Latest

ICC WC AUS vs AFG : मॅक्सवेलने अफगाणिस्तानच्या तोंडचा घास हिरावला, ऑस्ट्रेलियाचा थरारक विजय

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : ग्लेन मॅक्सवेलच्या झंझावाती द्विशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानविरुद्ध थरारक विजयाची नोंद केली. अफगाण संघाने पहिला फलंदाजी करत 50 षटकांत गडी गमावून 291 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर 292 धावांच्या विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना कांगारूंची अवस्था 18.3 षटकांत 7 बाद 91 अशी झाली होती. पण या पडझडीत मॅक्सवेलने संघासाठी झुंझार आणि अविश्वसनीय खेळी साकारून अफगाणिस्तानच्या तोंडचा घास हिरावला. या खेळीदरम्यान मॅक्सवेल जबर जखमी झाला होता. त्याच्या पाठीत आणि मांडीत वेदना होत होत्या. पायांची हालचाल करता येत नव्हती. तो लंगडत धावत होता. पण तरीही एखाद्या लढवय्याप्रमाणे त्याने जागेवर उभा राहून चेंडू सीमापार धाडले. त्याने आपल्या स्फोटक खेळीदरम्यान 10 षटकार 21 चौकारांच्या मदतीने 128 चेंडूत नाबाद 202 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने 46.5 षटकांत 7 गड्यांच्या मोबदल्यात 293 धावा केल्या आणि सामना खिशात घातला.

कांगारूंची पडझड

292 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कांगारू संघाची सुरुवात खराब झाली. संघाने 1.2 व्या षटकात अवघ्या 4 धावांवर ट्रॅव्हिस हेडची (0) विकेट गमावली. येथून मिचेल मार्श आणि डेव्हिड वॉर्नरने डावाची धुरा सांभाळली. मार्श (24) वेगवान खेळत होता पण तोही सहाव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर नवीन-उल-हकचा बळी ठरला. 9व्या षटकाच्या पहिल्या आणि दुस-या चेंडूंवर वेगवान गोलंदाज अजमतुल्ला उमरझाईने दोन कांगारू फलंदाजांची शिकार केली. यात डेव्हिड वॉर्नरला (18) क्लिन बोल्ड तर जोश इंग्लिसला (0) स्लिपमध्ये झेलबाद करण्यात त्याला यश आले. पॉवरप्ले-1 च्या 10 षटकात ऑस्ट्रेलियाला 4 गडी गमावून केवळ 52 धावा करता आल्या. यानंतरही कांगारूंची पडझड सुरूच राहिली.

मॅक्सवेलचे झुंझार शतक

15 व्या षटकात 69 धावसंख्येवर कांगारूंची पाच विकेट पडली. मार्नस लॅबुशेन 28 चेंडूत 14 धावा करून बाद झाला. रहमत शाहच्या अचूक थ्रोने तो धावबाद झाला. यानंतर राशीद खानने दे धक्का देत ऑस्ट्रेलियाला आणखीन बॅकफुटवर ढकलले. त्याने त्याच्या लागोपाठ दोन षटकांत दोन बळी घेतले. त्याने 16.4 व्या षटकात मार्कस स्टॉइनिसला (6) विकेट्ससमोर पायचीत पकडले. तर 18.3 व्या षटकात मिचेल स्टार्कला (3) तंबूत पाठवले. यादरम्यान, एकाबाजूने विकेट पडत असताना मॅक्सवेलने ऑस्ट्रेलिया डाव सांभाळला. त्याने पॅट कमिन्सच्या साथीने 21 व्या षटकात संघाचे शतक धावफलकावर झळकावले. तर 25.2 व्या षटकात स्वत:चे अर्धशतक 51 चेंडूत पूर्ण केले. इथून पुढे त्याने अफगाणी फिरकीपटूंचा समाचार घेतला आणि चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. त्याने 32.2 व्या षटकात शतक झळकावले. त्याचे हे एकदिवसीय कारकिर्दीतील चौथे तर विश्वचषकातील तिसरे शतक ठरले. तर विश्वचषकात द्विशतक फटकावणार पहिला फलंदाज ठरला. मॅक्सवेलने यादरम्यान, त्याला कमिन्सने (68 चेंडूत 12 धावा) खांबीर साथ दिली. या जोडीने नाबाद 202 धावांची विजयी भागिदारी पूर्ण केली.

अफगाणिस्तानने जिंकला टॉस

अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 5 गडी गमावून 291 धावा केल्या. पॉवरप्लेमध्ये अफगाणिस्तानने संयमी खेळी केली. सलामीवीर रहमानुल्ला गुरबाज आणि इब्राहिम झादरान यांनी पहिल्या दोन षटकांमध्ये बचावात्मक पवित्रा अवलंबला. पण त्याचवेळी खराब चेंडूवर मोठे फटकेही मारले. पण 7व्या षटकात मॅक्सवेलने आपल्या फिरकीच्या जोरावर अफगाण फलंदाजांवर दडपण आणले. त्यानंतर पुढच्याच षटकात जोश हेजलवूडने गुरबाजची विकेट घेऊन सलामीची जोडी फोडली. मोठा फटका खेळण्याच्या नादात गुरबाज मिचेल स्टार्कच्या हाती झेलबाद झाला. पहिल्या 10 षटकांत संघाने 46 धावा केल्या.

अफगाणिस्तानसाठी सलामीवीर इब्राहिम झाद्रानने (129 धावा) नाबाद शतक झळकावले. त्याने विश्वचषकातील पहिली आणि एकदिवसीय कारकिर्दीतील चौथी शतकी खेळी साकारली. विश्वचषकात शतक झळकावणारा तो पहिला अफगाण फलंदाज ठरला.

राशिद-झाद्रानची अर्धशतकी भागिदारी

डेथ ओव्हर्समध्ये अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी शानदार फलंदाजी केली. राशिद खानने 18 चेंडूत 194.44 च्या स्ट्राईक रेटने 35 धावांची वादळी खेळी केली. त्याने झाद्रानसोबत 28 चेंडूत 58 धावांची नाबाद भागीदारी केली. अफगाणिस्तानने शेवटच्या पाच षटकात 64 धावा केल्या आणि फक्त एक विकेट गमावली. या धावांच्या जोरावर संघाला 292 धावांचे लक्ष्य ठेवण्यात यश आले. ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूडने 2 बळी घेतले. तर मिचेल स्टार्क, ग्लेन मॅक्सवेल आणि अॅडम झाम्पाने प्रत्येकी एक विकेट मिळाली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT