Latest

रामनामाच्या गजराने दुमदुमली अयोध्या

दिनेश चोरगे

अयोध्या; वृत्तसंस्था : पाचशे वर्षांच्या प्रतीक्षेला सोमवारी अभिजित मुहूर्तावर पूर्णविराम मिळाला. जन्मभूमीला श्रीराम मिळाला. शतकानुशतके हक्काच्या घराशिवाय व पुढे दशकानुदशके तंबूत राहण्याची वेळ ओढावलेल्या श्री रामलल्लांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्षमायाचना केली. त्यांच्या मुख्य उपस्थितीत देशभरातील विविध पंथ-संप्रदायातील संतसमुदाय तसेच कोट्यवधी श्रीराम भक्तांच्या साक्षीने जन्मभूमीतील भव्यदिव्य मंदिरातील गर्भगृहात मंत्रोच्चारण, शंखध्वनीच्या गजरात श्री रामलल्लांना विराजमान करण्यात आले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यावेळी उपस्थित होते. प्राणप्रतिष्ठा सोहळा पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधानांनी पवित्र जलप्राशनाने आपले 11 दिवसांचे यमनियम व्रत सोडले आणि देशभरात दिवाळीच सुरू झाली!

अयोध्येत 11 लाख दिवे लावण्यात आले. देशभरातील वस्त्या, पाडे, गावे, तालुक्याची ठिकाणे, शहरे, महानगरे श्रीरामरंगात न्हाऊन निघाली. सायंकाळनंतर अवघा देश दिव्यांनी उजळून गेला आणि आतषबाजीने दणाणून गेला!

सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणाला सर्वत्र उदंड प्रतिसाद होता. रस्ते यादरम्यान निर्मनुष्य झाले होते. विधी संपन्न झाला आणि रस्तोरस्ती, मंदिरा-मंदिरांतून 'जय श्रीराम' हा एकच घोष निनादला. अयोध्येत श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठेचा मुख्य विधी 45 मिनिटे चालला. 12 वाजून 10 मिनिटांनी संकल्पासह विधी सुरू झाला. आरतीनंतर पंतप्रधानांनी श्री रामलल्लांना साष्टांग दंडवत घातला.

पहाटे मंत्राच्चारणाने श्री रामलल्लांना जागविले गेले. मंगल ध्वनींनी प्राणप्रतिष्ठा विधी सुरू झाला. वैदिक मंत्रांसह मंगलाचरण झाले. दहा वाजता शंखासह देशभरातील विविध राज्यांतून आलेल्या 50 वर पारंपरिक वाद्यांचा मंगल ध्वनी निनादला. दुपारी 12.29 वाजता प्राणप्रतिष्ठेच्या मुख्य विधीचा श्रीगणेशा झाला. 84 सेकंदांचा हा मुहूर्त होता. पुरोहितांनी तो चपखलपणे साधून एवढ्या सेकंदांत श्री रामलल्ला बालस्वरूप मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न केली.

मंत्रोच्चारणासह श्री रामलल्लांच्या चरणांवर जलाभिषेक झाला; मग अक्षता, फुले वाहण्यात आली. नैवेद्य चढविण्यात आला. पंतप्रधानांच्या हस्ते आरती झाली. त्यांनी श्री रामलल्लांना साष्टांग दंडवत घातला. संतांचा आशीर्वाद घेतला. प्राणप्रतिष्ठेनंतर मंडपात वसुंधरा पूजन झाले. ऋग्वेद आणि शुक्ल यजुर्वेदीय शाखांचे होमहवन व पारायणे झाली. सायंकाळी पूर्णाहुती होऊन देवतांचे विसर्जन करण्यात आले.

SCROLL FOR NEXT