Latest

WWC : ऑस्ट्रेलिया महिला संघाची फायनलमध्ये धडक, सेमीफायनलमध्ये विंडिजवर मात

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक (WWC) स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा १५७ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या विजयासह कांगारू संघाने ९ व्यांदा या जागतिक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. वेलिंग्टन येथे खेळवल्या गेलेल्या पहिल्या उपांत्य सामन्याला सुरुवात होण्यास उशीर झाला. त्यामुळे हा सामना ४५-४५ षटकांचा खेळवण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ४५ षटकांत ३ गडी गमावून ३०५ धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ ३७ षटकांत १४८ धावांत गारद झाला. अ‍ॅलिसा हिलीला तिच्या उत्कृष्ट शतकासाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. ऑस्ट्रेलियाच्या रॅचेल हेन्स आणि अ‍ॅलिसा हिली या जोडीने पहिल्या विकेटसाठी २१६ धावांची भागीदारी रचली. यादरम्यान हीलीने शतकी खेळी साकारत १०७ चेंडूत १२९ धावा तडकावल्या. ती बाद झाल्यानंतर हेन्सही २३१ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतली. हेन्सने १०० चेंडूत ८५ धावा केल्या. यानंतर कॅप्टन लेनिंगने २६ आणि मुनीने ३१ चेंडूत ४३ धावा करत संघाची धावसंख्या ३०० च्या पुढे नेली. वेस्ट इंडिजकडून हेन्रीने दोन आणि कोनेलने एक बळी घेतला. या दोघींशिवाय एकाही गोलंदाजाला यश मिळाले नाही. कर्णधार टेलरसह तीन गोलंदाजांनी जवळपास १० इकॉनॉमीने धावा दिल्या. (WWC)

३०६ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात खराब झाली आणि रशादा विल्यम्स खाते न उघडता बाद झाली. यावेळी त्यांची धावसंख्या १२ होती. त्यानंतर डायंड्रा डॉटिन आणि हेली मॅथ्यूजने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३२ धावांची भागीदारी केली. डॉटिन ३४ धावा करून मॅकग्राची बळी ठरली. यानंतर कर्णधार स्टेफनी टेलरने मॅथ्यूजला साथ दिली आणि दोघांमध्ये ४७ धावांची भागीदारी झाली. मॅथ्यूज ३४ धावा काढून बाद झाली. यानंतर विंडिजची फलंदाजी पूर्णत: ढासळली आणि ३७ षटकांत १४८ धावांवर त्यांचा डाव संपुष्टात आला. टेलरने सर्वाधिक ४७ धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून जेस जोनासनने २ बळी घेतले. तर, ब्राऊन वगळता इतर सर्व गोलंदाजांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. (WWC)

अंतिम फेरीपर्यंतच्या प्रवासात ऑस्ट्रेलियाने एकही सामना गमावलेला नाही. उपांत्य फेरीपूर्वी साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाने आपले सर्व सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. आतापर्यंतच्या महिला विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ यशस्वी ठरला असून त्यांनी सर्वाधिक सहा वेळा विश्वचषक आपल्या नावावर केला आहे. (WWC)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT