भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना २४ ऑक्टोबरला होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम दावा करत आहे की पाकिस्तान वर्ल्डकपमध्ये भारताकडून कायम पराभूत होण्याचा इतिहास यंदाच्या वर्ल्डकपमध्ये बदलला जाईल.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा हवाला देत आयसीसीने सांगितले की, 'आम्ही गेल्या तीन वर्षापासून युएईमध्ये क्रिकेट खेळत आहोत. त्यामुळे आम्हाला तेथील परिस्थिती चांगलीच माहीत आहे.' बाबर आझम पुढे म्हणाला की, 'आम्हाला माहीत आहे की खेळपट्टी कशी असेल फलंदाजाला कसे जुळवून घ्यावे लागते. सामन्यादिवशी चांगली खेळणारा संघच जिंकणार आहे. मला वाटते की आम्हीच जिंकणार.'
लाहोरमध्ये २००९ ला श्रीलंकेच्या संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेच्या करणास्तव बहुतांश संघांनी पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला होता. त्यानंतर पाकिस्तानने आपले सामने युएईमध्ये खेळण्यास सुरुवात केली.
पाकिस्तानला टी२० वर्ल्डकपमध्ये भारताला पराभूत करणे आज पर्यंत जमलेले नाही. पण, सध्याचा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम म्हणतो की ही आता इतिहास जमा झालेली गोष्ट आहे. तो म्हणतो, 'आम्हाला दबावाची जाणीव आहे. मला आशा आहे की हा सामना जिंकून आम्ही आमचे टी२० अभियान चांगल्या प्रकारे सुरु करु. सामन्यापूर्वी एक संघ म्हणून तुमचा आत्मविश्वास खूप महत्वाचा असतो. आमचा आत्मविश्वास आणि मनोधौर्य चांगले आहे. आम्ही भूतकाळाबाबत नाही तर भविष्यकाळाबाबत विचार करत आहोत. त्याचीच तयारी आम्ही करत आहोत.'
बाबर आझमने आपल्या संघाबद्दल सांगताना म्हणाला की, 'आमच्या संघातील सर्व खेळाडूंनी स्थानिक क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन केले आहे. आम्हाला आधी वर्ल्डकप खेळलेल्या वरिष्ठ खेळाडूंकडून बरेच काही शिकायचे आहे.' पाकिस्तान संघात नुकतेच काही बदल झाले आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनला फलंदाजीचा सल्लागार आणि दक्षिण आफ्रिकाचा माजी वेगवान गोलंदाज वेर्नोन फिलेंडरला गोलंदाजीचा सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे. यावर आझम म्हणाला की, 'हेडन आणि फिलेंडर यांच्याकडे मोठा अनुभव आहे. आम्ही त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमचे खेळाडू लवकर शिकणारे आहेत.'