Latest

AUSWvINDW : ऑस्ट्रेलियाचा सलग २५ वा विजय

Arun Patil

मकॉय; वृत्तसंस्था : सामनावीर डॉर्सी ब्राऊनच्या (33 धावांत 4 विकेटस्) भेदक गोलंदाजीनंतर (राचेल हेन्स (नाबाद 93), अ‍ॅलिसा हिली (77) व मॅग लॅनिंग (नाबाद 53) यांच्या अर्धशतकांच्या बळावर यजमान ऑस्ट्रेलियाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला (AUSWvINDW) संघावर 54 चेंडू बाकी असताना 9 विकेटस्ने विजय मिळविला. ऑस्ट्रेलियन महिला संघाचा (AUSWvINDW) हा वन-डे क्रिकेटमधील  सलग 25 वा विजय ठरला. मिताली राजचे अर्धशतक मात्र व्यर्थ ठरले.

भारतीय महिला फलंदाजांना मोठी धावसंख्या रचण्यास आलेले अपयश आणि निष्प्रभ गोलंदाजी यामुळे ऑस्ट्रेलियन संघाने सहज विजय साकारत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. यजमान संघाने 41 षटकांत 1 बाद 227 धावा काढून वन-डेत सलग 25 वा विजय मिळविला. या संघाने मार्च 2018 नंतर एकही सामना गमावलेला नाही. मालिकेतील दुसरा सामना 24 सप्टेंबर रोजी खेळविला जाणार आहे.

भारताचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत गेले. यामुळे पाहुण्या संघाला 8 बाद 225 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताच्या वतीने सर्वाधिक धावा कर्णधार मिताली राजने काढल्या. तिने 107 चेंडूंत 63 धावांचे योगदान दिले. तर, ऑस्ट्रेलियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावताना वेगवान गोलंदाज डार्सी ब्राऊनने 33 धावांत 4 विकेटस् घेत भारताच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.

विजयासाठी 226 धावांचे लक्ष ठेवून उतरलेल्या अ‍ॅलिसा हिली व राचेल हेन्स यांनी 126 धावांची सलामी दिली. हिली परतल्यानंतर हेन्स व लॅनिंग यांनी 101 धावांची अभेद्य भागीदारी करीत विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

संक्षिप्‍त धावफलक : AUSWvINDW

भारत : 50 षटकांत 8 बाद 225 धावा. मिताली राज 63, यासिका भाटिया 35, रिचा घोष 32, डॉर्सी ब्राऊन 33 धावांत 4 विकेटस्.

ऑस्ट्रेलिया : 41 षटकांत 1 बाद 227 धावा. हेन्स नाबाद 93, अ‍ॅलिसा 77, लॅनिंग नाबाद 53, पूनम यादव 58 धावांत एक विकेट.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT