Latest

कोल्हापूर : रेशन दुकानात मिळणार ‘आभा’ कार्ड

दिनेश चोरगे

कोल्हापूर :  आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांना देण्यात येणार्‍या आयुष्यमान भारत कार्ड (आभा कार्ड) रेशन दुकानात मिळणार आहे. याकरिता धान्य दुकानदारांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याची जिल्ह्यात प्रक्रिया सुरू झाली आहे. नागरिकांना घराशेजारीच हे कार्ड उपलब्ध होणार आहे.

केंद्र शासनाकडून आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत, तर राज्य शासनाकडून महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत पाच लाखांपर्यंतचे औषधोपचार मोफत दिले जाणार आहेत. याकरिता लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्ड (आभा) दिले जाणार आहे. राज्यात सुमारे 2 कोटी, तर जिल्ह्यात सुमारे साडेपाच लाख लोकांना हे कार्ड देण्याचे नियोजन आहे.

देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात आभा कार्ड काढण्याचे प्रमाण कमी आहे. यामुळे या कार्डची निर्मिती व वितरणाची गती वाढविण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकारणाकडून बीआयएस 2.0 ही सुधारित संगणक प्रणाली राज्यात लागू केली जाणार आहे. ही प्रणाली लागू झाल्यानंतर लाभार्थ्यांना मोबाईल अ‍ॅपच्या साहाय्याने आयुष्मान कार्ड निर्माण करणे सोयीचे होणार आहे.
या कार्डसाठी ई-केवायसी व ई-कार्डचे वितरण करण्याकरिता सध्या राज्यातील आशा कर्मचार्‍यांचे लॉगीन आयडी तयार केले आहेत. त्यांना आयडी प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्याच धर्तीवर आता रेशन धान्य दुकानदारांचीही मदत घेतली जाणार आहे. याकरिता त्यांनाही प्रशिक्षण देणे आवश्यक असून, त्यांंचे लॉगीन आयडी तयार करण्यात येणार आहे.

नागरिकांना होणार लाभ

आभा कार्ड काढण्यासाठी नागरिकांना सोयीचे ठिकाण उपलब्ध होणार आहे. कार्ड काढल्यानंतर ते संबंधितांच्या घरपोच केले जाणार आहे. धान्य दुकानदारांकडे ई-पॉस मशीनवर सर्व ई-केवायसीचा डाटा उपलब्ध असल्याने कार्ड काढण्याची प्रक्रिया जलदगतीने होणार आहे.

दुकानदारांना होणार लाभ

आभा कार्ड काढण्यासाठी प्रत्येक ई-केवायसीसाठी पाच रुपये, तर या प्रत्येक कार्डच्या डिलिव्हरीसाठी तीन रुपये रेशन धान्य दुकानदाराला मिळणार आहे. यानिमित्ताने धान्य दुकानदारांना उत्पन्नाचा आणखी एक स्रोत उपलब्ध होईल, असा विश्वास जिल्हा रास्तभाव दुकानदार महासंघाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र मोरे यांनी सांगितले.

या योजनेंतर्गत आभा कार्ड देण्यासाठी राज्य शासनाने मागवलेल्या माहितीनुसार, ती संकलित करून पाठवण्याचे काम सुरू झाले आहे. लवकरच दुकानदारांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यामार्फत हे कार्ड देण्याची प्रक्रिया जिल्ह्यात राबविली जाईल.
– मोहिनी चव्हाण,
जिल्हा पुरवठा अधिकारी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT