नवी दिल्ली, पीटीआय : हवेच्या प्रदूषणाचा धोका जगभर वाढत असून, भारतासह सहा देशांतील नागरिकांच्या आयुर्मानात घट झाली आहे, असा धक्कादायक अहवाल शिकागोस्थित इनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूट या संस्थेने (ईपीआयसी) प्रसारित केला आहे. प्रदूषित हवेमुळे भारतीयांचे आयुर्मान सरासरी 5.3 वर्षांनी कमी झाल्याचेही या अहवालात म्हटले आहे.
ईपीआयसीने एअर क्वालिटी लाईफ इंडेक्स अर्थात हवेतील गुणवत्ता आणि जीवन निर्देशांकांतर्गत नवीन संशोधन अहवाल प्रसारित केला आहे. यामध्ये दिल्ली जगात सर्वाधिक प्रदूषित असल्याचे म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) प्रदूषणाला आळा घालण्यासाठी घालून दिलेल्या मर्यादेचे उल्लंघन झाल्यामुळे दिल्लीतील लोकांचे सरासरी आयुर्मान 11.9 वर्षांनी कमी झाल्याची धक्कादायक माहिती या अहवालात दिली आहे. भारतातील 130 कोटी लोक वास्तव्य करीत असलेल्या ठिकाणी प्रदूषणाने मर्यादा ओलांडली आहे. हवेच्या प्रदूषणाने 5 मायक्रोग्रॅम्स पर क्युबिक मीटर (जी/एम3) हून अधिक पातळी ओलांडल्यामुळे लोकांच्या आयुर्मानात घट झाली आहे. दिल्लीसह भारतातील अनेक ठिकाणी या मर्यादेचे उल्लंघन झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.
भारताने हवेच्या प्रदूषणाबाबत 40 जी/एम3 मर्यादा ठेवली आहे. भारतातील अनेक शहरांनी ही धोक्याची पातळी ओलांडली असून, 67.4 टक्के लोक अशा प्रदूषित भागात राहत आहेत. यामुळे भारतीयांचे सरासरी आयुर्मान 5.3 वर्षांनी घटल्याचे या अहवालात निदर्शनास आणूून दिले आहे. दिल्लीतील हवा सर्वाधिक घातक असून, येथील 18 दशलक्ष लोकांचे आयुर्मान सरासरी 11.9 वर्षांनी कमी झाले आहे. 1998 ते 2021 या कालावधीमध्ये दिल्लीतील प्रदूषणात 67.7 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
…तर भारतीयांच्या आयुर्मानात वाढ शक्य
2019 साली भारताने नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम हे अभियान सुरू केले आहे. मात्र, अद्यापही या मोहिमेला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. 2025-26 पर्यंत देशातील प्रदूषणात 40 टक्क्यांनी घट करण्याचे टार्गेट भारताने ठेवले आहे. भारताला हवेचे प्रदूषण कमी करण्यात यश आल्यास भारतीयांच्या आयुर्मानात 2 ते 3 वर्षांनी वाढ होऊ शकते, असेही या अहवालात म्हटले आहे.