Latest

बहार विशेष : ‘पुढारी न्यूज’ माध्यम जगातलं नवं पाऊल!

Arun Patil

'पुढारी' वृत्तसमूहाच्या 'पुढारी न्यूज' या सॅटेलाईट न्यूज चॅनलचा 29 ऑगस्टला दणक्यात शुभारंभ झाला. पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची एकत्र मुलाखत आणि पाठोपाठ महाराष्ट्राचा आतापर्यंतचा सर्वात मोठा पोलिटिकल सर्व्हे सादर करून 'पुढारी न्यूज' चॅनलने महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं. मराठी पत्रकारितेतलं एक महत्त्वाचं पाऊल ठरणारं हे चॅनल उभारणारे 'पुढारी' वृत्तसमूहाचे चेअरमन व समूह संपादक डॉ. योगेश प्र. जाधव यांनी व्यक्त केलेलं हे मनोगत.

पुढारी न्यूज हे 24 तास चालणारं मराठी सॅटेलाईट न्यूज चॅनल मायबाप प्रेक्षकांना सादर करताना, 'पुढारी' वृत्तसमूहाचा चेअरमन आणि समूह संपादक म्हणून मला अत्यंत आनंद आणि समाधान आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात 1937 सालापासून 'पुढारी' वृत्तसमूह महाराष्ट्राच्या सेवेत आपलं योगदान देत आहे. एक साप्ताहिक म्हणून सुरू झालेली ही वाटचाल कोल्हापूरचं जिल्हा दैनिक ते फक्त महाराष्ट्रातलाच नाही, तर देशातला एक अग्रगण्य वृत्तसमूह अशी झाली आहे. आज दैनिक 'पुढारी'च्या महाराष्ट्रभर पसरलेल्या 24 आवृत्त्या आहेत आणि 97 लाखांहून अधिक वाचक आहेत. त्याचबरोबर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातलं टोमॅटो एफएम हे आघाडीचं रेडिओ चॅनल तसंच जगभर पोचणारे लोकप्रिय डिजिटल प्लॅटफॉर्म हीदेखील 'पुढारी'ची नव्या पिढीशी जोडलेली ओळख आहे. या 'पुढारी'च्या वाढत्या परिघाचा केंद्रबिंदू कायम जनताच राहिली आहे. जनता हीच 'पुढारी'ची बांधिलकी होती, आहे आणि कायम असणार आहे. त्यामुळे निःपक्ष आणि निर्भीड दैनिक ही ओळख जनमानसात रुजली आहे.

आज 'पुढारी न्यूज' या नव्या सॅटेलाईट न्यूज चॅनलच्या रूपाने माध्यमांच्या जगात नवं पाऊल उचलताना जनतेशी असलेली ही बांधिलकीची परंपराही आम्ही अधोरेखित करत आहोत. 'आवाज जनतेचा!' हे 'पुढारी न्यूज'चे फक्त ब्रीदवाक्य नाही, तर तो 'पुढारी न्यूज'च्या पत्रकारितेचा आत्मा असणार आहे. महाराष्ट्राच्या छोट्यात छोट्या खेड्यात राबणार्‍या फाटक्या कष्टकरी माणसाचा आवाज होण्याचा 'पुढारी न्यूज'चा प्रयत्न असणार आहे.

आज सर्वपक्षीय नेत्यांच्या घोषणाबाजीत हा आवाजच हरवून गेला आहे. खरं तर 'पुढारी'ने आजवर राजकारणालाही जनतेचा आवाज मानूनच महाराष्ट्राच्या राजकारणातली बातमीमागची बातमी वाचकांसमोर मांडली आहे. म्हणून महाराष्ट्राचं राजकारण करणार्‍यांना आणि ते समजून घेणार्‍यांनाही 'पुढारी'ला टाळता येत नाही. आताही 'पुढारी न्यूज' टीव्हीच्या पडद्यावर सत्तेच्या सारीपाटावरची प्रत्येक चाल तेवढ्याच ताकदीने उलगडून सांगेल. पण ते करताना, 'पुढारी न्यूज' नेत्यांच्या गदारोळाला पुरून उरेल इतका जनतेचा आवाजही बुलंद करेल. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना, समस्यांना जगाच्या चावडीवर मांडण्यासाठी 'पुढारी न्यूज' कंबर कसून तयार आहे.

टीव्ही आला की छापील वर्तमानपत्रं मान टाकतील, इंटरनेट आलं की वर्तमानपत्रांचा जमाना संपेल, असं कितीही म्हटलं जात असलं तरी 'पुढारी'ला तसं कधीच वाटलं नाही. कारण 'पुढारी' तळागाळातल्या वाचकांपर्यंत पोचलेला आहे, कष्टकर्‍यांच्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग बनलेला आहे, त्यामुळे कागदी इशार्‍यांना घाबरून कासावीस होऊन टीव्ही न्यूज चॅनल काढण्याची घाईगडबड करण्याची गरज 'पुढारी'ला कधीच वाटली नाही. 'पुढारी' ठरलेल्या दिशेने दमदार वाटचाल करत राहिला.

त्यामुळे आज जेव्हा टीव्हीवरची बातमीदारी आपला संगती हरवून बसलीय, टीव्ही न्यूज चॅनलचा प्रभाव ओसरला आहे. अशा वेळेस टीव्ही चॅनलचं व्याकरण बदलण्याचा इरादा घेऊन 'पुढारी न्यूज' ताकदीने मैदानात उतरलं आहे. अर्थात हे लगेचच होईल, अशा भ्रमात आम्ही नाही. प्रत्येक स्थित्यंतराला स्थिर होण्यासाठी त्याचा वेळ द्यावा लागतो. टीआरपी, रेटिंग आणि जाहिरातींच्या स्पर्धेत इतर कोणत्याही न्यूज चॅनलपेक्षाही 'पुढारी न्यूज' ताकदीने उतरेल. पण ते करताना जनतेचा आवाज दडपावा लागत नाही, हा 'पुढारी'चा आजवरचा अनुभव आहे, ते टीव्हीच्या पडद्यावरही सिद्ध केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.

'पुढारी न्यूज' ही एका दैनिकाने उभारलेली वृत्तवाहिनी आहे. याचं भान आम्हाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रभर पसरलेले 1400 हून अधिक वार्ताहर आणि 50 हून अधिक कार्यालयं ही 'पुढारी'ची जमिनीवरची ताकद टीव्हीसाठीही काम करणार आहे. आजवर माझ्या माहितीत तरी कुठेच घडलं नाही असं कन्व्हर्जन्स घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. 'पुढारी' दैनिकाचा प्रत्येक वार्ताहर हा न्यूज चॅनलसाठीही बातम्या देईल, अशी यंत्रणा उभारण्यात आम्ही यशस्वी झालो, तर महाराष्ट्राच्या एका मोठ्या प्रदेशाला, त्यातल्या लोकांना पहिल्यांदाच टीव्हीच्या पडद्यावर स्थान मिळू शकेल.

गेल्या 83 वर्षांच्या वाटचालीत 'पुढारी'ने हजारो पत्रकार आणि शेकडो संपादक घडवले. त्यामुळे चांगल्या पत्रकारांची टीम उभी करण्यात 'पुढारी'चा हातखंडा आहे. आज 'पुढारी न्यूज'च्या न्यूज रूममध्ये काम करणारी टीम ही मराठी माध्यमजगातली एक सर्वोत्तम टीम आहे, याच्याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे यांच्या नेतृत्वात विठोबा सावंत, अमोल जोशी, आशिष काटकर, प्रसन्न जोशी, नम्रता वागळे अशा अनुभवी आणि जाणकार पत्रकारांची फळी बांधली गेली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रभर फिरून आम्ही ताज्या दमाच्या तरुण पत्रकारांना शोधून न्यूज रूममध्ये आणलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून आलेली पत्रकारितेतली ताजी हवा इथे खेळते आहे.

नवं तंत्रज्ञान आत्मसात करण्यात 'पुढारी' कायमच आघाडीवर होता. त्यामुळे जागतिक दर्जाचं प्रिंटिंग, रंगीत छपाई, जगभरातल्या बातम्या आणि फोटो देणार्‍या आंतरराष्ट्रीय न्यूज सर्व्हिस मराठीत आणण्यात 'पुढारी' कायम पुढे असतो. रेडिओ आणि डिजिटलच्या जगातही असंच अद्ययावत तंत्रज्ञान 'पुढारी'ने आत्मसात केलं. आता टीव्हीतही अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि इन्फ्रास्ट्रक्चर 'पुढारी'ने उभारलं आहे. मराठीतल्या इतर कोणत्याही टीव्ही चॅनलपेक्षा मोठा स्टुडिओ 'पुढारी न्यूज'ने नवी मुंबईत उभा केला आहे. आतापर्यंत मराठीत झालेले नाहीत, असे अद्ययावत तंत्रज्ञान प्रणालीचे प्रयोग 'पुढारी' करत आहे.

मराठी टीव्ही न्यूजमधे क्रांती घडवण्यासाठी 'पुढारी न्यूज' सज्ज झालं आहे. आमची ही झेप केवळ आणि केवळ वाचक, प्रेक्षकांच्या पाठिंब्यावर आहे.

महाराष्ट्रभर पसरलेल्या 'पुढारी'वर प्रेम करणार्‍या जनतेच्याविषयी मी आज यानिमित्ताने कृतज्ञता व्यक्त करतो. त्याचबरोबर या उभारणीत अग्रभागी असणारे 'पुढारी न्यूज'चे चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर विनायक पाचलग आणि संपादकीय सल्लागार सचिन परब यांच्या योगदानाचा विशेष उल्लेख मी आवर्जून करू इच्छितो.

बातमी हे केवळ घडामोडीचं वार्तांकन नसतं. ते समाजाला घडवणारं एक हत्यार आहे. त्यातून वाचकाला फक्त माहिती कळत नाही, तर वाचकाचं विश्व विस्तारत जातं आणि तो समृद्ध होतो. पत्रकारिता ही समाज घडवणारी आणि समाजाला योग्य वाटेवर आणण्याची क्षमता असणारी साधना आहे, असं आमचं प्रामाणिक मत आहे.

माझे आजोबा पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांनी 'पुढारी'ची स्थापना करून समाजाला जागं करण्याचा वसा आम्हाला दिला. त्यांनी महात्मा गांधींच्या प्रेरणेने महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळीला व्यापक जनाधार मिळवून दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ते सहकारीच होते. त्यांचा सामाजिक बांधिलकीच्या पत्रकारितेचा वारसा पुढे नेत माझे वडील पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी 'पुढारी'चा वटवृक्षासारखा प्रचंड विस्तार केला. 'पुढारी' ही जनतेची एक चळवळ बनवली. पत्रकारितेतून समाजकारण करता येतं, हे त्यांनी सलग 50 हून अधिक वर्षांच्या संपादक म्हणून वाटचालीत दाखवून दिलं. त्यांनी महाराष्ट्राच्या समाजकारणावर, राजकारणावर आणि पत्रकारितेवर आपला स्वतःचा ठसा उमटवला.

त्यांनी कारगिलमध्ये जवानांसाठी, तर गुजरातमध्ये भूकंपग्रस्त परिसरात हॉस्पिटल उभारून वाचक सहभागातून क्रांती घडवली. शेतकरी चळवळीपासून सीमा आंदोलनापर्यंत लोकांच्या चळवळीचं नेतृत्व करून त्यांनी मोलाचं योगदान दिलं. 'पुढारी' हे देशातलं एकमेव वर्तमानपत्र आहे की, ज्याच्या सुवर्ण महोत्सव आणि अमृत महोत्सवात तत्कालीन पंतप्रधानांनी हजेरी लावली. अशा या तेजस्वी पत्रमहर्षींचा मुलगा म्हणून त्यांनी पाहिलेलं 'पुढारी न्यूज' चॅनलचं स्वप्न वास्तवात उतरवताना मला वचनपूर्तीचं समाधान मिळालं आहे. इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा हे समाधान माझ्यासाठी सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे. मी पुन्हा एकदा 'पुढारी'च्या मायबाप वाचक प्रेक्षकांना अत्यंत कृतज्ञतापूर्वक हे चॅनल सादर करतो.

SCROLL FOR NEXT