Latest

परंपरा : ज्ञानदृष्टी देणारे गुरू

Arun Patil

गुरूंचं आयुष्यातलं स्थान हे सर्वात महत्त्वाचं असतं. कबीर म्हणतात, 'गुरुदेव बिन जीव की कल्पना ना मिटे.' आजचा काळ इंटरनेटचा आहे. त्याच्याआधारे कलाशिक्षण घेणं सोपं झालं असलं, तरी गुरूंसमोर बसून शिकण्याची सर त्याला नाही. कलासंगीताच्या क्षेत्रात तर गुरुकुल परंपरेला खूप मोठं महत्त्व आहे. उद्याच्या (3 जुलै) गुरुपौर्णिमेनिमित्ताने प्रख्यात शास्त्रीय गायक पं. शौनक अभिषेकी आणि गायिका सावनी शेंडे यांनी गुरूंविषयी व्यक्त केलेलं मनोगत…

गुरूंविषयी बोलताना गायिका सावनी शेंडेही भरभरून बोलते. ती म्हणते, आई-वडील हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात परमगुरू असतातच; मात्र आपल्या कारकिर्दीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर दिशा देण्यासाठी जे गुरू लाभतात त्यांचे आयुष्यातील महत्त्व खूप मोठे असते. माझ्या घरी गाण्याचं वातावरण असल्यामुळे लहानपणापासूनच गाण्याची आवड निर्माण झाली. बाबा शिष्यांना शिकवायचे त्यावेळी मी त्यांच्याबरोबर बसायचे. तासन्तास बाहेर एका जागी बसून गाणं ऐकायचे. घरचं वातावरण अनुकूल असल्यानं मी त्या दुनियेत रमत गेले. माझी गुरू म्हणजे आजी – कुसुम शेंडे. ती किराणा घराण्याची ज्येष्ठ गायिका होती. आजीनं वयाच्या सहाव्या वर्षापासून मला गाण्यातील पहिले धडे द्यायला सुरुवात केली. त्यामुळे ती मला आजी रूपात नव्हे, तर गुरू म्हणून भेटली. घरीच गुरू असण्याचे अनेक फायदे मला झाले. वेळोवेळी प्रत्येक गोष्टीचे भान राखले गेले. आजीनंतर बाबांकडे म्हणजे डॉ. संजीव शेंडे यांच्याकडे मी ठुमरीचे शिक्षण घेतले.

मध्यंतरीच्या काळामध्ये डॉ. वीणा सहस्रबुद्धे यांच्याकडे ग्वाल्हेर घराण्याची गायकी शिकले. साहजिकच, या तिघांचेही माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचे, आदराचे स्थान आहे. माझ्या सुरांचा पाया त्यांच्यात आहे. वस्तुतः, कोणत्याही गुरूचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही; पण हे ऋण आपल्यावर असणं हीच खूप भाग्याची गोष्ट आहे. कारकिर्दीच्या द़ृष्टीनं चांगले गुरू मिळणं हे खूप महत्त्वाचं असतं. सुदैवानं मला ते लाभले याबद्दल मी ईश्वराची आभारी आहे. गायनापलीकडे जाऊन गुरूंनी दिलेले विचार, संस्कार, त्यांची शिस्त, सादरीकरणासाठीच्या सूचना या सार्‍याचा आजही मला पदोपदी उपयोग होतो आहे. गाण्यात कुठेही सवंगपणा न येता ते खानदानी कसं राहील, गाण्याची मांडणी आजच्या काळातील रसिकांनाही कशी आवडेल याचे उत्तम धडे त्यांनी दिले. त्यांनी दिलेेले संस्कार जपत पुढं वाटचाल करणं हीच त्यांच्यासाठी गुरुवंदना ठरेल, असं मला वाटतं.

मला आजीकडून किराणा घराण्याचं आणि वीणाताईंकडून ग्वाल्हेर घराण्याचं गाणं शिकायला मिळाल्यामुळे माझ्या गाण्यात या दोन्हीचा मिलाफ दिसतो. ठुमरीचे शब्द हलके असल्यामुळे ते लोकांपर्यंत सहज पोहोचतात, हे मी माझ्या वडिलांकडून खूप चांगले शिकले. या गुरूंमुळे कोणत्याही मैफलीत माझ्या गायकीतले वेगवेगळे रंग दिसतात. त्यातील आनंद रसिकांना देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. सवाई गंधर्व महोत्सवातील माझ्या गाण्यासाठी एकदा माझे तिन्ही गुरू एकत्रित आले होते. तो माझ्या आयुष्यातील विलक्षण अनुभव होता. कार्यक्रमानंतर वीणाताईंनी माझ्या गायनाचं कौतुक करून मला मिठी मारल्याचा क्षण अविस्मरणीय आहे.

मला तिन्ही गुरू अत्यंत शिस्तीचे लाभले. साहजिकच, ही शिस्त माझ्यातही आली. मैफलीसाठीची काही टेक्निक्स मला वीणाताईंकडून शिकता आली. प्रेक्षकांना कसं पारखावं, कार्यक्रमाला येणारा प्रेक्षक कोणता आहे, त्यांच्यासमोर आपण कोणतं गाणं सादर केलं पाहिजे आदी गोष्टी त्यांच्याकडून शिकता आल्या. मैफलींमध्ये पूर्णपणे प्रेक्षकांच्या मतांनुसार किंवा पूर्णपणे स्वतःच्या आवडीनुसार गाऊन चालत नाही; याचा सुवर्णमध्य असावा लागतो. तो कसा गाठायचा, ऐनवेळी निर्णय कसे घ्यायचे, कार्यक्रमादरम्यान उद्भवणार्‍या तांत्रिक समस्यांमुळे, प्रेक्षकांच्या वर्तणुकीमुळे खचून न जाता सकारात्मक राहून आपली कला कशी सादर करायची, रसिकांना अधिकाधिक आनंद कसा द्यायचा, या गोष्टी मला त्यांच्याकडून शिकता आल्या.

या तिन्ही गुरूंकडून मला मिळालेली महत्त्वाची शिकवण म्हणजे आयुष्यात यशस्वी होण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. त्यामुळे प्रचंड मेहनत, रियाज आणि साधना यांची कास धरली. माझं गाणं छान झालं, असं कलाकाराने म्हणू नये. तो तुमच्या कलेच्या आयुष्यातील तो शेवटचा दिवस ठरेल. तिथेच त्या कलेला पूर्णत्व येईल आणि ती संपून जाईल. त्यामुळे कलेमध्ये नेहमी अपूर्णत: भासली पाहिजे. तरच नवीन शिकण्याची उर्मी राहते. ही शिकवण मला गुरूंनी दिली. त्यामुळे मी नेहमी विद्यार्थिदशेत राहते. आपल्याकडे जे आहे ते निर्मळ मनाने आणि आनंद देण्यासाठी गायिलं पाहिजे, हे सूत्र मी अवलंबिते. करिअरच्या वाटेवर आपण एखादी पदवी घेऊन बाहेर पडतो आणि त्या पदवीच्या नावानेच लोक तुम्हाला ओळखू लागतात. गाण्यामध्ये तसं होत नाही.

प्रत्येक मैफल ही वेगळी असते. त्या प्रत्येक मैफलीत तुम्हाला खरं उतरायचं असतं. तिथे तुमचा कस लागतो. त्यासाठी साधना, रियाज आणि मेहनत ही त्रिसूत्री महत्त्वाची असते. ही माझ्या गुरूंची शिकवणं मला खूप महत्त्वाची वाटते आणि त्या शिकवणीच्या पायावरच मी आज उभी आहे. आज कलेच्या क्षेत्रात गुरुकुल पद्धतीला खूप महत्त्व आहे. ते तसंच टिकून राहिलं पाहिजे. आजचा काळ इंटरनेटचा आहे. त्याचा आधार घेऊन कलाशिक्षण घेणं सोपं झालं असलं, तरी गुरूंसमोर बसून शिकण्याची सर त्याला नाही. हे वेळीच ओळखणं आवश्यक आहे. गुरू केवळ गाणं शिकवत नाहीत; तर आचरण, विचार, वर्तन या सर्वांना दिशा देण्याचं काम करतात. त्यामुळेच त्यांचं आयुष्यातलं स्थान हे अढळ आणि अतुल्य आहे.

प्रख्यात शास्त्रीय गायक पंडित शौनक अभिषेकी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात गुरूचे स्थान अढळ असते. संगीत कलेमध्ये तर गुरूशिवाय पर्यायच नाही. संगीताचे धडे देण्याबरोबरच आयुष्यात जगण्याचे धडेही गुरूंकडून मिळतात. जगण्याचा मार्ग, चांगला माणूस होण्याचा मार्ग आणि स्वतःला वृद्धिंगत करण्याचा मार्ग गुरू दाखवत असतो. शंभर दालनांचे एक घर असेल आणि त्या घरामध्ये काही दालनांत सोने, चांदी, हिरे आणि एका दालनात कोळसा असेल, तर त्या दालनाच्या मुख्य दरवाजापाशी शिष्याला पोहोचवण्याचे काम गुरू करतात. त्यातील कोणत्या दालनामध्ये काय आहे हे शोधण्याचे काम शिष्याचे असते. मात्र, त्यासाठीची द़ृष्टी गुरू देत असतो. ज्ञानमार्गात द़ृष्टी येणं खूप महत्त्वाचं असते. संगीत शिकण्यासाठीची द़ृष्टीही गुरूकडून लाभते. त्यानंतर संगीत जोपासण्याची आणि वृद्धिंगत करण्याची जबाबदारी शिष्याची असते.

आमच्या घरामध्ये गुरू-शिष्य ही परंपरा लहानपणापासून राहिलेली आहे. त्यामुळे अजित कडकडे, राजाभाऊ काळे, हेमंत पेंडसे, देवकी पंडित, मोहन दरेकर या सगळ्यांनी घरी राहून गुरू-शिष्य परंपरेने बाबांकडे (जितेंद्र अभिषेकी) शिक्षण घेतले आहे. त्यामुळे गुरू म्हणून त्यांच्या आयुष्यातील बाबांचे स्थान आयुष्याचा मार्ग दाखवणारा एक पांलंक असेही आहे. मी स्वतःला फार भाग्यवान मानतो की, मी मुलगा असून, बाबांनी माझा शिष्य म्हणून स्वीकार केला. मलाही त्या शिष्याच्या भूमिकेत जाऊन बाबांकडे गाणे शिकण्याची सुबुद्धी देवाने दिली.
बाबांचे वेगळेपण म्हणजे ते एवढे मोठे गायक होते तरी ते आजन्म विद्यार्थ्याच्या भूमिकेत राहिले. दीप्तीची लालसा असणे आणि आयुष्यभर त्याचा पाठपुरावा करणे हा त्यांच्यातील मोठा गुण होता. ते स्वतः मोठे गायक होते. त्यांना पद्म पुरस्कार मिळाला होता. मात्र, तरीही त्यांनी आपल्यातील विद्यार्थीपण कधीही संपू दिले नाही. वयाच्या साठीनंतरही कोल्हापूरला खाँ साहेबांकडे ते शिकायला जायचे. त्यामुळे बाबांना मी नेहमीच साधकाच्या भूमिकेत पाहिले आहे.

संगीत हा समुद्र आहे आणि त्याचे ज्ञान कधीच संपत नाही. आयुष्यात कितीही पुढे गेलो, तरी ती अपूर्णतेची भूक नेहमीच जाणवत असते. बाबा नेहमी म्हणायचे की, मला सर्व काही येतंय, असं न म्हणणारा आयुष्यभर शिष्यच राहतो. बाबा शिस्तप्रिय होते. पहाटे रियाजासाठी तंबोरा वाजलाच पाहिजे, हा त्यांचा कटाक्ष होता. चोवीस तास संगीताच्या विचारात, संगीताच्या वातावरणात राहणे याचा त्यांनी एक पायंडा घालून दिला होता. गायनाच्या शिक्षणाबरोबरच व्यावहारिक शिक्षणही घेतलेच पाहिजे, याबाबतही ते आग्रही होते. आपण गायन करतो; मग शिक्षणाची गरज काय, अशी अनेकांची भूमिका असते; पण बाबांची भूमिका होती की, शिक्षण हे माणसाला आयुष्यात उभे राहायला शिकवते. त्यामुळे शिक्षण आवश्यकच आहे, हा त्यांनी त्यांच्या सगळ्या शिष्यांना नियम करून दिला होता. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक शिष्याने पदवी संपादित केलेली दिसते. त्याबरोबरच विविधांगी प्रकारचे वाचन करण्याची सवयही त्यांनी शिष्यांना लावली. आपल्या शिष्यांना समोर बसवून ते वर्तमानपत्र वाचून घेत. शुद्धलेखनाचे नियम सांगत असत. त्यामुळे भाषेचा अडसर कधी आम्हाला झाला नाही. इंग्रजी माध्यमामध्ये शिक्षण घेऊनही भावसंगीत किंवा भक्तिसंगीत गात असताना आम्ही कधीही चुकीचे उच्चार केले, असं आढळणार नाही. हे गुरू म्हणून बाबांचे आमच्यावर उपकारच आहेत, असे मला वाटते.

(शब्दांकन : सुनीता जोशी)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT