Latest

ऑस्ट्रेलियाच्या पोरी इंग्लंडपेक्षा भारी!

Arun Patil

नॉटिंगहॅम, वृत्तसंस्था : महिलांच्या अ‍ॅशेस मालिकेतल्या एकमेव कसोटीत ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. विजयासाठी 268 धावांचा पाठलाग करणारा इंग्लंडचा संघ 178 धावांत तंबूत परतला अन् ऑस्ट्रेलियाने 89 धावांनी बाजी मारली. अ‍ॅश्ले गार्डनर हिने या डावात 8 विकेटस् घेत विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 473 धावांचा डोंगर उभा केला. एलिसे पेरी (99), नाबेल सदरलँड (137), ताहलिया मॅग्राथ (61) आणि अ‍ॅश्ले गार्डनर (40) यांनी ऑस्ट्रेलियाकडून दमदार फलंदाजी केली. इंग्लंडच्या सोफी एक्लेस्टनने 129 धावांत 5 विकेटस् घेतल्या. इंग्लंडकडूनही जबरदस्त पलटवार झाला अन् त्यांनी 463 धावांपर्यंत मजल मारून ऑसींना 10 धावांचीच आघाडी घेऊ दिली. कर्णधार हिदर नाईट (57), नॅथ श्विव्हर ब्रंट (78) आणि डॅनी वॅट (44) यांनी चांगला खेळ केला; पण टॅमी बियूमोंट पराक्रम गाजवला.

कसोटीत द्विशतक करणारी ती इंग्लंडची पहिली महिला खेळाडू ठरली. तिने 1935 साली इंग्लंडच्या बेट्टी स्नोवबॉलचा सर्वाधिक 189 (विरुद्ध न्यूझीलंड) धावांचा विक्रम मोडला. टॅमीने 331 चेंडूंत 27 चौकारांच्या मदतीने 208 धावा केल्या आणि इंग्लंडकडून हा एखाद्या खेळाडूने केलेल्या सर्वोत्तम वैयक्तिक धावा ठरल्या. महिला कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारी ती आठवी खेळाडू ठरली.

इंग्लंडने दुसर्‍या डावात ऑस्ट्रेलियाला 257 धावांवर गुंडाळले. सोफीने 63 धावांत 5 विकेटस् घेतल्या. एकाच कसोटीत 10 विकेटस् घेणारी ती जगातील दहावी गोलंदाज ठरली. 268 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवातच खराब झाली. डॅनी वॅट (54) वगळता अन्य फलंदांनी गार्डनरच्या फिरकीसमोर शरणागती पत्करली. गार्डनरने 20-1-66-8 असा अप्रतिम स्पेल टाकला. पहिल्या डावात तिने 4 विकेटस् घेतल्या होत्या आणि ट्रेंट ब्रिज कसोटीत 12 विकेटस् घेणारी ती पहिली फिरकीपटू ठरली. यापूर्वी बिल ओ'रिलीने 129 धावांत 11, मुथय्या मुरलीधरनने 132 धावांत 11 विकेटस् घेतल्या होत्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT