पुढारी ऑनलाईन डेस्क : Bairstow Run Out Controversy : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (ENG vs AUS) यांच्यातील दुसऱ्या ॲशेस कसोटीत जॉनी बेअरस्टो ज्या पद्धतीने रनआउट झाला, त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणात आता दोन्ही देशांचे पंतप्रधान आमने-सामने आले असून त्यांच्यात ट्विटरवरून वाद-प्रतिवाद रंगला आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी या वादात पहिला उडी मारली आणि बेअरस्टोला बाद करणे हे खेळ भावनेच्या विरुद्ध असल्याचे ट्विट करून नाराजी व्यक्त केली. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर जागतिक पातळीवर खळबळ उडाली. ऑस्ट्रेलियन संघ एकप्रकारे सर्वांच्या नजरेत व्हिलन ठरल्याचे चित्र निर्माण झाले. मात्र, कांगारू संघाच्या बचावासाठी लगेचच ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज पुढे सरसावले आणि त्यांनी ट्विटरवरूनच ब्रिटनचे पंतप्रधान सुनक यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. 'ऑस्ट्रेलियन संघाचा मला अभिमान आहे. असल्याचे सांगत त्यांनी आपल्या देशाच्या संघाचा बचाव केला. (Bairstow Run Out Controversy)
वास्तविक, जॉनी बेअरस्टोच्या रनआउटवर ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर बराच गदारोळ झाला होता. ऑस्ट्रेलियन संघाच्या विजयानंतर लाँग रूममध्ये कांगारू संघाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कांगारू संघ फसवणूक करणारा आणि खेळ भावनेविरुद्ध जात असल्याचा आक्षेप चाहत्यांनी घेतला.
या प्रकरणात मंगळवारी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सचे समर्थन केले आणि बेअरस्टो ज्या प्रकारे रनआउट झाला ते खरोखरच खेळ भावनेच्या विरुद्ध असल्याचे म्हटले. याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांनी सुनक यांना चोख प्रत्युत्तर दिले. 'मला आमच्या पुरुष आणि महिला क्रिकेट संघाचा अभिमान आहे. दोन्ही संघांनी इंग्लंडविरुद्धच्या ॲशेस कसोटीतील सुरुवातीचे दोन सामने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलिया नेहमीच जिंकतो. आता मालिका विजयाची आम्ही वाट पाहत आहोत.' (Bairstow Run Out Controversy)