Latest

AUS vs PAK Test : कमिन्स-स्टार्कच्या मा-यापुढे पाकिस्तानची शरणागती, कांगारूंचा मेलबर्न कसोटीत मोठा विजय

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाने मेलबर्न कसोटीत पाकिस्तानचा 79 धावांनी पराभव केला असून तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी कांगारूंनी दिलेल्या 317 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 237 धावांत ऑलआऊट झाला. सामन्यात 'विकेट्सचा डबल पंच' लगावणारा ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सला 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून गौरवण्यात आले. त्याने दोन्ही डावात एकूण 10 विकेट्स घेण्याची किमया केली. यासह तो कसोटी क्रिकेटमध्ये 250 किंवा त्याहून अधिक बळी घेणारा 10वा ऑस्ट्रेलियन गोलंदाज ठरला.

मेलबर्न कसोटीच्या चौथ्या दिवशी पाकिस्तान विजयाच्या दिशेने वाटचाल करत होता. पण पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क यांनी ऑस्ट्रेलियाला दमदार पुनरागमन करून दिले. या दोघा वेगवान गोलंदाजांनी आग ओकणा-या चेंडूंचा मारा केला. ज्यापुढे पाकिस्तान फलंदाजांनी अक्षरश: शरणागती पत्करली. कमिन्स-स्टार्कने पाकचे शेवटचे पाच फलंदाज केवळ 18 धावांत माघारी धाडले आणि विजयावर शिक्कामोर्तब केला.

कमिन्सने कसोटीच्या दोन्ही डावात 5-5 विकेट घेतल्या. तर स्टार्कने दुस-या डावात 4 बळी मिळवले. पाकिस्तानकडून कर्णधार शान मसूद (60) आणि आगा सलमान (50), बाबर आझम (41) आणि मोहम्मद रिझवान (35) यांनी आपला पराभव टाळण्यासाठी धडपड केली पण ते अपयशी ठरले.

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवशी 6 बाद 187 धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. अॅलेक्स कॅरीने तळातील फलंदाजांच्या मदतीने संघाची धावसंख्या 262 पर्यंत पोचवली. कॅरीने 53 धावांची शानदार खेळी केली. त्याच्या खेळीच्या जोरावरच ऑस्ट्रेलियाला पाकिस्तानपुढे 317 धावांचे विजयी लक्ष्य ठेवण्यात यश आले.

प्रत्युत्तरात पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. सलामीवीर अब्दुल्ला शफीक (4)आणि इमाम उल हक (12) हे स्वस्तात बाद झाले. यानंतर कर्णधार शान मसूदने बाबर आझमसोबत तिसऱ्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी केली. मसूदने 71 चेंडूंत सात चौकारांच्या मदतीने 60 धावांची खेळी केली. तो कमिन्सकरवी स्मिथच्या हाती झेलबाद झाला. त्याचवेळी बाबर आझमने 79 चेंडूंत 4 चौकारांच्या मदतीने 41 धावा केल्या आणि तो हेजलवूडच्या गोलंदाजीवर बाद झाला. सौद शकील (25), मोहम्मद रिझवान आणि आगा सलमान यांनी कांगारूंच्या भेदक मा-याचा प्रतिकार केला. पण काही अंतरांनी त्यांना तबूंत पाठवण्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना यश आले. त्यानंतर पाकिस्तानचे शेवटचे तीन फलंदाज आमिर जमाल, शाहीन आफ्रिदी आणि मीर हमजा हे तर शून्यावर बाद झाले. याचबरोबर यजमान ऑस्ट्रेलियाने सलग दुसरी कसोटी जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT