Latest

रहस्‍यरंजन : कैलास पर्वत

Arun Patil

कैलास पर्वतावर चढण्यासाठी कोणताही रस्ता नाही. चारी बाजूंनी हिमाच्छादित पर्वतरांगा. दरवर्षी लाखो लोक कैलास पर्वताच्या चारी बाजूंनी परिक्रमा करतात. पण, एकही गिर्यारोहक आजपावेतो कैलास पर्वतावर पोहोचू शकलेला नाही, हे मात्र खरे!

विश्वातील असंख्य शास्त्रज्ञ, वैज्ञानिकांनी कैलास पर्वत या विषयावर संशोधन, अभ्यास केला आहे. कैलास पर्वत भगवान शिवाचे स्थान मानले जाते आणि हे पवित्र ठिकाण पाहण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. अगणित रहस्यांनी भरलेल्या कैलास पर्वतावर आजपर्यंत कुणालाही पोहोचता आलेलं नाही. एव्हरेस्ट पर्वत अनेकांनी सर केला, पण कैलास पर्वत नाही. कैलास हे खरोखरच अनेक अलौकिक शक्तींचे केंद्र आहे. येथे काहीतरी पवित्र, सकारात्मक शक्ती असल्याचे नासाने मान्य केले आहे. असंख्य रशियन शास्त्रज्ञांनी कैलास पर्वताबाबत संशोधन केले. कैलास पर्वतराजी काश्मीर ते भूतानपर्यंत पसरलेली आहे. कैलासाचे भौगोलिक स्थान हे तिबेटमध्ये आहे. येथील अनेक पर्वतराजीपैकी कैलास एक आहे. त्याच्या पश्चिम-दक्षिणेला मानसरोवर आहे. मानसरोवर यात्रा करणारे अनेक यात्रेकरू दुरूनच कैलास पर्वताचे दर्शन घेतात. अनेक महत्त्वाच्या नद्या येथून उगम पावतात. ब्रह्मपुत्रा, सिंधू, सतलज इत्यादी पवित्र मानल्या जाणार्‍या नद्यांचे उगमस्थान कैलास पर्वत आहे. या तीर्थक्षेत्राला अष्टपद, गणपर्वत आणि रजतगिरी असेही म्हणतात. हिमाच्छादित कैलासाच्या 6,638 मीटर (21,778 फूट) उंच शिखराची भव्यता विलक्षण आहे. त्याला लागून असलेले मानसरोवर हे तीर्थक्षेत्र आहे. कैलास पर्वत एक विशालकाय पिरॅमिडप्रमाणे आहे, जे 100 छोट्या पिरॅमिडचे केंद्र आहे.

माऊंट एव्हरेस्ट या उत्तुंग शिखरापेक्षा कैलासची कमी उंची आहे. असे असूनही कैलास पर्वत कोणालाच सर करता आलेला नाही. असे म्हटले जाते की, कैलास पर्वतावर रेडिओ अ‍ॅक्टिव्ह लहरी अधिक प्रमाणात आहेत. ज्यामुळे येथे चढाईसाठी येणारे गिर्यारोहक कालांतराने दिशाहीन होऊन वाट चुकतात. यावर संशोधन करणार्‍या ह्यूरतलीजने कैलास पर्वतावर चढणे अशक्यप्राय गोष्ट असल्याचे म्हटले आहे.

असेही म्हटले जाते की, हे अलौकिक शक्तीचे केंद्र आहे. त्याचबरोबर यास अ‍ॅक्सिस मुंडी (उळी र्चीपवळ) देखील म्हटलं जातं. याचा अर्थ आहे जगाची नाभी वा आकाशीय ध्रुव, भौगोलिक ध्रुव केंद्र. हे आकाश आणि पृथ्वीच्या मधील संबंधाचा एक बिंदू आहे, जिथे 10 दिशा मिळतात. रशियन वैज्ञानिकांच्या माहितीनुसार अ‍ॅक्सिस मुंडी ते स्थान आहे, जिथे अलौकिक शक्तीचा प्रवाह असतो, जे खूप शक्तिशाली स्थान असते. तिबेटचे डाओ अनुयायी या पर्वताला संपूर्ण जगाचे आध्यात्मिक केंद्र मानतात. जैन धर्म अनुयायी मानतात की, पहिले तीर्थंकर ऋषभनाथ यांना कैलास पर्वतावर ज्ञान प्राप्त झाले होते. कैलास पर्वताला धरतीचे केंद्र मानले जाते. रशियन वैज्ञानिकांच्या अभ्यासानुसार, कैलास पर्वताची निर्मिती दैवी शक्ती प्राप्त असलेल्या युगंधर मानवाने केली असावी.

येथे दोन मुख्य सरोवरे आहेत. एक मानसरोवर, दुसरे राक्षसतळ. मानसरोवरचे शुद्ध पाणी उत्तम सरोवरापैकी एक आहे. याचा आकार सूर्यासमान आहे. दुसरे, राक्षस सरोवर जगातील खारे पाणी असलेले ठिकाण आहे. याचा आकार चंद्राप्रमाणे आहे. दोन्ही सरोवरे सौर आणि चंद्राला प्रदर्शित करतात. ज्याचे संबंध सकारात्मक-नकारात्मक ऊर्जांप्रमाणे आहे. जेव्हा दक्षिणेकडून पाहिलं जातं तेव्हा ते स्वस्तिक चिन्हाप्रमाणे दिसते, असे म्हटले जाते. पण अद्याप हे रहस्य आहे की, या सरोवराची नैसर्गिकरीत्या निर्मिती झालीय की, हे मानवनिर्मित आहे, हे कुणीही सांगू शकत नाही. कैलास पर्वत सर करणे निषिद्ध आहे, असे मानले जाते आणि ही गोष्ट अशक्यही आहे. पण, एक तिबेटियन बौद्ध भिक्खू मिलारेपा यांनी कैलास सर केला होता, असं मानलं जातं. मिलारेपा कैलास पर्वातावर चढाई करण्यात यशस्वी ठरले होते. तसेच ते या पर्वतावर जाऊन जिवंत परत येणारे जगातले पहिला मानव होते, याचा अनेक ठिकाणी उल्लेख येतो.

मानसरोवर क्षेत्रात गेल्यानंतर सातत्याने कानावर एखाद्या आकाशातून जाणार्‍या विमानासारखा आवाज ऐकू येतो. पण, लक्ष देऊन ऐकल्यानंतर हा आवाज 'डमरू' वा 'ॐ' ध्वनीसारखा वाटतो. वैज्ञानिक म्हणतात की, हा आवाज बर्फ विरघळण्याचाही असू शकतो.

आकाशात प्रकाश चमकणे येथील अभूतपूर्व घटना आहे. अनेकदा कैलास पर्वतावर सात प्रकारच्या विजा आकाशात चमकताना पाहण्यात आल्या आहेत. नासाच्या वैज्ञानिकांचे असे मानणे आहे की, हे येथील चुंबकीय बलाच्या कारणाने होत असावे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, जगातील सर्वात दुर्मीळ मृग म्हणजे कस्तुरीमृग आहे. हे मृग उत्तर पाकिस्तान, तिबेट, उत्तर भारत, चीन, सायबेरिया, मंगोलिया येथे आढळते. या मृगाची कस्तुरी खूप सुगंधित आणि औषधी गुणांनी युक्त असते. हे मृग या पर्वतराजीत आढळतात.

कैलास पर्वतावर जाण्यासाठी चीन सरकारने 1980 मध्ये प्रयत्न केले होते. पण चीनचे देखील कैलासासमोर काही चालू शकले नाही. चिनी सरकारने इटलीचे गिर्यारोहक रेनहोल्ड मेस्नर यांना कैलास पर्वत सर करण्यासाठी विनंती केली होती. रेनहोल्डने कैलासवर पाऊल ठेवण्यासही नकार दिला होता. 2007 मध्ये रशियन गिर्यारोहक सर्गे सिस्टिकोव्हने आपल्या टीमसोबत कैलास सर करण्याचा प्रयत्न केला होता. सर्गे म्हणाले होते, काही अंतरावर चढल्यानंतर माझ्या आणि माझ्यासोबत असणार्‍या सगळ्या टीमची तीव्र डोकेदुखी होऊ लागली. माझ्या जबड्याची मांसपेशी आखडली आणि जिभेची हालचाल बंद झाली. चढताना मला अनुभव आला की, मी या पर्वतावर चढण्यासाठी लायक नाही. आम्ही परतलो, तेव्हा आराम मिळत गेला. कैलास पर्वतावर चढण्यासाठी कोणताही रस्ता नाही. चारी बाजूंनी हिमाच्छादित पर्वतरांगा. दरवर्षी लाखो लोक कैलास पर्वताच्या चारी बाजूंनी परिक्रमा करतात. पण, एकही गिर्यारोहक आजपावेतो कैलास पर्वतावर पोहोचू शकलेला नाही, हे मात्र खरे!

SCROLL FOR NEXT