अयोध्या; वृत्तसंस्था :अयोध्येतील राम मंदिर दर्शनासाठी सर्वसामान्य भाविकांना मंगळवारपासून खुले होणार असून, पहिल्या सहा महिन्यांत किमान दोन कोटी भाविक अयोध्येत येतील, असा अंदाज अयोध्या विकास प्राधिकरणाने व्यक्त केला आहे. या भाविकांसाठी योग्य आणि पुरेशा सुविधा पुरवण्यासाठी कंबर कसली आहे.
2023 मध्ये डिसेंबरपर्यंत अयोध्येत आलेल्या भाविकांची संख्या 5 लाख 38 हजार होती. आता राम मंदिर पूर्ण झाले आहे. सोमवारी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठाही होत आहे. मंगळवारपासून हे मंदिर सर्वसामान्य भाविकांसाठी खुले होत आहे. अयोध्या विकास प्राधिकरण आता आगामी काळातील भाविकांच्या गर्दीला तोंड देण्यासाठी सरसावले आहे. प्राधिकरणाच्या अंदाजानुसार दररोज एक ते दीड लाख भाविक अयोध्येत येतील, असा प्राथमिक अंदाज आहे. पहिल्या सहा महिन्यांत भाविकांचा उत्साह प्रचंड राहील, हे निश्चित आहे. त्यामुळे येत्या सहा महिन्यांत किमान दोन कोटी भाविक अयोध्येत येतील, असा अंदाज आहे.
एकाचवेळी 22 हजार वाहनांना सामावून घेतील असे 51 पार्किंग लॉटस् शहराच्या चारही दिशांना सज्ज ठेवलेे आहेत. तेथून भाविकांना मंदिरापर्यंत आणण्यासाठी ई-बस आणि ई-कार्टस् उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याशिवाय शहरात कोठेही वाहतूक कोंडी होऊ नये, तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीवर नियंत्रण राहावे यासाठी खास एआय कॅमेरे लावले आहेत. शिवाय अतिरिक्त पोलिस दल, अर्धसैनिक दलांच्या तुकड्या, एटीएस आणि गुप्तचर खात्याचे अधिकारी पुढील काळात अयोध्येत तैनात राहातील.
सर्वात मोठा ताण हॉटेल व्यवसायावर येणार असून, सध्या हॉटेलांची संख्या मर्यादित आहे. त्यामुळे टेंट सिटी, धर्मशाळा याशिवाय उपलब्ध हॉटेल्स यांच्या जोडीला होम स्टे सुविधांवर अयोध्या विकास प्राधिकरणाने भर दिला आहे. प्राधिकरणाने आतापर्यंत 158 होम स्टेना मान्यता दिली असून, आणखीही काही होम स्टे तयार होत आहेत.
पर्यटन खात्याचे प्रधान सचिव मुकेश मेश्राम यांनी अयोध्येतील मंदिराचे उद्घाटन हा भारतातील धार्मिक पर्यटनाचे?द्वार उघडणारा प्रसंग असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, 2030 पर्यंत दररोज सरासरी 2 ते 3 लाख भाविक अयोध्येत येतील, असा अंदाज आहे. म्हणजेच येत्या सहा वर्षांत 6 कोटी 80 लाख भाविक अयोध्येत येतील. यासोबतच अयोध्येच्या नजीक असलेल्या धार्मिक स्थळांनाही याचा प्रचंड फायदा होणार आहे.