Latest

अयोध्येतील प्रत्यक्ष उपस्थितीचा आनंद शब्दांत न मावणारा : डॉ. योगेश जाधव

दिनेश चोरगे

अयोध्या; पुढारी वृत्तसेवा : अयोध्येतील या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याबद्दल आपण स्वत:ला भाग्यवान समजतो. यापुढे अनेक दशके अखंड भारताच्या मनात आजचा हा समारंभ असणार आहे. या समारंभाला आपल्याला प्रत्यक्ष उपस्थित राहता आले, याचा आनंद हा शब्दांत न मावणारा असल्याचे 'पुढारी'चे समूह संपादक डॉ. योगेश जाधव यांनी म्हटले आहे.

अयोध्या येथे झालेल्या श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला डॉ. योगेश जाधव व 'पुढारी'च्या संचालिका डॉ. स्मितादेवी जाधव खास निमंत्रित म्हणून उपस्थित होते. देशभरातून केवळ अडीच हजार मान्यवरांना या सोहळ्यासाठी श्रीराम जन्मभूमी न्यासाच्यावतीने खास निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी डॉ. जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

'पुढारी' समूहाची ही परंपरा कायम राखत 'पुढारी टी.व्ही. चॅनल'ने मराठी चॅनलमध्ये सर्वप्रथम अयोध्येत येऊन गेल्या 50 दिवसांपासून अयोध्येतील घटनांचे अत्यंत वस्तुनिष्ठ असे आक्रमक प्रक्षेपण केले असल्याचे सांगून, सर्वांना या ऐतिहासिक सोहळ्याच्या डॉ. योगेश जाधव यांनी शुभेच्छा दिल्या.

'पुढारी' समूहाचा खारीचा वाटा

दै. 'पुढारी'ने 1992 साली झालेल्या श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे अत्यंत वास्तव तसेच आक्रमक कव्हरेज केले होते. श्रीराम जन्मभूमी आंदोलनाच्या ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये दै. 'पुढारी'च्या या कव्हरेजचा समावेश करण्यात आल्याचे सांगून डॉ. योगेश जाधव म्हणाले की, श्रीराम मंदिराच्या उभारणीत 'पुढारी' समूहाचा खारीचा वाटा आहे.

प्रभू श्रीराम आपल्या पाठीशी असल्याची खात्री : डॉ. योगेश जाधव

उत्तम कलाकुसर केलेल्या भव्य गर्भगृहात असलेल्या प्रभू श्रीरामाच्या मूर्तीसमोर गेल्यावर भान हरपून जायला होते. या मूर्तीमध्ये आलेले दैवी तेज आपल्याला भारावून टाकते, याचा अनुभव मी स्वतः घेतला. श्री रामलल्लाच्या मूर्तीवरील स्मितहास्य मनाला शांती देते आणि श्रीराम आपल्या पाठीशी उभा आहे, याची प्रत्येक भारतीयाला खात्री होते, अशी भावना डॉ. योगेश जाधव यांनी व्यक्त केली. जितकी श्री रामलल्लाची मूर्ती तेजस्वी आहे, तितकाच सुंदर आणि भव्य असा मंदिर प्रासाद आहे. इथल्या प्रत्येक शिळेवर उत्तम कलाकुसर केलेली आहे. भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब या मंदिरात सर्वत्र उमटलेले आहे.

शरयू तीरावरचा दीपोत्सव, स्वच्छ व भव्य परिसर, अशी ही नवी अयोध्या कायम स्मरणात राहील, असे त्यांनी म्हटले आहे. हा ऐतिहासिक अनुभव घ्यायला सपत्निक बोलावल्याबद्दल त्यांनी रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे आभार मानले.

SCROLL FOR NEXT