Latest

Babar Azam Pakistan Captain : बाबर आझम पाकिस्तान संघाचा नवा कर्णधार, शाहिन आफ्रिदीची हकालपट्टी

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Babar Azam Pakistan Captain : पाकिस्तान क्रिकेट संघात अचानक मोठा बदल करण्यात आला आहे. बाबर आझमला पुन्हा एकदा वनडे आणि टी-20 फॉरमॅटमध्ये संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) रविवारी ट्विट करून ही माहिती दिली. निवड समितीने पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडे बाबरला वनडे आणि टी-20 संघाचे नेतृत्व द्यावे अशी शिफारस केली होती.

2023 च्या विश्वचषकातील खराब कामगिरीमुळे बाबर आझमला पाकिस्तान क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडावे लागले होते. त्याने 15 नोव्हेंबर 2023 रोजी वनडे, टी-20 आणि कसोटी अशा तिन्ही फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर शाहीन शाह आफ्रिदीला वनडे आणि टी-20 तर शान मसूदला कसोटी संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते. मात्र, शाहीनच्या नेतृत्वात पाकने न्यूझीलंडविरुद्धची पाच सामन्यांची टी-20 मालिका 1-4 ने गमावली. तसेच पाकिस्तान सुपर लीगमध्ये आफ्रिदी कर्णधार असलेला लाहोर कलंदर संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर राहिला. या खराब कामगिरीची दखल घेत पीसीबीने पुन्हा एकदा बाबर आझमला कर्णधारपदाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला. पण नेतृत्व बदल करताना त्यांनी बाबरला एकदिवसीय आणि टी-20 फॉरमॅटचा कर्णधार बनवले. त्यामुळे शान मसूद कसोटी कर्णधार म्हणून कायम राहणार आहे. (Babar Azam Pakistan Captain)

पाकिस्तानी मीडियानुसार, बाबर आझमला कर्णधार बनवण्यात येत असल्याचे शाहीन शाह आफ्रिदीला सांगण्यात आले, तेव्हा वेगवान गोलंदाजाने नाराजी व्यक्त केली. तसेच बोर्डाला प्रश्न विचारला की, माझ्या नेतृत्वात काय चूक झाली? आफ्रिदीने केवळ न्यूझीलंड दौऱ्यावर संघाचे नेतृत्व केले, जिथे संघाचा दारुण पराभव झाला. पण केवळ एका मालिकेच्या निकालाच्या आधारे कर्णधार बदलणे कितपत योग्य आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे. (Babar Azam Pakistan Captain)

बाबर आझमने 117 एकदिवसीय सामन्यांमध्ये 56.72 च्या सरासरीने 5729 धावा केल्या आहेत ज्यात 19 शतके आणि 32 अर्धशतकांचा समावेश आहे. तर 52 कसोटी सामन्यांमध्ये 45.86 च्या सरासरीने त्याने 3898 धावा केल्या आहेत ज्यात 9 शतके आणि 26 अर्धशतकांचा समावेश आहे. 109 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये बाबर आझमने 41.55 च्या सरासरीने 3698 धावा केल्या आहेत, ज्यात 3 शतके आणि 33 अर्धशतकांचा समावेश आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान क्रिकेट संघाने 43 एकदिवसीय सामन्यांमध्ये 26 विजय नोंदवले आहेत, तर 15 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. या कालावधीत एक सामना बरोबरीत तर एक सामना अनिर्णित राहिला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT