला सुरुवात करीत. त्यामुळेच स्वतःचा 'पॉईंट ऑफ व्ह्यू' राखूनही ते दिग्दर्शकाबरोबर जमवून घेण्यात यशस्वी ठरत. त्यामुळेच अनेकांनी त्यांना आपल्या चित्रपटांसाठी 'रिपीट' केलं. नितीन देसाईंचा उदय होईपर्यंत हिंदी चित्रपट हे प्रामुख्यानं बोलपट होते. परंतु, नितीनदादांनी आपल्या दिग्दर्शकांना 'व्हिज्युअली' विचार करायला भाग पाडलं आणि त्याचाच रिझल्ट म्हणजे '1942 अ लव्ह स्टोरी', 'देवदास', 'लगान', 'हम दिल दे चुके सनम' हे काही चित्रपट.

भारतीय संस्कृती, इतिहासामध्ये जी काही सोनेरी पानं आहेत, ती नितीनदादांना छोट्या किंवा मोठ्या पडद्यावर आणायची होती. परंतु, मधल्या काळातील 'सेटबॅक'मुळे थोडीच पानं आपल्यापर्यंत ते आणू शकले, हे आपणा रसिक प्रेक्षकांचं दुर्दैव. हा सेटबॅक कोणामुळे आला, याची चौकशी आता सुरू आहे आणि त्यामागचं सत्यही लवकरच समोर येईल. कर्जतमधील एन. डी. स्टुडिओच्या प्रवेशद्वाराजवळच एक वडाचं मोठं झाड आहे. जिथं हा स्टुडिओ उभारला आहे, त्या जागेला पहिल्यांदा भेट दिली असताना वडाच्या झाडाखाली नितीनदादांना पहिल्यांदा पॉझिटिव्ह एनर्जी जाणवली होती. याच एनर्जीमुळे कायम ते सकारात्मक विचार करायचे. प्रत्येक अडचणीवर मात करून ते पुन्हा नव्यानं उभं राहायचे. उत्तुंग यश मिळवूनही नितीनदादांचे पाय जमिनीवरच होते. गेल्या पाच वर्षांमध्ये एन. डी. स्टुडिओला भेट देणार्‍या प्रत्येक व्यक्तीला ते आनंदानं भेटायचे. त्यामागचे त्यांचे संस्कार. छत्रपती शिवाजी महाराज आणि आपले आई-वडील ही त्यांची तीन दैवतं होती. काही तरी उत्तुंग, विलक्षण, सर्वोत्तम साकारण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं. त्या स्वप्नांचा पाठपुरावा करीत असतानाच नितीनदादांच्या रूपातलं हे ध्यासपर्व अचानक संपुष्टात येणं, ही भारतीय चित्रपटसृष्टीची, रसिक प्रेक्षकांची मोठी हानी आहे.

अभूतपूर्व यशामागचं रहस्य

नितीन देसाईंच्या अभूतपूर्व यशामागचं रहस्य जाणून घेतलं असता, कमाल गुणवत्ता, अफाट कष्ट आणि थोरा-मोठ्यांचा सहवास प्रकर्षानं जाणवतो. कारकिर्दीच्या सुरुवातीलाच त्यांना नितीश रॉय, गोविंद निहलानी, श्याम बेनेगल, मनमोहन देसाई, गुलजार यासारख्या ज्येष्ठांचा सहवास लाभला. तसेच समकालीन विधू विनोद चोप्रा, संजय लीला भन्साळी, आशुतोष गोवारीकर, मधुर भांडारकर, केतन मेहता, डेव्हिड धवन, राजकुमार संतोषी आदी या प्रतिभावान दिग्गज मित्रांच्या सहवासातूनच त्यांच्यातला कला दिग्दर्शक झपाट्यानं प्रगती करू लागला. नितीन देसाई हा एक झपाटलेला कलावंत होता. त्यांच्या झपाटलेपणाचे अनेक किस्से खुद्द त्यांच्याकडून ऐकायला मिळाले होते. या काळात ते कामानं एवढे झपाटलेले असायचे की, गोरेगावच्या चित्रनगरीतून घरी जायलाही त्यांच्याकडे वेळ नसायचा. अनेक दिवस, अनेक रात्री ते फक्त सेटवरच असायचे. सेटच्या भिंतींना रंग लावण्यापासून सगळी कामं त्यांनी केलीत. या कामादरम्यान त्यांनी प्रचंड रंगही खाल्लाय. 1986 च्या मे महिन्यात तर ते एकदा तब्बल 13 दिवस गोरेगावच्या फाळके चित्रनगरीत ठाण मांडून होते. दिवस-रात्र त्यांनी इथेच वास्तव्य केलं होतं. विधू विनोद चोप्रांच्या '1942 अ लव्ह स्टोरी' या चित्रपटातील कामगिरीनंतर त्यांना मागं वळून पाहावं लागलं नाही. या चित्रपटामुळे त्यांना 'वॉल्ट डिस्ने'चा 'जंगल बुक' चित्रपटही करायला मिळाला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT