अयोध्या; वृत्तसंस्था : 16 जानेवारीपासून सुरू झालेल्या प्राणप्रतिष्ठा विधीचा रविवारी सहावा दिवस होता. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिजित मुहूर्तावर दुपारी 12 वाजून 29 मिनिटांनी श्री रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा विधी सुरू होईल. रामलल्लांच्या डोळ्यावरील पट्टी काढली जाईल. रामलल्लांच्या डोळ्यांत सुवर्णदंडिकेने पंतप्रधान काजळ लावतील. रामलल्लाला आरसा दाखवतील. अयोध्या या 'न भूतो न भविष्यती' सोहळ्यासाठी सज्ज झाली असून, सोमवारी शहरात 11 लाख दिवे चेतविले जाणार आहेत. शहर अडीच हजार क्विंटल फुलांनी सजविण्यात आले आहे. सर्वत्र सुरक्षा व्यवस्था चोख आहे. अयोध्येत तब्बल 25 हजारांवर जवान तैनात आहेत. रविवारी सकाळी श्री रामलल्लाच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. सायंकाळी शय्याधिवास पार पडला. सायंकाळच्या आरतीनंतर आजचे सर्व विधी पूर्ण झाले.
सायंकाळी रामलल्ला विराजमान यांच्या जुन्या मूर्तीची पूजाही झाली. त्यांनाही विधिवत राम मंदिरात नेण्यात आले. रामलल्लासह लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे त्यांचे तिघे बंधू तसेच हनुमंताची अस्थायी मंदिरातील मूर्तीही राम मंदिरात नेण्यात आली. शाळिग्रामही मंदिरात दाखल झाला.
सकाळी 10 पासून 50 वाद्यांनी मंगलध्वनी
सोमवारी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सकाळी दहापासून मंगल ध्वनी वाजविण्यात येईल. विविध राज्यांतून आलेली 50 हून अधिक वाद्ये वाजविली जातील. हा कार्यक्रम दोन तास चालेल. शनिवारी सायंकाळीच अयोध्येच्या सीमा सील करण्यात आल्या होत्या. आता सोमवार मावळेपर्यंत प्राणप्रतिष्ठेसाठी आमंत्रित पाहुण्यांनाच, तेही पास दाखवल्यावरच अयोध्येत प्रवेश मिळत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत हे अयोध्येत दाखल झाले असून मुख्यमंत्री सुरक्षा व्यवस्था आदी सर्वच घडामोडींवर स्वत: लक्ष ठेवून आहेत.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येतील महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ ते राम मंदिरापर्यंतचा संपूर्ण मार्ग फुलांनी सजवण्यात आला आहे. बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत, संगीतकार अन्नू कपूर, अभिनेता रणदीप हुडा आदी रविवारी अयोध्येत दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्राणप्रतिष्ठेसाठी 22 जानेवारीला सकाळी अयोध्येत दाखल होतील. पुढे ते चार तास अयोध्येत थांबतील.
मोदी नसते तर राम मंदिर झाले नसते : कृष्णम
काँग्रेसचे एक नेते प्रमोद कृष्णम अयोध्येत दाखल झाले असून, माध्यमांशीही ते बोलले. ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मंदिर बांधण्यात आले, हे ठीकच आहे. पण नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले नसते, तर मंदिर बांधलेच गेले नसते. किती सरकारे आली, किती पंतप्रधान आले. आरएसएस, बजरंग दल, संत महात्म्यांचा संघर्षही अर्थात यामागे आहे,.पण मोदींच्या इच्छाशक्तीला मी सर्वाधिक श्रेय देईन. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा अयोध्येला येणार नाहीत. त्यांनी सोशल मीडियावरून तशी माहिती दिली.
पंतप्रधानांचा ताफा सज्ज
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यातील तीन वाहने, जॅमरने सुसज्ज फॉर्च्युनर आणि दोन बुलेटप्रूफ लँड क्रूझर अयोध्येत दाखल झाल्या आहेत. अयोध्येतील शरयू नदीत उतरण्यासाठी गरुड क्रूझ सज्ज आहे. 125 लोकांना हे क्रूझ सफर घडवू शकते. हे क्रूझ वातानुकूलित आहे.
नेपाळच्या मंदिरात पूजा
नेपाळमधील जनकपूर येथील देवी जानकी मंदिरात रविवारी विशेष पूजा करण्यात आली.
ही दिवाळीच : मेरी मिलबेन
रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा ही दुसरी दिवाळीच आहे. मी ती साजरी करणार आहे, अशी प्रतिक्रिया अमेरिकन अभिनेत्री आणि गायिका मेरी मिलबेन यांनी दिली आहे.
विदेशांतूनही उत्साह
तैवानसह अमेरिका, रशिया, जपान, ब्रिटन आदी जगभरातील बहुतांश देशांतून विशेषत: इस्कॉनशी संबंधित मंदिरांत प्राणप्रतिष्ठेपूर्वी उत्सवी माहौल आहे. भजन-कीर्तन सुरू आहे. जगभरात अनेक ठिकाणी सोहळ्याच्या थेट प्रसारणाची सुविधा उपलब्ध झाली आहे.
अयोध्येतील कार्यक्रम
सकाळी 10 : मंगलध्वनी
सकाळी 10.30 : पंतप्रधान मोदी दाखल
सकाळी 11 : पाहुण्यांचे आगमन
सकाळी 11.30 ते 12.30 : गर्भगृहात पूजा
दुपारी 2 ते सायंकाळी 7 : पाहुण्यांकडून रामलल्लाचे दर्शन
दुपारी 2.15 : पंतप्रधान मोदी हे कुबेर टिला येथे जाऊन शिव मंदिरात पूजा करणार
आजी-माजी क्रिकेटपटू येणार
सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, कपिल देव, सुनील गावसकर, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली, अनिल कुंबळे, अजय जडेजा असे आजी-माजी क्रिकेटपटू सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
न्यूझीलंडचे मंत्री म्हणाले, जय श्रीराम
न्यूझीलंडचे नियमन मंत्री डेव्हिड सेमूर हेही रामलल्ला प्राणप्रतिष्ठेच्या रंगात न्हालेले होते. ते म्हणाले, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो की, त्यांच्या नेतृत्वाखाली 500 वर्षांनंतर राम मंदिराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. मोदींच्या धाडसाला आणि बुद्धिमत्तेला तोड नाही.
अयोध्येत 6 टेंट सिटी, भाडे 10 हजार रुपये
अयोध्येत साधू-संतांसह निमंत्रितांसाठी ब्रह्मकुंडाजवळ सहा खासगी टेंट सिटी बांधण्यात आल्या आहेत. खोल्यांमध्ये पंचतारांकित सुविधा आहेत. एसी रूम, संलग्न आलिशान बाथरूम आणि आलिशान डायनिंग हॉल आहे. दिवसाचे भाडे 10 हजार रुपये आहे.