Latest

विदर्भातील पाच मतदारसंघांत सरासरी 55 टक्के मतदान

दिनेश चोरगे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीला प्रारंभ झाला असून, पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात विदर्भातील पाच जागांवर शुक्रवारी सरासरी 55 टक्के मतदान झाले. उन्हाचा तडाखा, अवकाळीचा फटका यामुळे मतदानावर किती परिणाम होईल, याची धाकधूक असताना मतदार राजाने कशाचीही पर्वा न करता मतदानाचा हक्क बजावला. या टप्प्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार या बड्या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी शुक्रवारी पहिल्या टप्प्यात विदर्भातील नागपूर विभागातील नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, रामटेक या पाचही लोकसभा मतदारसंघांत काही ठिकाणी गोंधळाची स्थिती वगळता शांततेत मतदान झाले. उन्हाचा तडाखा जाणवत असतानाही मतदारांनी आपला हक्क बजावण्यात कसूर केली नाही.

नागपुरात तसेच दुर्गम गडचिरोलीत मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजल्याापासूनच मतदारांनी रांगा लावल्या. दिव्यांग व वरिष्ठ मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे यासाठी विशेष व्यवस्था होती. विभागातील पाचही लोकसभा मतदारसंघांत दुपारी तीनपर्यंत 44.12 टक्के मतदान झाले. दुपारनंतर मतदानासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर पडल्यामुळे मतदानाला वेग आला. महिला, युवकांमध्ये उत्साह होता.

चंद्रपूर मतदारसंघात 55.11 टक्के मतदान

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत सायंकाळी 5 पर्यंत 55.11 टक्के मतदान झाले. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लाख 37 हजार 906 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. सकाळी 7 पासून दुपारी 3 वाजेपर्यंत 43.48 टक्के मतदान पार पडले. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या सहा विधानसभा क्षेत्रात झालेले मतदान असे : राजुरा 59.14 टक्के, चंद्रपूर 48.20 टक्के, बल्लारपूर 59.06 टक्के, वरोरा 57.56 टक्के, वणी 58.87 टक्के, आर्णी 49.70 टक्के मतदान पार पडले. आर्णी व व चंद्रपूर विधानसभा क्षेत्रामध्ये 50 टक्याच्या खाली टक्केवारी आहे. उर्वरित विधानसभा क्षेत्रात साठ टक्क्यांपर्यंत मतदानाची टक्केवारी जाण्याची शक्यता आहे.

उन्हाच्या तडाख्यातही भंडार्‍यात उत्साह

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान शांततेत पार पडले. पारा 42 अंशांवर गेला असतानाही भर उन्हात मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली होती. भंडारा जिल्ह्यातील एकूण 1156 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली. सकाळी 7 पासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली. सकाळी 7 ते सकाळी 9 पर्यंत संपूर्ण मतदारसंघात 7.22 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर दुपारच्या टप्प्यात मतदानाने वेग घेतला. संध्याकाळी 5 पर्यंत 56.87 टक्के मतदान झाले होते. काही केंद्रांवर उशिरापर्यंत मतदार असल्याने मतदानाची प्रक्रिया सुरूच होती.

नक्षलग्रस्त भागात दुपारी तीनपर्यंत मतदान

गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त भागात दुपारी तीनपर्यंत मतदानाची मुदत होती. नक्षलग्रस्त भागात सकाळीच मतदानासाठी नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. नक्षल्यांनी निवडणुकीत अडथळे आणू नयेत म्हणून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिस, विशेष कमांडो पथके आणि केंद्रीय सुरक्षा दलांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. या भागांत चांगले मतदान नोंदवले गेले. गडचिरोली येथे प्रशासनातर्फे निवडक नवमतदार, वृद्ध आणि दिव्यांग मतदारांची रथावरून वाजत-गाजत मिरवणूक काढून मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्यात आले. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार अशोक नेते, आ. डॉ. देवराव होळी, आ. कृष्णा गजबे यांनी आपापल्या गावातील मतदान केंद्रांवर मतदान केले.

हेलिकॉप्टरने आणले ईव्हीएम

गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून दोनशे कि.मी. अंतरावर असलेल्या सिरोंचा येथे अहेरी येथून आज पोलिस विभागाच्या हेलिकॉप्टरने 3 अतिरिक्त ईव्हीएम मशिन पाठविण्यात आल्या. वेळेवर तांत्रिक बिघाड झाल्यास खबदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले. कुरखेडा येथील मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे दुसरी मशिन आणण्यात आली. पुढे दोन तासांनंतर मतदान पूर्ववत सुरू झाले.

भागवत, गडकरी, फडणवीस यांचे मतदान

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी महाल संघ मुख्यालयामागे असलेल्या आदितवार दरवाजा प्राथमिक शाळेत मतदानाचा अधिकार बजावला. नागपूरचे भाजप उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकाळी साडेनऊच्या सुमारास जुन्या गडकरी वाड्याजवळ असलेल्या टाऊन हॅाल, महाल येथे कांचन गडकरी यांच्यासह सहकुटुंब मतदान केले. काँग्रेसचे उमेदवार आमदार विकास ठाकरे यांनी सुभाषनगर कॉर्पोरेशन शाळा येथे मतदान केले. भाजपनेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंजाबचे माजी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी मनपा प्राथमिक शाळा, डिग दवाखानाजवळ, धरमपेठ नागपूर येथे मतदानाचा हक्क बजावला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रामटेक मतदारसंघात कोराडी ग्रामपंचायत परिसरातील मतदान केंद्रावर मतदान केले. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ब्रह्मपुरीला मतदान केले. महायुतीचे रामटेक लोकसभा मतदार संघाचे सेना उमेदवार राजू देवनाथ पारवे यांनी परिवारासह उमरेड, परसोडी येथील पंडित नेहरू उच्च प्राथमिक शाळेत मतदान केले.

पहिल्या टप्प्यातील लढती

नागपूर ः नितीन गडकरी (भाजप) वि. विकास ठाकरे (काँग्रेस).
चंद्रपूर ः सुधीर मुनगंटीवार (भाजप) वि. प्रतिभा धानोरकर (काँग्रेस).
रामटेक ः राजू पारवे (शिंदे गट) वि. श्यामकुमार बर्वे (काँग्रेस).
भंडारा-गोंदिया ः सुनील मेंढे (भाजप) वि. प्रशांत पडोळे (काँग्रेस).
गडचिरोली-चिमूर ः अशोक नेते (भाजप) वि. नामदेव किरसान (काँग्रेस).

मतदानाचा टक्का

नागपूर ः 49.07 टक्के
रामटेक ः 52.38 टक्के
चंद्रपूर ः 55.11 टक्के
भंडारा-गोंदिया ः 56.87 टक्के
गडचिरोली- चिमूर ः 66.27 टक्के

SCROLL FOR NEXT