पुढारी ऑनलाईन डेस्क : AUS vs WI Test : वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा 'गाबाभिमान' रविवारी मोडीत काढला. कॅरेबियन संघाने जगातील नंबर वन कसोटी संघाचा पराभव करून 1997 नंतर तब्बल 27 वर्षांनी कांगारूंच्या देशात पहिला विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 216 धावांची गरज होती, परंतु त्यांचा संपूर्ण संघ केवळ 207 धावा करू शकला. स्टीव्ह स्मिथने (91) सर्वाधिक धावा केल्या. विंडिजच्या शामर जोसेफने 7 विकेट घेतल्या.
या डे-नाईट कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना केव्हम हॉज (71), जोशुआ दा सिल्वा (79) आणि केविन सिंक्लेअर (50) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 311 धावा केल्या. कांगारूंच्या उत्कृष्ट गोलंदाजीसमोर ही एक अप्रतिम धावसंख्या होती. यादरम्यान, मिचेल स्टार्कने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर जोश हेझलवूड आणि नॅथन लायन यांनी 2-2 विकेट घेतल्या. (AUS vs WI Test)
यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिला डाव 289 धावांवर घोषित करून सर्वांना आश्चर्यचकित केले. यजमानांची एक विकेट शिल्लक होती, पण तरीही त्यांनी 22 धावांच्या पिछाडीवर डाव घोषित केला. कमी प्रकाशात कॅरेबियन संघाच्या झटपट विकेट मिळवणे ही कांगारूंचा कर्णधार पॅट कमिन्सची रणनिती होती. पण त्यांना ही रणनिती चांगलीच महागात पडली.
कॅरेबियन संघाने दुसऱ्या डावात 193 धावा ठोकल्या आणि यजमानांसमोर 216 धावांचे लक्ष्य ठेवले. या धावसंख्येचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली नाही. उस्मान ख्वाजा आणि मार्नस लॅबुशेन स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर स्टीव्ह स्मिथ (91*) आणि कॅमेरॉन ग्रीन (42) यांनी तिसऱ्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी करून संघाला मजबूत स्थितीत पोहचवले. मात्र शमर जोसेफने ग्रीनची शिकार करताच ऑस्ट्रेलियन संघ विस्कळीत होऊ लागला. स्मिथने एक टोक सांभाळले, पण दुसऱ्या टोकाने त्याला कोणाचीही साथ मिळाली नाही आणि विकेट पडत गेल्या. स्मिथ शेवटपर्यंत नाबाद राहिला.
दुसऱ्या कसोटीतील विजयासह वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियातील 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. ऑस्ट्रेलियाने पहिली कसोटी 10 विकेटने जिंकली होती.
वेस्ट इंडिजने तब्बल 27 वर्षांनी ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर पहिला कसोटी सामना जिंकून इतिहास रचला आहे. वेस्ट इंडिजच्या या विजयाचे श्रेय 24 वर्षीय युवा वेगवान गोलंदाज शामर जोसेफला जाते, ज्याने दुखापतग्रस्त असतानाही गाबाच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाची अहंकार मोडीत काढला. त्याने 11.5 षटके गोलंदाजी केली आणि 68 धावांत 7 बळी घेतले. यापैकी 4 फलंदाजांच्या तर त्याने दांड्या गुल केल्या. सलग दुसऱ्या कसोटीत पाच बळी घेण्याचा पराक्रम त्याने केला. पदार्पणाच्या कसोटीत त्याने अर्धशतक ठोकले होते. संपूर्ण मालिकेत चमकदार कामगिरी केल्याबद्दल जोसेफला प्लेअर ऑफ द सिरीज म्हणून निवडण्यात आले.
चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाने 2 बाद 60 धावसंख्येच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. स्टीव्ह स्मिथ आणि कॅमेरून ग्रीन यांनी संघाला 100 धावांच्या पुढे नेले. दुसऱ्या डावात दुखापत झाल्याने रिटायर्ड हर्ट झालेला शामर जोसेफ पुन्हा गोलंदाजीसाठी आला. त्याने 7 षटकात 6 विकेट्स घेतल्या. ज्यामुळे दुस-या सत्राअखेर ऑस्ट्रेलियाची अवस्था 8 बाद 187 अशी झाली.
ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथ हा एकमेव फलंदाज होता ज्याने दुसऱ्या डावात अर्धशतक केले. सलामीपासून शेवटपर्यंत तो कायम राहिला आणि 91 धावांवर नाबाद राहिला. त्याच्याशिवाय ऑस्ट्रेलियाकडून फक्त कॅमेरून ग्रीनला 42 धावा करता आल्या. बाकीचे फलंदाज विशेष काही करू शकले नाहीत.
यापूर्वी कॅरेबियन संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2003 मध्ये सेंट जॉन स्टेडियमवर 3 गडी राखून आपल्याच देशात जिंकला होता. तेव्हापासून विंडिजने 20 कसोटी खेळल्या, ज्यातील 16 गमावल्या आणि 4 कसोटी अनिर्णित राहिल्या. मात्र, तब्बल 21 वर्षांनंतर वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाला कसोटी सामन्यात पराभूत करून इतिहास रचला आहे.
विंडिजने फेब्रुवारी 1997 मध्ये पर्थच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाला मात दिली होती. त्यावेळी विंडिजने संघाने 10 गडी राखून विजय मिळवला होता. त्यानंतर कॅरेबियन संघाने ऑस्ट्रेलियात 17 कसोटी सामने खेळले. ज्यतील 15 सामने हरले, तर केवळ 2 सामने अनिर्णित राहिले.
गुलाबी चेंडूच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा प्रथमच पराभव झाला आहे. संघाने कसोटी इतिहासातील पहिला गुलाबी चेंडूचा दिवस-रात्र सामना खेळला. त्यांनी नोव्हेंबर 2015 मध्ये न्यूझीलंडचा पराभव केला होता. तेव्हापासून संघाने एकूण 11 दिवस-रात्र कसोटी खेळल्या आणि त्या सर्व जिंकल्या. पण आता त्यांचा पराभव झाला आहे. ऑस्ट्रेलियाने यापूर्वी डिसेंबर 2022 मध्ये ॲडलेडमध्ये दिवस-रात्र कसोटीत वेस्ट इंडिजचा पराभव केला होता.