Latest

AUS vs WI Test : ऑस्ट्रेलियाने उडवला वेस्ट इंडिजचा धुव्वा, ॲडलेड कसोटी 10 विकेट्स राखून जिंकली

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : AUS vs WI Test : ॲडलेड येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा 10 विकेट्स राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियन संघासमोर विजयासाठी केवळ 26 धावांचे लक्ष्य होते, जे त्यांनी एकही विकेट न गमावता सहज गाठले. जोश हेझलवूडला त्याच्या जबरदस्त गोलंदाजीच्या प्रदर्शनासाठी प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराने गौरविण्यात आले. या विजयासह यजमान ऑस्ट्रेलियाने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरी कसोटी 25 जानेवारीपासून ब्रिस्बेन येथे डे-नाईट खेळवली जाणार आहे.

पाहुण्या विंडिजने पहिल्या डावात 188 धावा केल्या होत्या. या सामन्यात त्यांच्या तीन खेळाडूंने पदार्पण केले, त्यापैकी शामर जोसेफने 36 धावांची खेळी केली. याशिवाय अनुभवी फलंदाज कर्क मॅकेन्झी (50) यानेही पहिल्याच सामन्यात अर्धशतकी खेळी साकारली. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांनी प्रत्येकी 4-4 बळी घेतले. (AUS vs WI Test)

प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात 283 धावांपर्यंत मजल मारत 95 धावांची माफक आघाडी घेतली. ट्रॅव्हिस हेडने (119) पुन्हा एकदा संघासाठी उपयुक्त खेळी केली. विंडिजच्या युवा वेगवान गोलंदाज शामर जोसेफने पदार्पणाच्या या सामन्यातच पाच विकेट्स घेण्याची किमया केली. दुसऱ्या डावात कॅरेबियन संघाने पुन्हा निराशा केली. त्यांच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर अक्षरश: लोटांगण घातले. ज्यामुळे विंडिजचा संघ 120 धावांतच गारद झाला. कर्क मॅकेन्झीने पुन्हा एकदा संघासाठी सर्वाधिक 26 धावा केल्या पण बाकीचे फलंदाज फ्लॉप ठरले. (AUS vs WI Test)

जोश हेझलवूडने दुसऱ्या डावाही ऑस्ट्रेलियासाठी भेदक मारा केला. त्याने पाच विकेट्स घेत पाहुण्या कॅरेबियन संघाचे कंबरडे मोडले. अशाप्रकारे यजमान संघाला विजयासाठी 26 धावांचे लक्ष्य मिळाले, जे त्यांनी सहज गाठले. स्टीव्ह स्मिथने नाबाद 11 आणि मार्नस लॅबुशेनने नाबाद 1 धाव केली. उस्मान ख्वाजा 9 धावा करून रिटायर्ड हर्ट झाला.

SCROLL FOR NEXT